विलेपार्ल्यातून मलबार पोपटाची दुर्मीळ नोंद; दाट जंगलातील पक्ष्याचा महानगरात वावर

माधुरी ताईंनी टिपला जगात फक्त पश्चिम घाटात सापडणारा पक्षी ; मुंबईतील नागरी जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित

    28-Sep-2026

malabar parakeet mumbai


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात पश्चिम घाटाचा प्रदेशनिष्ठ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार पोपटाची (निळ्या पंखाचा पोपट) दुर्मीळ नोंद झाली आहे (malabar parakeet mumbai). शहारातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या विलेपार्ले येथील नागरी वस्तीमधून पक्षीनिरीक्षक माधुरी देशमुख यांनी आपल्या घराच्या खिडकीतून या पक्ष्याचे निरीक्षण केले आहे (malabar parakeet mumbai). विशेष म्हणजे, देशमुख यांनी अशाच पद्धतीने खिडकीतून पक्षीनिरीक्षण करताना आतापर्यंत तब्बल १५० पक्षीप्रजातींची नोंद केली आहे (malabar parakeet mumbai). त्यामुळे ही नोंद केवळ एका दुर्मीळ दर्शनापुरती मर्यादित न राहता मुंबईच्या नागरी परिसरातील पक्षीविविधतेकडे लक्ष वेधणारी ठरली आहे. (malabar parakeet mumbai)

 

मलबार पोपटला ब्लू-विंग्ड पॅराकीट म्हणजेच निळ्या पंखाचा पोपट असेही म्हटले जाते. हा पश्चिम घाटाला प्रदेशनिष्ठ असलेला निवासी पक्षी आहे. हा पक्षी प्रामुख्याने दाट वनक्षेत्रात अधिवास करणारा पक्षी आहे. त्याचा अधिवास प्रामुख्याने सदाहरित, दमट आणि चांगल्या प्रकारे वृक्षाच्छादित वनांशी संबंधित आहे. पश्चिम घाटातील वनक्षेत्रांमध्ये हा पोपट अनेकदा लहान थव्यांमध्ये आढळतो. त्यामुळे या पोपटाचा मुंबईतील विलेपार्लेेमधील वावर पूर्णपणे अभूतपूर्व असल्याचे पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा दक्षिण भाग, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, कर्नाळा आणि अलिबाग परिसरात या पोपटाचा दुर्मीळ वावर यापूर्वी टिपण्यात आला आहे. मात्र, विलेपार्ल्यासारख्या नागरी वस्तीत खिडकीतून झालेली त्याची नोंद ही विशेष लक्षवेधी आहे.

 

माधुरी देशमुख यांचे पक्षीनिरीक्षण आणखी एका कारणामुळे उल्लेखनीय आहे. त्यांनी घराच्या खिडकीतून आतापर्यंत सुमारे १५० पक्षीप्रजातींची नोंद केली आहे. पक्षीनिरीक्षणासाठी मोठ्या जंगलात किंवा अभयारण्यात जाणे आवश्यकच असते असे नाही, हे त्यांच्या निरीक्षणातून स्पष्ट होते. शहरातील झाडे, उद्याने, मोकळ्या जागा, जलस्रोत आणि घरांच्या आसपासची हिरवाई हे पक्ष्यांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अधिवास ठरू शकतात. मुंबई महानगर प्रदेशाच्या जैवविविधतेवरील अभ्यासातही नागरी भागात विविध पक्षीप्रजातींच्या नोंदी झाल्या असून, वनक्षेत्राशी संबंधित प्रजातींची उपस्थिती ही शहरातील उरलेल्या हिरव्या अधिवासांचे महत्त्व अधोरेखित करते. विलेपार्ल्याच्या एका खिडकीत दिसलेला मलबार पोपट त्यामुळे केवळ एका पक्ष्याचे दर्शन राहत नाही. मुंबईच्या काँक्रीटच्या विस्तारातही उरलेल्या झाडांमध्ये, हिरव्या पट्ट्यांमध्ये आणि वनक्षेत्रांशी जोडलेल्या अधिवासांमध्ये पश्चिम घाटाशी संबंधित जैवविविधतेचे धागे टिकून आहेत, याची ही नोंद लक्षवेधी आठवण करून देते.

 
माझ्या घराच्या खिकडीसमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर हा पक्षी बसलेला मला आढळून आला. यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात हा पक्षी मला आढळून आला होता. मात्र, त्याचे छायाचित्र टिपणे शक्य झाले नव्हते. मात्र, सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी पुन्हा हा पक्षी पिंपळाच्या झाडावर निवांत बसलेला दिसल्याने त्याचे छायाचित्र टिपणे शक्य झाले. - माधुरी देशमुख, पक्षी निरीक्षक




संबंधित मजकूर