शाळेतूनच आरोग्य संस्कार: निरोगी पिढीची पायाभरणी

    29-Sep-2026
 
 
School Health Program
 
अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आरोग्य राखणे हा स्वतंत्र चिंतनाचा विषय झाला आहे. वास्तविक आपली दिनचर्चा बदलल्यानेच, समाजाची, पर्यायाने देशाची ‘दीनचर्या’ होते आहे. अबालवृद्ध आज शारीरिक अथवा मानसिक पीडेने त्रस्त असल्याचे वाचतो. यासाठी भविष्य सुरक्षित आणि सुदृढ करण्यासाठी उत्तम दिनचर्येचे संस्कार शाळेपासून होणे आवश्यक आहे. यासाठीच ‘आरोग्य भारती’तर्फे ’विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम’ हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक चांगल्या सवयी यांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
‘विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम’ हा आरोग्य भारतीचा एक महत्वाचा विषय. बालपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीची ओळख, सुदृढ भविष्यासाठी अत्यंत आवश्यक अशीच. सुदृढ समाजच सुदृढ देशाचे प्रतीक असतो. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असे आपण म्हणतो खरे, मात्र ते आरोग्य टिकविण्याचे संस्कार बालपणापासूनच होणे आवश्यक आहे. मुलांवर चांगल्या सवयी, विचार करण्याची पद्धत, आहार-विहार आणि आदर्श जीवनशैलीचे संस्कार शालेय वयातच होते. यामुळेच शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता, आरोग्यदायी पिढी घडवणारे संस्कारकेंद्र होणे, काळाची गरज झाले आहे. याच उद्देशात ‘आरोग्य भारती’चा ‘विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम’ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ’शाळेतून आरोग्य संस्कार-निरोगी पिढीची पायाभरणी’ या कार्यक्रमात, देशाच्या भविष्यातील आरोग्याचा विचार आहे.
 
आजच्या मुलांसमोरील आरोग्य आव्हाने
 
आज मुलांची जीवनशैली वेगाने बदलत आहे. मैदानी खेळ, शारीरिक श्रम आणि निसर्गाशी असलेला संपर्क घटत असतानाच मोबाईल, दूरचित्रवाणी, संगणक आणि अन्य डिजिटल माध्यमांचा वापर सातत्याने वाढतो आहे. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ, शीतपेये, अनियमित आहार आणि अपुरी झोपेसारख्या सवयीही वाढत्या आहेत. यामुळे बालपणातच लठ्ठपणा, अ‍ॅनिमिया, दातांचे विकार, दृष्टिदोष, झोपेच्या समस्या आणि मानसिक तणावासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आजची गरज केवळ उपचाराची नसून, निरोगी राहाण्यासाठी आवश्यक आरोग्यसंस्कारचीही आहे.
 
आरोग्य शिक्षणापासून आरोग्य संस्काराकडे
 
मुलांना फक्त आरोग्यविषयक माहिती देणेच पुरेसे नसून, ती माहिती त्यांच्या दैनंदिन आचरणाचा भाग झाली पाहिजे. हात धुण्याचे महत्त्व सांगण्याबरोबरच, योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावणे, व्यायामाचे महत्त्व सांगण्याबरोबर, दररोज व्यायामासाठी वेळ देणे, पौष्टिक आहाराबद्दल शिकवण्याबरोबर, डब्यात पौष्टिक पदार्थ आणण्यास प्रोत्साहन देणे, हीच आरोग्य शिक्षणाची योग्य दिशा आहे.
 
