एके काळी यशाचा मार्ग म्हणजे चांगले शिक्षण, प्रास्थापित पदवी, चांगली नोकरी आणि हळूहळू पदोन्नती आणि मोठे पद! पदवी म्हणजे करिअरची सुरुवात आणि मोठे पद म्हणजे यशाचे शिखर. मात्र, ‘झेन-झी’ या समीकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहते. याचा अर्थ या पिढीला शिक्षणाचे महत्त्व नाही, असा नाही. उलट, शिक्षणातून व्यवहारात काय मिळते आणि भविष्यात त्याचा उपयोग काय, हा प्रश्न ती स्पष्ट विचारते. पदवी मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय नसून, कौशल्ये, अनुभव, रोजगाराच्या संधी आणि स्वविकासाला मिळणार्या दिशेलाही त्यांनी अधिक महत्त्व दिले आहे.
पदवीची किंमत की पदवीचे मूल्य?
वाढता शैक्षणिक खर्च आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, ‘झेन-झी’ शिक्षणाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहते. केवळ पदवी म्हणजे रोजगार हमी नाही, ही जाणीव त्यांना आहे. ‘ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट २०२५’नुसार, पाचपैकी एका पदवीधराला शिक्षणामुळे, व्यावसायिक संपर्क निर्माण करण्यात अपयश आले, तर ३६ टक्के पदवीधरांना नोकरीसाठी शिक्षणसंस्थेकडून अधिक मदतीची अपेक्षा होती असे वाटते. यावरूनच शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगार यांच्यात अधिक समन्वयाची असलेली गरज स्पष्ट होते. अन्यथा, अपुर्या तयारीचे पदवीधर आणि योग्य मनुष्यबळाच्या शोधातील कंपन्या, यांच्यातील दरी वाढतच राहण्याची शयता आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पदवी किती पुरेशी?
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ’एआय’मधील वेगवान बदलांमुळे, हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा झाला आहे. आज एखाद्याचे पदवी मिळाल्याने शिक्षण पूर्ण झाले, असे मानू शकत नाही. बदलत्या जगात नवीन कौशल्ये शिकणे आणि विद्यमान कौशल्ये विकसित करणे, ही निरंतर प्रक्रिया झाली आहे. ‘इंडियाज जेन-झी आऊटलुक २०२६’नुसार, ६५ टक्के ‘जेन-झी’ तरुणांना करिअरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वाटते की, ‘एआय’च्या जमान्यात केवळ पदवीच पुरेशी नाही. त्यामुळे ८२ टक्के तरुण ‘एआय’ किंवा ‘ जनरेटिव्ह एआय’चा कौशल्यविकासासाठी वापर करत आहेत. तर ७५ टक्के तरुणांना स्पर्धेत राहण्यासाठी, योग्य कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक वाटते.
मात्र, यात एक विरोधाभासही आहे. सतत शिकत राहणे ‘जेन-झी’ला मान्य आहे; पण यातून निर्माण होणारा दबाव थकवणाराही ठरतो. याच अहवालात ६० टक्के तरुणांनी सततच्या दबावामुळे, थकवा जाणवत असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच, भविष्यात केवळ शिकणेच पुरेसे नाही; काय शिकायचे, किती शिकायचे आणि या शिकण्याच्या प्रक्रियेत स्वतःचा समतोल कसा राखायचा, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
सोशल मीडिया आणि यशाची नवी कल्पना :
‘जेन-झी’च्या यशाच्या कल्पनेवर समाजमाध्यमांचाही प्रभाव आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब, ‘टिकटॉक’ यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे, पारंपरिक शिक्षण आणि नोकरीबाहेरच्या करिअरच्या नव्या वाटा दिसू लागल्या आहेत. एका अमेरिकन अहवालानुसार, ५७ टक्के ‘जेन-झी’ तरुणांना इन्फ्लुएन्सर होण्याची इच्छा आहे. मात्र, समाजमाध्यम वापरणार्यांपैकी केवळ ४.७ टक्केच लोक, कन्टेन्टमधून प्रत्यक्ष उत्पन्न मिळवतात. त्यांपैकी अनेकजण, वर्षाला जवळपास १५ हजार डॉलरपेक्षाही कमीच कमावतात. यातूनच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे समाज माध्यम यशाचे नवे मार्ग दाखवतो; पण ते मार्ग नेहमीच सोपे किंवा यशस्वी ठरतीलच असे नाही. त्यामुळे ‘जेन-झी’समोर पारंपरिक करिअरचा मार्ग आणि डिजिटल जगातील नव्या संधी, या दोन्हींचे वास्तव समजण्याचे आव्हान आहे.
