‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ - एक षड्यंत्र!

    03-Sep-2026
 
 Dismantling Global Hindutva
 
इंटरनेटने जग जवळ येत असताना, कुटुंबातील सदस्यांमध्ये दरी वाढवण्याचा एककलमी कार्यक्रम म्हणजे राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ ठरावा. हा कार्यक्रम म्हणजे डाव्या विचारसरणीचा सुनियोजित कट आहे. कुटुंबातील संवाद, आत्मीयता, विश्वास आणि साहचर्य हाच हे आघात रोखायचा एक उपाय असू शकतो.
 
एकीकडे दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘छात्रों की गूंज’ या नावाची सभा घेतली. यामध्ये त्यांनी ‘जेन-झी’, विशेषतः महिलांना उद्देशूनच बहुतेक वक्तव्य केली. त्यात राहुल गांधी म्हणले की, ‘मनुस्मृती’ने तुमच्यावरती बंधने घातली आहेत, ती सर्व बंधने तोडा आणि मुक्तपणे जीवन जगा. तर, दुसरीकडे शताब्दी वर्षाची वाटचाल करत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ‘कुटुंबप्रबोधन’ ही परिवार एकत्र बांधण्याची संकल्पना समाजामध्ये प्रसारित करीत आहे, रुजवत आहे. इफ यु कान्ट कन्व्हिन्स कन्फ्युज देम.
 
पुण्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात त्यांच्या विभाजनवादी वृत्तीचे चित्र स्पष्टपणे दिसते. परिवार, कुटुंब ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख. मात्र, तरुणांना कुटुंबापासून, परिवारापासून दूर नेण्याचे कारस्थानच राहुल गांधी आणि काँग्रेस करताना स्पष्ट दिसत आहे. अशाप्रकारचे त्यांचे एकूण ८०० कार्यक्रम होणार आहेत. एकदा का तरुणाई परिवाराचे ऐकेनाशी झाली की, आपण सांगू ते ती ऐकेल; हे साधे गणित त्यांच्या या नियोजनामागे आहे.
 
तुमचा परिवार, तुमच्या रूढी-परंपरा-चालीरीती हीच तुमची ओळख. आणि नेमके तेच नाकारायला, झिडकारायला राहुल गांधी सांगत आहेत. कुटुंबांचा, त्यातील चालीरितींचा द्वेष करायलाही सांगितले जात आहे. तुमच्या प्रगतीमध्ये, याच सगळ्या गोष्टी अडसर ठरत असल्याचा भ्रमही जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. आपल्याला जीवनातील एखाद्या भावूक क्षणी कुटुंबाचा आधार, प्रोत्साहन, शाबासकी मिळते. मानवाची ती भावनिक गरजही आहे. आपण माणूस आहोत, यंत्र नाही. जर ही गरजच परिवारातून पूर्ण झाली नाही, तर त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला भ्रमित करणे अधिक सुलभ होते. अर्थात, ‘जेन-झी’ने आज हे केले, तर ‘जेन-अल्फा’ ते अत्यंत सहज स्वीकारेल, असेही एक गणित काँग्रेसच्या या योजनेमागे नक्कीच आहे.हिंदू धर्मापासून दूर करून, याच पद्धतीने आजपर्यंत अनेकवेळेला धर्मांतरण झाल्याचे आपल्याला दिसून येईल.
 
राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमांमधील विरोधाभास हा की, ‘पुरुषसत्ताक’ पद्धती विरोधात महिला बोलत होत्या आणि सूत्रसंचालक राहुल गांधी नावाचा ‘पुरुषच’ होता. या कार्यक्रमाकरिता प्रियांका गांधींची योजना करता आली असती पण, काँग्रेसला राहुल गांधींनाच ‘यूथ आयकॉन’ म्हणून प्रसिद्ध करायचे आहे. यासाठीच हा सगळा खटाटोप सुरु आहे. खरेतर राहुल गांधींचे आजवरचे ३००-४०० वेळा झालेले ‘लॉन्चिंग’ अपयशी ठरले असताना, प्रियांका गांधींना समोर आणणे खएसयुक्तिक ठरले असते. पण, तसेच न करणे साहजिकच आहे. कारण, सोनिया गांधी या ‘कॅथॉलिक’ परिवारातील असून, त्यांच्यात ‘पुरुषसत्ताक’ पद्धतीच सध्याही आहे.
 
काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी हे ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपीचा दबावगट म्हणून, अराजक माजविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करत आहेत. वरवर हे दोन प्रवाह वेगळे दिसत असले, तरी त्यांचे उगमस्थान एकच आहे, ते म्हणजे समाजविघातक डावी विचारसरणी अर्थात ‘लेफ्ट लिब्रल इको सिस्टम’. काँग्रेस हा आता राजकीय पक्ष राहिला नसून, तो डाव्या विचारसरणीची ‘ऑपरेशनल विंग’ झाला आहे.
 