झोप : आरोग्याचा दुर्लक्षित आधारस्तंभ
 
आरोग्यसंस्कारांत पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप महत्त्वाची आहे. आज अनेक मुलांची झोप अभ्यास, स्क्रीनटाईम किंवा बदललेल्या दिनचर्येमुळे प्रभावित होत आहे. झोपेच्या काळात शरीरात अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया घडत असतात. विशेषतः गाढ झोपेत ‘ग्रोथ हार्मोन’ मोठ्या प्रमाणात स्रवते. मुलांच्या वाढीसाठी याची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. हाडांची आणि स्नायूंची वाढ, शरीरातील ऊतींची दुरुस्ती, तसेच चयापचयाशी संबंधित प्रक्रियांमध्ये ‘ग्रोथ हार्मोन’चे योगदान लक्षणीय. म्हणूनच, मुलांना वेळेवर झोपण्याची आणि वयानुसार पुरेशी झोप घेण्याची सवय लावणेही, आरोग्यसंस्काराचाच एक भाग आहे. केवळ ‘लवकर उठा’ असे सांगण्यापेक्षा वेळेवर झोपून पुरेशी झोप घ्या, हा संदेशही तितकाच महत्त्वाचा.
पुरेशी झोप एकाग्रता, स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता, भावनिक संतुलन आणि दिवसभरातील कार्यक्षमतेशीही संबंधित आहे. त्यामुळे अभ्यासासाठी झोप कमी करणे योग्य नसून, चांगली झोपच चांगल्या अभ्यासाचीही पूर्वअट आहे.
 
स्क्रीन टाईम : आधुनिक जीवनातील नवे आव्हान
 
मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञान पूर्णपणे टाळणे शय नाही, तसेच आवश्यकही नाही. मात्र, त्याचा मर्यादित वापर शिकवणे गरजेचे आहे. विशेषतः झोपण्यापूर्वी दीर्घ काळ स्क्रीनची सवय, झोपेवर परिणाम करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिस्त शिकवणे, ही आजची गरज आहे. अभ्यासासाठी स्क्रीन वापरताना; स्क्रीनमुळे झोप आणि आरोग्यहानी होणार नाही याची काळजी घ्या, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.
 
भारतीय जीवनशैलीचे आरोग्यदायी संस्कार
 
भारतीय परंपरेत आरोग्याचा विचार हा केवळ आजार नसण्यापुरताच मर्यादित नाही. योग्य दिनचर्या, ऋतुचर्या, संतुलित आहार, व्यायाम, योग, स्वच्छता आणि मानसिक संतुलनालाही यात महत्त्व आहे. या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनासोबत समन्वय साधून, विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार आरोग्य शिक्षण दिले जाऊ शकते. सकाळी सूर्यनमस्कार, योगाभ्यास, पौष्टिक स्थानिक अन्नपदार्थ, स्वच्छतेच्या सवयी, योग्य झोप आणि ध्यान या गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम मोठे असतात.
 
विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम
 
‘विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम’ हा वर्षभर चालणारा उपक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नियमित प्राथमिक आरोग्य तपासणी, उंची, वजन आणि पोषणस्थितीचे निरीक्षण, दृष्टी व दंत आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छतेचे प्रशिक्षण, पौष्टिक आहार व जंकफूडविषयी जनजागृती, नियमित व्यायाम, योग व सूर्यनमस्कार, योग्य झोप आणि दिनचर्येचे महत्त्व, स्क्रीन टाईम व डिजिटल शिस्त, मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन, प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, स्वच्छ पाणी व स्वच्छ शालेय परिसर, व्यसनांपासून दूर राहण्याचे संस्कार, पर्यावरण व आरोग्य यांचा संबंध यांचा समावेश असतो.
 
प्रत्येक शाळेत आरोग्यदूत
 
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळण्यासाठी, प्रत्येक वर्गातून काही विद्यार्थ्यांना आरोग्यदूत म्हणून प्रशिक्षित करता येईल. हे आरोग्यदूत स्वच्छता, हात धुणे, पौष्टिक आहार, व्यायाम, योग, झोप आणि पर्यावरणासंबंधी जनजागृती उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्यात नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि आरोग्याविषयी संवेदनशीलता निर्माण होईल.
शिक्षक आणि पालक : आरोग्यसंस्काराचे सहकारी : मुले त्यांचे पालक आणि शिक्षक यांचे अनुकरण सर्वात जास्त करतात. पालक स्वतः नियमित झोप, संतुलित आहार, व्यायाम आणि स्क्रीनचा संयमित वापर करत असतील, तर मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतोच. शिक्षकांनीही आरोग्यदायी जीवनशैलीचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच, शाळा-पालक-आरोग्यतज्ज्ञांतील समन्वय विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रमाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
निरोगी बालक म्हणजे निरोगी राष्ट्राची गुंतवणूक
 
एक निरोगी विद्यार्थी म्हणजे, एक निरोगी कुटुंब घडविण्याची सुरुवात. हजारो निरोगी विद्यार्थी म्हणजे, भविष्यातील निरोगी समाजाचीच पायाभरणी. आज मुलांना योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक संतुलन, स्वच्छता आणि व्यसनमुक्त जीवनाचे संस्कार दिल्यास, अनेक जीवनशैलीजन्य आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रमाकडे शिक्षणव्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून पाहण्याची गरज आहे.
 
