तंत्रज्ञानाच्या बाबतीत माणूस विलक्षण आशावादीच. स्वतःच्या शोधांपासून निर्माण होणार्या संकटांचा अंदाज येण्याआधीच, तो त्या शोधाच्या बाजारमूल्याचा अंदाज बांधतो. वाफेचे इंजिन आले, तेव्हा उद्योगाचे भवितव्य दिसले; त्याच इंजिनामुळे प्रदूषण, शहरीकरण आणि श्रमाच्या स्वरूपातील बदल नंतर दिसले. अणू विभाजनानंतर ऊर्जा दिसली; ‘हिरोशिमा’ ही दुसरी बाजू नंतर समोर आली. आता कृत्रिम बुद्धिमत्तेची वेळ आहे. फरक एवढाच की, यावेळी माणूस स्वतःच्या बुद्धीचीच एक प्रतिकृती तयार करून तिला कामाला लावत आहे. मात्र, त्याच वेळी प्रतिकृती हुशार होत चालल्याने मूळ मालकाने सावध व्हावे, या साध्या गोष्टीचा त्याला विसर पडला आहे.
एका ‘एआय’च्या प्रारूपाने ‘बॉट्स’च्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावरील माहिती मिळवण्याचा प्रयत्न १६ हजारांहून अधिक वेळा केला. अर्थातच, ही माहिती काही गुप्त नव्हती. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या माहितीवर ‘एआय’ने दरोडा घातला, असे थेट म्हणता येणार नाही. पण, कामातील अडथळा दूर करण्यासाठी ‘एआय’ने दुसरा मार्ग शोधला, हाच यातील महत्त्वाचा भाग. म्हणजेच, आता ‘एआय’ला काम कसे करायचे, हे सांगण्याची गरजच कमी होत आहे. माणसासाठीची ही एक सोय आहे; पण यंत्रासाठीची ती स्वायत्तता आहे. कालपर्यंत संगणक हा आज्ञाधारक होता. आज ‘एआय’ साहाय्यक आहे, उद्या तो एजंट असेल. एखादे काम दिल्यानंतर माहिती शोधणे, संकेतस्थळे तपासणे, कागदपत्रे वाचणे, संगणकीय आज्ञावली लिहिणे आणि पुढची कृती करणे, हे सारे तो स्वतः करू शकतो. त्यामुळे ‘एआय’चा प्रश्न व्यवस्थापनाचा, अर्थकारणाचा आणि अखेरीस सत्तेचा प्रश्न होत आहे.
जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या ‘एआय’मध्ये अब्जावधी डॉलर्स ओतत आहेत. त्यांना यात उत्पादकता, मनुष्यबळाची बचत आणि वेग दिसतो. बाजाराला वेग हवाच असतो; नियंत्रणाला मात्र वेळ लागतो. ‘एआय’च्या बाबतीत ही तफावत अधिक धोकादायक आहे. कारण, यावेळी तंत्रज्ञानाला स्वतःचे मार्ग शोधण्याची क्षमताही आपणच देत आहोत. जगातील प्रमुख तीन ‘एआय’ प्रारूपांची निर्मिती करणार्या कंपन्यांनीही त्यांची प्रारूपे चुका करत असल्याचे अलीकडेच मान्य केले. ऑस्ट्रेलियातही एक सरकारी वेबसाईट ‘एआय’च्या माध्यमातून हॅक झाल्याचे समोर आले होते. बिल गेट्स यांनी तर ‘एआय’च्या संभाव्य विध्वंसक धोक्याबद्दल गंभीर इशाराच दिला आहे. जागतिक संघर्षाचा दाखला देत, "ही शक्ती चुकीच्या हातात गेल्यास एक अब्ज लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल,” अशी शयताच त्यांनी वर्तवली. हा इशारा दुर्लक्षित करता येणार नाही.
‘एआय’चे धोके केवळ भविष्यकालीनच नाहीत. बनावट ध्वनिचित्रफिती, आर्थिक फसवणूक, व्यक्तींच्या ओळखीचा गैरवापर, संगणकीय हल्ले आणि जैविक ज्ञानाच्या धोकादायक प्रसाराला ‘एआय’ने वेग दिला. सध्या सुरू असलेल्या युद्धातही याचा वापर सर्रास होत आहे. आज अनेक ‘एआय एजंट्स’ सुरक्षा चाचण्यांमध्ये त्यांच्यावरील मर्यादा चुकविण्याचा प्रयत्न करून अनपेक्षित मार्गांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ, यंत्रांना मानवी बुद्धी प्राप्त झाली, असा घेता येणार नाही. पण, आपल्याला मानवी बुद्धी असलेले यंत्र नको; तसेच दिलेले उद्दिष्ट वेगळ्या पद्धतीने साध्य करणारेही यंत्र नकोच.
या ‘एआय’च्या धोक्याचा संयुक्त राष्ट्रांसमोरच प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. जगाला डिजिटल सुरक्षा आणि ‘एआय’च्या जबाबदार वापराबाबत मार्गदर्शन करणार्या संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर ‘एआय’ने अवैध प्रवेशाचा प्रयत्न केला. त्यावरची माहिती सार्वजनिक होती, हे खरेच. पण, सार्वजनिक म्हणजे अनिर्बंध नाही. डिजिटल जगात ‘उघडे’ आणि ‘मोकळे’ यांतील फरक स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.
‘एआय’चा विकास आपल्याला थांबवायचा नाही, तो थांबवणे शयही नाही. तंत्रज्ञानाच्या इतिहासात माणसाने यंत्रांना अधिक शक्ती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता एक पाऊल पुढे आहे, तिला आपण स्वायत्तताही देत आहोत. शक्तीवर नियंत्रण ठेवणे अवघड, स्वायत्त शक्तीवरचे नियंत्रण त्याहून अवघड. त्यामुळे ‘एआय’ची खरी परीक्षा ‘थांब म्हटल्यावर थांबते का’ यातच आहे. शेवटी प्रश्न ‘एआय’ माणसापेक्षा बुद्धिमान होईल का, हा नसून माणूस त्यावर नियंत्रण ठेवण्याइतका शहाणा राहील का? हाच असणार आहे.
-कौस्तुभ वीरकर