साहित्यसम्राटांच्या प्रेरणेने...

    29-Sep-2026
 
 
Shiva Kamble
 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील कर्तृत्ववान नायक सत्यात आहेत का? हो, त्यांच्या प्रेरणेने असे लोक आहेत. जसे नांदेडचे शिवा कांबळे. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
७०चे दशक होते. शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. त्यामध्ये सहावी इयत्तेतील शिवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खूपच छान भाषण केले. भाषण संपल्यानंतर शाळेतील पोवळे गुरुजी शिवाला म्हणाले, "छान भाषण केले. तू कुठे राहतोस? पालक काय करतात?” शिवा म्हणाला, "मांगवाड्यात राहतो. बाप मजुरी करतो.” पोवळे गुरुजी म्हणाले, "तू हुशार आहेस. माझ्या घरी अभ्यासाला ये दररोज.” शाळेतल्या मराठा समाजाच्या शिक्षकाने लेकाला दररोज घरी अभ्यास करण्यासाठी बोलावले, हे ऐकून शिवाचे बाबा खंडू खूश झाले, तर कंदिलाच्या उजेडात मातीच्या ओल असलेल्या जमिनीवर अभ्यास करणार्‍या शिवाला मास्तरांच्या घरी विजेच्या दिव्याखाली फरशीवर बसून अभ्यास करायला मिळेल, याचे कोण कौतुक वाटले. आज त्याच शिवा कांबळे यांनी साहित्य आणि समाजकार्यामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. साहित्यासंदर्भातल्या अनेक शासकीय समित्यांवर ते कार्यरत आहेत. दारिद्य्र आणि वंचिततेला मागे सारत त्यांनी स्वकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.
 
खेडेगावात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणारे शिवा कांबळे यांनी पुढे ‘एमए’, ‘बीएड’, ‘एमएड’पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रमही पूर्ण केला. शैक्षणिक गुणवत्तेमुळे ते ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती’चे सदस्य सचिव, तसेच ‘बालभारती मराठी समिती’ सदस्य आणि ‘महाराष्ट्र शासन भाषा सल्लागार समिती’चे सदस्य आणि ‘क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघा’चे प्रसिद्धीप्रमुख असून, ‘लक्षवेध फाऊंडेशन’, ‘ललित प्रतिष्ठान’सारख्या संस्थांसाठीही ते काम करतात. शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यासाठी त्यांना सरकारचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य शिक्षक पुरस्कार’, ‘अण्णा भाऊ साठे उत्कृष्ट काव्यनिर्मिती पुरस्कार’, ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे वाङ्मयीन पुरस्कार’, ‘ज्ञानदीप पुरस्कार’, ‘समाजभूषण पुरस्कार’ असे इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच अखिल भारतीय पत्रकार व पत्रलेखन संघाची ‘राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ही प्राप्त झाली आहे. ते पेशाने शिक्षक असून, ते तळागाळातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्य करतात. प्रचंड कष्ट आणि संशोधन करून त्यांनी लोकशाहिरांच्या जीवनावर-साहित्यावर लिखाण केले. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘समरसता साहित्य परिषदे’च्या साहित्य संमेलनात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
 
तर, शिवा कांबळे यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. नांदेडच्या हळदा गावचे खंडू आणि गिज्ञानबाई दाम्पत्य. उभयतांना सात अपत्ये, त्यांपैकी एक शिवा. खंडू हे मोलमजुरी करत असत. घरी अठराविश्व दारिद्य्र. पण, कांबळे कुटुंब म्हणजे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंच्या कादंबरीतील नायकासारखे नीतिमान आणि सज्जन कुटुंब. खंडू मुलांना सांगत, "तुम्ही शिकलात तर चांगले जगू शकाल.” वडिलांचे म्हणणे शिवा यांच्या मनात रुजले. तसेच लहानपणी शिवा यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरचे व्याख्यान ऐकले. पुढे अण्णा भाऊ साठेंचे साहित्य वाचून त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. त्यातूनच शिक्षण आणि साहित्याची ओढ त्यांना लागली. दहावीनंतर त्यांनी ‘डीएड’ला प्रवेश घेतला. त्याकामीही गावातल्या लोकांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. ‘डीएड’नंतर त्यांना लगेच जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी लागली. एक-दोन वर्षात त्यांनी घरचे कर्ज फेडले आणि पक्के घर बांधायला घेतले. तेव्हा खंडू म्हणाले, "पाटलाच्या घरी १२ वर्षे ‘सालगडी’ म्हणून काम करताना त्यांच्या घरच्या पायर्‍या आणि ओसरी पाहून वाटायचे, पायर्‍या-उंबरठा असलेल्या घरात मी कधीतरी राहू शकेन का?” खंडू यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू मावत नव्हते. शिवा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मात्र, वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू त्यांच्यासाठी जीवनातला मोठा पुरस्कार होता.
 
असो. काही वर्षांनी त्यांचा विवाह सुनिता यांच्याशी झाला. संसार सुरू झाला. या सर्व काळात शिवा यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी एक हजार गावांमध्ये शिक्षणासंदर्भात जागृती केली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दि. १ फेब्रुवारी ते दि. २८ फेब्रुवारी या दिवसांमध्ये रात्रशाळा सुरू केली. रात्री ७ ते ११ शिवा या मुलांचा दहावीचा अभ्यास शाळेत घ्यायचे. शिवा आणि विद्यार्थी शाळेतच झोपायचे. ४ वाजता सगळे उठायचे. ७ वाजेपर्यंत मुलांना शिकवून शिवा आणि मुले त्यांच्या त्यांच्या घरी जायचे. या उपक्रमामुळे प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थीही दहावी उत्तीर्ण झाले. उच्चशिक्षणाकडे त्यांचे पाऊल पुढे गेले. शिवा म्हणतात, "लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने नीतिमान सकारात्मक आयुष्याची प्रेरणा दिली. साहित्य, शिक्षणाची ज्योत तळागाळात पोहोचवण्यासाठी आयुष्यभर कार्य करणार आहेत.” शिवा कांबळे यांच्यासारख्या व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ आहेत.
 
-योगिता साळवी
९५९४९६९६३८




संबंधित मजकूर