महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित

१५ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत; नाशिकमध्ये डिसेंबरमध्ये पुरस्कार वितरण

    28-Sep-2026


maharashtra pakshimitra
 
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पक्षी संवर्धन, संशोधन, जनजागृती, पक्षी उपचार व सुश्रुषा तसेच पक्षीविषयक पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून ‘महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार-२०२६’साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत (maharashtra pakshimitra). प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ असून, पुरस्कारांचे वितरण २६ व २७ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या ३९ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. (maharashtra pakshimitra)
 
 
पक्षी संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे २०१९ पासून विविध पुरस्कार देण्यात येतात. यंदा स्व. रमेश लाडखेडकर स्मृती महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती महाराष्ट्र पक्षी संशोधन पुरस्कार, नामदेवराव बहादुरे पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार, रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार, स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार आणि श्रीमती सुशीला पाटकर स्मृती महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.जीवन गौरव पुरस्कारासाठी पक्षिमित्र चळवळीत दीर्घकाळ कार्य केलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचा विचार केला जाणार आहे.
 
 
संशोधन पुरस्कारासाठी पक्ष्यांचा अभ्यास, संशोधन निबंध, प्रकल्प, अहवाल आणि त्यातून झालेल्या संवर्धन कार्याचा विचार होईल. संवर्धन व सुश्रुषा पुरस्कारासाठी अधिवास संवर्धन, जखमी पक्ष्यांवरील उपचार आणि पुनर्वसन क्षेत्रातील योगदान विचारात घेतले जाईल. पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कारांसाठी पक्षी संवर्धन व जनजागृतीमध्ये संबंधित माध्यमातून दिलेल्या योगदानाचे मूल्यमापन करण्यात येईल.पुरस्कारांसाठी स्वतः किंवा अन्य व्यक्ती अथवा संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय अर्ज करू शकणार नाहीत. संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरूपात [email protected] या ई-मेलवर किंवा महाराष्ट्र पक्षिमित्रच्या अमरावती येथील कार्यालयीन पत्त्यावर पाठविता येईल. अर्जाचा नमुना आणि सविस्तर माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.




संबंधित मजकूर