भारताची ‘आयर्न’कन्या


 Sharayu Fartode Ironman 70.3
 
‘नीस’च्या ‘आयर्नमॅन ७०.३’ जागतिक अजिंयपद स्पर्धेत, भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा गौरव वाढवणार्‍या नागपूरच्या शरयू फरतोडेविषयी...
 
काहींचे कर्तृत्व पदकांनी मोजता येते, काही विक्रमांनी, तर काही सेकंदांच्या फरकाने. पण, काही कामगिरी अशा असतात, ज्यांचा अर्थ कोणत्याही पदकापेक्षा मोठा असतो. कारण त्या केवळ एखाद्या खेळाडूच्या विजयाची कहाणी नसतात, तर त्यामागे वर्षानुवर्षांची मेहनत, कुटुंबाचा विश्वास, शिस्त आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेला अढळ विश्वासांची साक्ष देत असतात. भारतीय नौदलातील अग्निवीर आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू शरयू संजय फरतोडे हिचा, ‘आयर्नमॅन ७०.३’ जागतिक अजिंयपद स्पर्धेपर्यंतचा प्रवास असाच प्रेरणादायी आहे.
 
नागपूरच्या जलतरण तलावात वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सुरू झालेला शरयूचा प्रवास, फ्रान्समधील ‘नीस’च्या आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचापर्यंत पोहोचला. ‘नीस’ येथे झालेल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ जागतिक अजिंयपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत, शरयूने तब्बल ११३ किमीचे ‘त्रिक्रीडा’ अंतर ८ तास २१ मिनिटे ३१ सेकंदांत पूर्ण केले. या स्पर्धेत १.९ किमी समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे, अशा तीन टप्प्यांचा समावेश असतो. त्यामुळे ही स्पर्धा शारीरिक ताकदीबरोबरच, मानसिक खंबीरतेचीही कसोटीच ठरते.
 
शरयूने या स्पर्धेत २५ ते २९ वर्षे महिला वयोगटात सहभाग घेतला होता. यामध्ये तिने आपल्या विभागात ३२७वा क्रमांक, तर महिला गटात २,६७५वा क्रमांक मिळवला. जगभरातील खेळाडूंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तिने, अत्यंत आव्हानात्मक असलेली ‘आयर्नमॅन’ शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. तिच्यासाठी हा भारताचा तिरंगा घेऊन, जगाच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा अभिमानाचा क्षण होता.
 
शरयूच्या या कामगिरीची दखल भारतीय नौदलानेही घेतली. नौदलाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरही तिचे अभिनंदन करण्यात आले. ‘फिजिकल ट्रेनर’ म्हणून कार्यरत असलेली अग्निवीर आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू म्हणून, तिच्या कामगिरीचा गौरवही करण्यात आला. तिचे छायाचित्र आणि स्पर्धा पूर्ण केल्याचा व्हिडिओही, नौदलाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
 
मात्र, शरयूची ही झेप एका दिवसाची नाही. वयाच्या चौथ्याच वर्षी तिच्या पालकांनी तिला, जलतरणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. स्केटिंग, बास्केटबॉल, कराटे आणि जलतरण अशा विविध खेळांचा अनुभव घेतल्यावर, तिची खरी आवड जलतरणातच असल्याचे लक्षात आले. पालकांनी तिच्या आवडीला दिशा दिली आणि वयाच्या आठव्या वर्षापासून म्हणजे २००८ पासून, तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.
 
पुढे शालेय, विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही तिने प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये ‘बायथेल’मधील कामगिरीच्या जोरावर, तिची इजिप्तयेथील बायथेल जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली. शिक्षणाचीही साथ कायम ठेवत, तिने ‘बीएससी’ची पदवी संपादन केली. त्यानंतर ‘लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर’ येथे तिने पुढील शिक्षण घेतले. प्रशिक्षण आणि पात्रता पूर्ण केल्यावर, ती भारतीय नौदलात ‘फिजिकल ट्रेनर’ म्हणून रुजू झाली.
 
नौदलाची शिस्त आणि क्रीडा पार्श्वभूमीच्या बळावरच, शरयूने पुढे ‘ट्रायथलॉन’कडे वळण्याचा निर्णय घेतला. अंदमान आणि कारवार येथील स्पर्धांपासून, तिच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली. त्यानंतर दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी, गोवा येथे झालेल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ स्पर्धेत तिने १.९ किमी जलतरण, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे, असे ११३ किमीचे अंतर ७ तास ५ मिनिटांत पूर्ण केले. या कामगिरीनंतर तिची जागतिक अजिंयपद स्पर्धेसाठी निवड झाली. शरयूच्या या प्रवासात, आई-वडिलांचा वाटाही मोठा आहे. वडील संजय फरतोडे हे ‘एलआयसी’ सल्लागार असून, स्वतः नियमित धावतात आणि ‘हाफ मॅरेथॉन’मध्येही सहभागी होतात. तर, आई अर्चना फरतोडे या उच्च माध्यमिक शिक्षिका आहेत. लहानपणापासून मुलीच्या क्रीडाप्रवासाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन, तिच्या यशाचा महत्त्वाचा आधार ठरले. ‘नीस’चा प्रवास पूर्ण झाला असला, तरी शरयूचे स्वप्न मात्र आणखी मोठे आहे. २०२८ मध्ये ‘फुल आयर्नमॅन’ पूर्ण करण्याचे तिचे लक्ष्य आहे. ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे, असे तब्बल २२६ किमीचे आव्हान तिच्यासमोर असेल. ११३ किमीची ‘आयर्नमॅन ७०.३’ शर्यत पूर्ण केल्यावर, आता या दुप्पट अंतराच्या आव्हानासाठी ती सज्ज झाली आहे.
 
२०२८चे ‘फुल आयर्नमॅन’ हे तिचे पुढचे स्वप्न आहे. ते स्वप्नही याच जिद्दीने, शिस्तीने आणि भारताचा तिरंगा मनात ठेवून पूर्ण करण्यासाठीकडेच शरयूची वाटचाल सुरू आहे. भारतीय नौदलातील अग्निवीर आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू शरयू फरतोडे हिला, दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर