‘बाबरीभक्तां’पासून सावध राहण्याचा इशारा

    29-Sep-2026
 
 
Yogi Adityanath Babri Bhakts
 
अयोध्येच्या राम मंदिरात दान अपहार प्रकरणानंतर, देशातून टीका झाली. यामध्ये ज्यांनी कधीकाळी श्रीरामांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले, असेही पक्ष टीका करण्यात आघाडीवर होते. त्यांचे रामप्रेम हे बेगडी असल्याची टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आणि हिंदूंना अशा ‘बाबरीभक्तां’पासून सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.
 
राम मंदिर चळवळीत शिरकाव करू पाहणार्‍या आणि या चळवळीस बदनाम करू पाहणार्‍या ‘बाबरीभक्तां’पासून राम मंदिर चळवळीच्या समर्थकांनी सतर्क आणि सावध राहायला हवे,” असा इशारा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात दिला. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर चळवळीतील अग्रणी सेनानी दिवंगत अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. "तथाकथित ‘बाबरीभक्त’ आता राम मंदिर चळवळीशी स्वत:स जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा ‘बाबरीभक्तां’पासून ‘बजरंगीं’नी सावध राहायला हवे,” असे, योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. आपला मुद्दा स्पष्ट करताना, योगी आदित्यनाथ यांनी ‘रामायणा’चा दाखला दिला. "लक्ष्मण मूर्च्छित पडलेला असताना, त्याचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने ‘द्रोणागिरी’ पर्वतावरील ‘संजीवनी’ आणण्यासाठी उड्डाण केले. त्या प्रवासात विघ्न आणण्यासाठी, रावणाने ‘कालनेमी’ला पाठविले होते. राम मंदिर चळवळीत शिरलेल्या अशा ‘कालनेमीं’चा शोध, राम मंदिर चळवळीच्या समर्थकांनी घ्यावा. अशा ‘कालनेमीं’ना राम मंदिर चळवळीची बदनामी किंवा अवमान करण्यापासून रोखावे,” असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी ‘बजरंगीं’ना केले.
 
राम मंदिरास अर्पण करण्यात आलेल्या दानाचा अपहार झाल्यावरून, ज्यांना राम मंदिर चळवळीशी काही देणे-घेणे नाही, असे लबाड राजकारणी या निमित्ताने राम मंदिर चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव हिंदू समाज घेत आहे. अशा सर्व महाभागांना योगी आदित्यनाथ यांनी हे सडेतोड उत्तर दिले. "ज्यांनी याआधी राम मंदिरास विरोध केला होता, ते आता आपण रामभक्त असल्याचे म्हणू लागले आहेत. हा जो बदल दिसून येत आहे, तो म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी चळवळीचा ‘वैचारिक विजय’ आहे,” असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
 
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. ‘भगवान राम आणि कृष्ण हे अस्तित्वातच नाहीत,’ असे प्रतिज्ञापत्र काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते, याची आठवणही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी करून दिली. हिंदू समाजाच्या भावना काँग्रेस पक्षाने वारंवार दुखाविल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या भाषणात तीर्थक्षेत्र अयोध्यानगरीमध्ये ज्या अनेक सुधारणा करण्यात आल्या, त्याची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
 
दिवंगत अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, भारतात आणि जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अशोकजी सिंघल यांच्या कार्याची माहिती करून दिली जाणार असल्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी चळवळीतील अग्रणी नेते अशोकजी सिंघल यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि अगणित रामभक्तांच्या समर्पणामुळेच, आज अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. कित्येक शतकांच्या संघर्षानंतर श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली, तेथे भव्य मंदिर उभारले गेले. या मंदिरावर प्रभू रामचंद्रांची विजयपताका आता सदासर्वकाळ लहरत राहील.
 
...तर ३० दिवसांमध्ये सरकार पडेल : सीजेपी
 
नवी दिल्लीत जंतरमंतरवर झालेले आंदोलन यशस्वी झाल्याचे पाहून, अभिजित दीपके आणि त्याच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’तील साथीदारांचे बाहू खूपच फुरफुरू लागले आहेत. विविध विरोधी पक्षही ‘सीजेपी’च्या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पाहून, केंद्रातील विद्यमान सरकार ३० दिवसांमध्ये पडेल, असेच त्यांना वाटत आहे. ‘सीजेपी’ने येत्या दि. २ ऑटोबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाच्या निमित्ताने ‘सीजेपी’च्या काही नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्यातील काही माहिती बाहेर आली. ‘एसआयआर’वर पूर्ण बहिष्कार, माध्यमांशी मोठ्या प्रमाणात संपर्क साधणे आणि वकिलांची मोठी फौजच सिद्ध ठेवणे, अशी तयारी आंदोलकांनी केल्याचे बाहेर आले आहे. या कार्यकर्त्यांमधील चर्चेत, ”चिंता करण्याचे काही कारण नाही. या सरकारने ‘सीजेपी’ कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यास ते सरकार ३० दिवसांच्या आत कोसळेल,” असे एका कार्यकर्त्याने म्हटल्याचेही बाहेर आले आहे. राकेश, मिलन नायक, सार्थक त्रिपाठी, मोजीबल हक आणि सुश्रुत दास यांच्यातील संभाषणाची जी माहिती बाहेर आली, त्यात हा उल्लेख आहे. भाजप सरकारने ‘एसआयआर’चा वापर करून मुस्लीम मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदारयाद्यांमधून वगळले आहे, यावरही या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.
 