संघाने ही ‘मोडस ऑपरेंडी’ आधीच ओळखल्याने, म्हणूनच संघ ‘कुटुंबप्रबोधन’ या विषयावर बराच आधीपासूनच कार्यरत झालेला दिसतो. आजच्या पिढीची हे ठरवण्याची वेळ आलेली आहे की, आपल्या घरातील ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ कुठल्या प्रवाहात जाणार. आज घरातील तरुणाईला हे सांगायला हवे की, याच भारतात गार्गी- मैत्रेयी-लोपामुद्रा यांसारख्या अनेक विदुषी, वेदांच्या रचनाकार/भाष्यकार, दार्शनिक निर्माण झाल्या होत्या. राणी चेन्नमा, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या रणांगणात शौर्य गाजवणार्‍या अपराजित सेनापती येथेच निपजल्या. शिवबामधून ‘राजा’ घडवणार्‍या जिजाऊ इथल्याच, तर अहिल्याबाईंसारखी कुशल प्रशासकही भारतीय महिलाच होती. गाईदिन ल्यू ही पूर्वांचलातील जनजातीय स्वातंत्र्यसेनानी, ही देखील भारतीय महिलाच होती. पी. व्ही. सिंधू , मीराबाई चानू यांसारख्या भारतीय महिला खेळाडूंच्या पराक्रमाने जगाचे नेत्र दिपले आहेत. अशा अनेक भारतीय महिलांनी ज्ञान, शौर्य, प्रशासन, विज्ञान, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांत, ‘वेद’काळापासून आजपर्यंत आपली मुद्रा अंकित केली आहे. मग आज राहुल गांधी कोणत्या ‘पुरुषसत्ताक’ पद्धतीबद्दल टाहो फोडत आहेत?
 
‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या सदराखाली होणारे सनातन धर्मावरचे हल्ले, यापुढे अधिक तीव्र होतील. कधी याचे नेतृत्व थेट चर्च करेल किंवा राहुल गांधी, केजरीवाल, अभिजित दीपके, जरांगे-पाटील, रोहित पवार असे ‘पाळीव’ राजकारणी करतील. हेच ‘दिमागी नक्षल’. ‘एफसीआरए’ची पार्श्वभूमी या सगळ्याला असल्याचे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ‘आम्ही आर्थिक लाभाकरिता अश्लील कंटेंट प्रमोट करतो,’ हे ‘मेटा’ने नुकतेच कबूल केले. त्याकरिता भारत सरकारची माफीही मागितली. या गोष्टी वेगवेगळ्या पाहता येणार नाहीत. हा आमच्या कुटुंबव्यवस्था, संस्कृतीवर, मान्यतांवर झालेला हल्लाच आहे.
 
‘जेन-झी’लाही काही संदर्भ तपासून व समजून घ्यावे लागतील. आजपर्यंत गांधी घराण्याशिवाय किती महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या? आताची काँग्रेस ही इंदिरा गांधी यांनी मूळ पक्षापासून वेगळे होऊन स्थापन केलेली असल्याने, या काँग्रेसचा इतिहास १४० वर्षांचा नाही. ‘मनुस्मृती’वर बोलणारे राहुल गांधींनी, मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मग्रंथांवर एक अवाक्षरही काढले नाही. संकेत स्पष्ट आहे की, टार्गेट केवळ हिंदूच आहेत. अन्य धर्मांमध्ये ‘देवी’ किंवा ‘शक्ती’ स्वरूपाला मान्यता नाही. त्यांचे सगळे ‘प्रोफेट्स’ हे पुरुषच आहेत. कारण, पुरुष हा पवित्र आहे आणि महिला ही पापाची कारक आहे, अशीच विचारसरणी त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये ठासून भरलेली आहे.
 
चर्चच्याही निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना स्थान नाही. ‘विच हंट’ या प्रथेने युरोप व अमेरिकेत लाखो महिलांचे बळी घेतले आहेत. हा काळा अध्याय लपवण्याकरिताच ते हिंदूंना लक्ष्य करत आहेत.
 
त्यामुळे ‘कुटुंबप्रबोधन’ हा विषय नेमका काय आहे, हे आपण हिंदूंनी समजून घेतले पाहिजे. परिवारात राहणारे सगळे सदस्य एकत्र भेटतात का, बोलतात का? त्यांच्यामध्ये सुसंवाद होतो का? समाजामध्ये घडणार्‍या विविध घटनांची चर्चा होते का? विचारांचे आदान-प्रदान होते का? आपल्यातील व्यवहार सहज भावनेने होतात का? आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? बदलत्या काळाच्या आव्हानांना, प्रत्येक पिढी कशाप्रकारे सामोरी गेली, याची चर्चा होते का? इतका हा साधा आणि सोपा विषय आहे. याकरिता व्यासपीठ नको की, माईक नको. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘आमचीच पिढी बरोबर’ हा दुराग्रहही नको.एक अथवा दोन अपत्य असण्याच्या जमान्यामध्ये, पालकांची द्विधा मनस्थिती होणे साहजिकच आहे. तरी, आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करता यावे, यासाठी सतत विचारमंथन होत राहणे, हीच आजच्या काळाची आवश्यकता आहे.
 
- सुरेंद्र गाडगीळ




संबंधित मजकूर