शरीरभानाचा आभासी आरसा

    29-Sep-2026
 

Teen Body Image and Eating Disorders 
 
मुलांच्या वाढत्या वयात अन्नाविषयीची समज, खाण्याच्या सवयी आणि स्वतःच्या शरीराकडे पाहण्याची दृष्टी आकार घेते. यावर घरातील वातावरण, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या सामाजिक संकेतांचा प्रभावही पडतोच. डिजिटल जगामुळे या प्रभावांची व्याप्ती पूर्वीपेक्षा मोठी झाली आहे. मोबाईलच्या पडद्यावर दिसणार्‍या प्रतिमा आणि संदेशांमुळे आरोग्यदायी सवयींबाबतही गैरसमज निर्माण होऊ शकतात. यातूनच नवीन समस्या जन्माला येत आहेत. मोबाईलमुळे किशोरांच्या बदलत्या जीवनशैलीतील नवीन समस्यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
किशोरवयात शरीरात झपाट्याने बदल होतात. उंची, वजन, चेहरा आणि शरीरयष्टीतील बदलांबरोबर स्वतःच्या शरीराविषयीची जाणीवही तीव्र होते. या वयात इतरांशी तुलना होणे स्वाभाविकच असले, तरी सामाजमाध्यमांमुळे ही तुलना सतत सुरू राहत असल्याचे समोर आले आहे. स्मार्टफोनच्या पडद्यावर दिसणारी आकर्षक शरीरयष्टी, वजन कमी करण्याच्या पद्धती, आहाराचे सल्ले आणि व्यायामाचे व्हिडिओमुळे काही मुलांच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा विषय केवळ स्मार्टफोनच्या वापरापुरता मर्यादित राहत नाही; तो किशोरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशीही जोडला जातो आहे.
 
अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात ८ हजार ९५७ किशोरवयीन मुलांचा दोन वर्षे मागोवा घेण्यात आला. वयाच्या १२व्या वर्षी स्मार्टफोन हाती आलेल्या मुलांमध्ये, अनियंत्रित खाण्याची लक्षणे दिसण्याचे प्रमाण ६७ टक्के आढळले. वजनावरून स्वतःचे मूल्यमापन करण्याची शयताही यांच्यात दुप्पट होती. स्मार्टफोनचा वापर आणि पुढे दिसून आलेली लक्षणे यांच्यात संबंध आढळला असला, अनुवांशिकता, कौटुंबिक वातावरण, मानसिक आरोग्य आणि सामाजिक दबावांसारखे इतर घटकही त्यामागे असू शकतात.
 
वैद्यकीय दृष्टिकोनातून ‘ईटिंग डिसऑर्डर’ म्हणजे केवळ कमी किंवा जास्त खाणेच नव्हे. अन्न, वजन आणि शरीरयष्टीविषयीच्या विचारांमध्ये आणि वर्तनामध्ये सातत्याने दिसणारा अस्वस्थ बदल म्हणजेच, खाण्याशी संबंधित विकृती. काही मुलांमध्ये वजन वाढण्याची भीती इतकी तीव्र होते की, ते जेवण टाळू लागतात किंवा विशिष्ट पदार्थ बंद करतात. काहीजण अल्पावधीत मोठ्या प्रमाणात अन्न खातात आणि त्यानंतर अपराधीपणामुळे उलटी करणे, अतिव्यायाम करणे किंवा इतर अयोग्य पद्धतींचा अवलंब करतात.
 
ही समस्या केवळ मानसिक पातळीवरच राहत नाही. दीर्घ काळ अपुरा आहार मिळाल्यासही अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल, मासिक पाळीतील अनियमितता, हाडांची घनता कमी होणे आणि पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. किशोरवय हा शारीरिक वाढीचा महत्त्वाचा काळ असल्याने, या वयात पोषणाचा असमतोल निर्माण झाल्यास तो अधिक गंभीर ठरतो.
 
समाजमाध्यमांवरचा आशयही या समस्येला आणखीच गुंतागुंतीचे करतो. फिल्टर, छायाचित्रांतील बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्मित प्रतिमांमुळे आदर्श शरीरयष्टीची कृत्रिम कल्पना, मुलांसमोर निर्माण होऊ लागली आहे. स्वतःच्या शरीराची सतत तुलना सुरू राहिल्यानेही, काही मुलांमध्ये अनियंत्रित आहारपद्धती किंवा अति व्यायामाची प्रवृत्ती निर्माण होताना दिसत आहे.
 
म्हणूनच जेवण टाळणे, कॅलरी किंवा वजनाबद्दल सतत चिंता करणे, वारंवार वजन तपासणे, स्वतःच्या शरीराविषयी नकारात्मक बोलणे, अचानक अति व्यायाम सुरू करणे किंवा खाल्ल्यानंतर अपराधी वाटणे, ही मुलांची लक्षणे पालकांनी गांभीर्याने घ्यावीत. वजनात अचानक बदल, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यासही विलंब करू नये.
 
या समस्येवर उपाय म्हणून जेवताना आणि झोपण्यापूर्वी फोनचा वापर टाळणे, वयानुसार स्क्रीनवापराच्या मर्यादा ठरवणे आणि समाजमाध्यमांवरील शरीरयष्टीविषयक आशयाबद्दल मुलांशी मोकळा संवादही उपयोगी ठरू शकतो. मुलांच्या वजनावर टीका करण्याऐवजी नियमित आहार, पुरेशी झोप आणि शारीरिक हालचालींवर भर देण्यास त्यांना प्रोत्साहन द्यावे. अन्य काही समस्या जाणवल्यास बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणेही योग्य ठरेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन पूर्णपणे दूर करणे, हा त्यावरचा नक्कीच शाश्वत उपाय ठरणार नाही; मात्र त्याचा वापर, आशयनिर्मिती आणि त्यातून मुलांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामाकडे सजगपणे पाहणेच अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
 




संबंधित मजकूर