आगामी दि. २ ऑक्टोबरच्या आंदोलनात हे सर्व मुद्दे येणारच आहेत, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. ‘एसआयआर’वर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा मुद्दाही दि. २ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, यावरही या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. "सरकारने ‘सीजेपी’च्या एकाही कार्यकर्त्यास हात लावल्यास; तर नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये जसे घडले, तसेच भारतात घडेल आणि हे सरकार ३० दिवसांमध्ये कोसळेल, हे आपण लेखी लिहून देतो,” असेही एका कार्यकर्त्याने म्हटल्याचे बाहेर आले. "सरकारविरुद्ध आवाज उठविणार्‍या पत्रकारांची हत्या केली जात आहे,” असेही मिलन नायक याने म्हटले. आपल्यासाठी देशभरातून दोन हजार वकील काम करणार असल्याचा दावाही, राकेश याने या चर्चेत केल्याचे माहितीवरून दिसते. "भारत सरकारने किंवा अन्य राज्य सरकारांनी ‘सीजेपी’ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यास, त्या गुन्ह्यास आव्हान देणे संघटनेस काही कठीण नाही,” असेही राकेश म्हणाला. ओडिशा आणि प. बंगालमधील कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेचा तपशीलही यातून बाहेर आला. त्यातूनच या भावी आंदोलनासंदर्भात खूप माहितीही बाहेर आहे. "पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यास घाबरू नका कारण, आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयात काम करणार्‍या ३००-५०० वकिलांची फौज आहे. तसेच, देशभरातही आपल्यासाठी दोन हजार वकिलांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे,” अशी माहिती राकेशने बोलताना दिली. ‘सीजेपी’ने दि. २ ऑटोबरच्या आंदोलनाची तयारी तर जोरदार सुरू केली असून, देशातील विरोधी पक्षही त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. निमित्त ‘एसआयआर’चे करून, मोदी सरकार सत्तेवरून कसे घालविता येईल, हाच सर्व आंदोलकांचा एकमात्र हेतू आहे. ‘सीजेपी’ला पुढे करून देशात अशांतता कशी माजेल, एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे. देशातील जनता विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे ओळखून असल्याने, त्यांच्याकडून हे आंदोलन एखाद्या झुरळासारखे झटकून टाकले जाईल. तसे करण्यात ‘जेन-झी’सुद्धा पुढे असतील.
 
‘नमामि गंगे...’ वाराणसी
 
अलीकडेच गंगा नदीला आलेल्या पुरानंतर ‘नमामि गंगे’ आणि वाराणसी महानगरपालिकेच्या पुढाकाराने, गंगा नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. गंगा नदी आणि या नदीच्या घाटांची स्वच्छता करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले. सर्वत्र चिखल, निर्माल्य आणि अन्य पूजासाहित्य आणि कचरा पडलेला होता. पण, गंगापुत्र आणि स्वयंसेवकांच्या तुकड्यांनी, गंगा स्वच्छता मोहीम हाती घेतली. वाहता कचरा काढून टाकला, नदीकाठचे घाट स्वच्छ केले, तसेच नागरिकांनी आणि अन्य भाविक, पर्यटकांनी गंगा नदीत कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांना यावेळी करण्यात आले. या मोहिमेत ‘दशाश्वमेध’ घाट परिसरातून, जवळपास एक टन कचरा गोळा करण्यात आला.
 
गंगेला आलेल्या पुरामुळे विविध प्रकारचा कचरा वाहून आला होता. तसेच पुरामुळे झालेल्या चिखलाने, गंगेचे घाटही खराब झाले होते. या मोहिमेत गंगेचे घाट स्वच्छ करण्यात आले. गंगापुत्र आणि स्थानिक स्वयंसेवक या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. गंगा स्वच्छता मोहीम पितृपक्षात हाती घेण्यात आली. ‘यानिमित्ताने गंगा स्वच्छ करून आम्ही एकप्रकारे आमच्या पूर्वजांनाच आदरांजली वाहिली,’ असे या मोहिमेत सहभागी झालेल्यांनी सांगितले. या श्रमदान मोहिमेमध्ये नागरिकांनी, अन्य भाविकांनी आणि पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या मोहिमेच्या आयोजकांनी सर्वांना केले. जनतेने या मोहिमेमध्ये सातत्याने आपले योगदान द्यावे, असे आवाहन ‘नमामि गंगे’ आणि वाराणसी महानगरपालिकेने पितृपक्षाच्या निमित्ताने जनतेला केले आहे.
 
-दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२
 




संबंधित मजकूर