मोठे पद की चांगले आयुष्य?
पूर्वी करिअर म्हणजे पदोन्नती, अधिकार आणि मोठे पद अशी कल्पना प्रबळ होती. मात्र, आज तरुणांसाठी यश म्हणजे फक्त ‘बॉस’ होणे नाही. ‘एमेरिटस’च्या अहवालानुसार, ७४ टक्के ‘जेन-झी’ तरुणांनी काम आणि आयुष्यातील समतोलाच अधिक महत्त्व दिले. तसेच ६५ टक्के तरुणांना, यशस्वी करिअरसाठी नेतृत्व किंवा ‘सिनिअर लीडरशिप’ मिळवणे आवश्यक वाटत नाही. अर्थात ‘जेन-झी’ महत्त्वाकांक्षी नाही, असे नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ एखाद्या संस्थेच्या शिडीवर वर चढत जाणे नाही; तर आपल्या कौशल्यांना अर्थपूर्ण कामाशी जोडणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आणि स्वतःचे आयुष्यही जगणे आहे. स्वतःसाठी वेळ, मानसिक स्वास्थ्य, स्वायत्तता आणि जीवनातील समाधानालाही त्यांनी यशाचा भाग मानले आहे.
परदेशी शिक्षणाचे बदलते आकर्षण
‘जेन-झी’ परदेशी शिक्षण नाकारत नसली, तरी त्याचा खर्च, व्हिसा-नियम, सुरक्षितता आणि शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी अधिक काळजीपूर्वक तपासत आहे. अहवालानुसार, परदेशात शिक्षणाचा विचार करणार्यांपैकी, ४८ टक्केजणांची गेल्या वर्षभरात ही इच्छा कमी झाली, तर अमेरिके बाबतच्या आकर्षणात सर्वाधिक घट दिसली. त्याचवेळी, भारत न सोडता आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याकडचा कलही वाढत आहे. महाविद्यालयपूर्वगटातील ८७ टक्के आणि उच्च शिक्षणात सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या ९२ टक्के तरुणांनी, भारतातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्येच शिक्षणात रस दाखवला. यातील ६९ टक्के विद्यार्थ्यांना व्हिसाची अनिश्चितता टाळण्यासाठी, भारतातील आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा भाग होणे अधिक पसंत आहे. अशा हायब्रीड मॉडेलची पसंती २७ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, ‘जेन-झी’ला जागतिक संधी मिळवण्यासाठी, देश सोडणे हाच एकमेव मार्ग असल्याचे वाटत नाही.
कामात उद्देशही हवा :
‘जेन-झी’साठी करिअर हा केवळ आर्थिक स्थैर्याचा मार्ग नाही. आपल्या कामाला काही अर्थ असावा आणि त्याचा समाजावर किंवा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम व्हावा, अशी अपेक्षाही आहे. याच अहवालानुसार, ७९ टक्के तरुणांना त्यांच्या करिअरमधून पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान द्यायचे आहे. म्हणजेच यशाचे समीकरण हळूहळू व्यक्तिकेंद्रित न राहता, समाजाभिमुख होत आहे. ‘जेन-झी’ला पदवीपेक्षा अर्थपूर्ण आणि उपयुक्त शिक्षण हवे आहे. तिला असे शिक्षण हवे आहे जे केवळ परीक्षेसाठीच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनासाठी त्यांना तयार करेल; जे ज्ञानाबरोबर कौशल्य देईल; जे नोकरीच्या जगाशी जोडेल आणि बदलत्या परिस्थितीत पुन्हा शिकण्याची क्षमता विकसित करेल.
म्हणूनच, आजच्या शिक्षणसंस्थांसमोरचा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांना पदवी कशी द्यायची, हा नाही. खरा प्रश्न आहे, पदवीच्या पलीकडे त्यांना बदलत्या जगासाठी कसे तयार करायचे. कारण ‘जेन-झी’साठी शिक्षणाचे मूल्य काय शिकलात, ते कुठे वापरू शकता आणि त्यातून तुम्हाला कसे आयुष्य जगता येईल, यावर ठरत आहे.
-डॉ. शुभांगी पारकर