बदली झाली, पण निवासाची सोय नाही; ग्रामीण पोलिसांना ठाण्यातील घरे खाली करण्याच्या नोटिसा

आ. संजय केळकर गृहराज्यमंत्र्यांना भेटणार; कर्तव्याच्या ठिकाणी निवास मिळेपर्यंत घरे कायम ठेवण्याची मागणी

    29-Sep-2026
     
Thane police quarters
 
ठाणे: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या मात्र निवासाची व्यवस्था नसलेल्या ग्रामीण पोलिसांना ठाण्यातील पोलीस वसाहतीतील घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पोलिसांच्या मुलांचे शिक्षण ठाण्यात सुरू असल्याने कर्तव्याच्या ठिकाणी निवासाची व्यवस्था होईपर्यंत ठाण्यातील घरे कायम ठेवावीत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली. याप्रश्नी दोन दिवसांत गृहराज्यमंत्री आणि गृहसचिवांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. (Thane police quarters)
 
भाजपच्या खोपट येथील १३२व्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात ग्रामीण महिला पोलिसांनी उपस्थित राहून आपली समस्या मांडली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात बदली झाल्यानंतर तेथे राहण्याची व्यवस्था नसल्याने ठाण्यातील पोलीस वसाहतीत त्यांना हंगामी स्वरूपात निवास देण्यात आला आहे. मात्र आता ही घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी निवासाची सोय होईपर्यंत ठाण्यातील निवास कायम ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली. याबाबत गृहराज्यमंत्री व गृहसचिवांना पत्र देऊन पोलीस कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. (Thane police quarters)
स्कूलबसच्या सुरक्षेवरही लक्ष
 
कार्यक्रमात काही पालकांनी स्कूलबसच्या सुरक्षेबाबत तक्रारी मांडल्या. शासनाच्या परिपत्रकानुसार स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतानाही काही बसमध्ये निकृष्ट दर्जाचे कॅमेरे बसवले जात असल्याचा आरोप पालकांनी केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही, तसेच अन्य सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे केळकर यांनी सांगितले. याबाबत परिवहन आयुक्त आणि आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमभंग करणाऱ्या बसचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. (Thane police quarters)
 
गाळेधारकांवरच कारवाई; फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष?
 
जांभळी नाका येथील सात गाळेधारकांचे स्व. आनंद दिघे यांनी १९८६ मध्ये पुनर्वसन केले होते. या गाळेधारकांवर प्रभाग समितीकडून कारवाई करण्यात आल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. रस्त्यावर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई न करता अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांवरच कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी संबंधित सहायक आयुक्तांना सक्त ताकीद दिल्याचे केळकर यांनी सांगितले. (Thane police quarters)
 
आयुष्यमान केंद्रांच्या सुधारणांवर चर्चा
 
नागरी आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून केळकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील आयुष्यमान आरोग्य केंद्रे आणि प्रसूती केंद्रांमध्ये भविष्यात कोणत्या सुधारणा करता येतील, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी केळकर यांनी विविध सूचना केल्या. (Thane police quarters)
दरम्यान, वर्तकनगर म्हाडा येथील इमारत क्रमांक १८ मधील गाळेधारकांनीही केळकर यांची भेट घेऊन आभार मानले. पुनर्विकासानंतर सुमारे अडीच वर्षे गाळ्यांचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर गाळेधारकांना ताबा पावती देण्यात आली. (Thane police quarters)
 
 
 




संबंधित मजकूर