पालकांनी मुलांसाठी आजपासून अंगीकारावयाच्या दहा आरोग्यसवयी
 
१. नियमित व पुरेशी झोप : मुलांना त्यांच्या वयानुसार पुरेशी झोप मिळेल, याची काळजी घ्या. रोज ठरावीक वेळी झोपणे आणि उठणे ही सवय लावा. गाढ झोपेतच वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन’चा स्राव होतो.
२. सकस आणि संतुलित आहार : घरगुती, ताजे आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या. फळे, भाज्या, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि आवश्यक प्रथिनांचा योग्य समावेश करा.
३. जंकफूड आणि गोड पेयांवर नियंत्रण : फास्ट फूड, शीतपेय आणि अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करा.
४. दररोज शारीरिक हालचाल : मैदानी खेळ, सायकलिंग, पोहणे, धावणे, योग किंवा इतर व्यायामासाठी दररोज वेळ द्या.
५. स्क्रीन टाईमला मर्यादा : मोबाईल, टीव्ही आणि गेम्सचा वापर ठरावीक वेळेत होईल, याची काळजी घ्या. विशेषतः झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळा.
६. पुरेसे पाणी पिणे : दिवसभर नियमित पाणी पिण्याची सवय लावा. शीतपेयांऐवजी साध्या पाण्यालाच प्राधान्य द्या.
७. वैयक्तिक स्वच्छता : जेवणापूर्वी व शौचाकडून आल्यानंतर हात धुणे, दिवसातून दोन वेळा दात घासणे, नखे कापणे आणि स्वच्छ कपडे वापरण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावा.
८. मानसिक आरोग्यासाठी संवाद : मुलांशी दररोज मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अडचणी, भीती आणि चिंता ऐका. केवळ गुणांपेक्षा त्यांच्या भावनिक स्वास्थ्याला महत्त्व द्या.
९. निसर्ग आणि कुटुंबासाठी वेळ : दररोज काही वेळ निसर्गात किंवा कुटुंबासोबत घालवा. मैदानी खेळ आणि कौटुंबिक उपक्रमांना प्रोत्साहन द्या.
१०. पालकांनी स्वतःच आदर्श व्हावे : मुलांना आरोग्याच्या सवयी सांगण्यापेक्षा, त्या आचरणात आणणे अधिक प्रभावी आहे. पालकांचे आचरण मुलांसाठी सर्वांत मोठे आरोग्यशिक्षण असते. मुलांना आरोग्याचे धडे देण्यापेक्षा, आरोग्यदायी जीवन जगणे हाच सर्वांत प्रभावी आरोग्यसंस्कार.

शेवटी एक संकल्प
 
आपण मुलांना गणित, विज्ञान, भाषा आणि तंत्रज्ञान शिकवतो. त्याचबरोबर त्यांना शरीराची भाषा आणि मनाचे आरोग्यही समजून घेण्याचे शिक्षण दिले पाहिजे. कारण, उत्तम गुण मिळवणारा विद्यार्थी महत्त्वाचाच; पण निरोगी शरीर, संतुलित मन, चांगल्या सवयी आणि सामाजिक जबाबदारी असलेला नागरिक घडवणेच शिक्षणाचे खरे यश आहे. आज शाळेतून रुजवलेला एक आरोग्यसंस्कारच, संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. तेव्हा शाळेतूनच आरोग्य संस्कार करूया! निरोगी बालक घडवूया! निरोगी समाज आणि समर्थ भारताची पायाभरणी करूया!
 
-डॉ. हेमंत पराडकर
(लेखक आयुर्वेद महाविद्यालय, शीव, मुंबई येथे, कायचिकित्सा विभागात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.)




संबंधित मजकूर