उजनीतील ‘चोच’ माशाच्या सात आनुवंशिक वंशांचा उलगडा

    28-Sep-2026
ujani dam



मुंबई (विशेष प्रतिनिधी) –
उजनीत गोड्या पाण्यात आढळणारा आणि महाराष्ट्रात ‘चोच मासा’ किंवा ‘सुई मासा’ म्हणून परिचित असलेल्या निडलफीश गार या माशामागे मोठी आनुवंशिक विविधता दडलेली असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे (ujani dam). बाह्य स्वरूपावरून एकाच प्रजातीचा वाटणारा हा मासा आनुवंशिक पातळीवर वेगवेगळ्या वंशांचा समूह असू शकतो, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे (ujani dam). कारण, या माशाचे सात वेगळे आनुवंशिक वंश संशोधकांना आढळून आले आहेत. (ujani dam)
 
चोच मासा हा लांबट शरीर आणि निमुळत्या चोचीसारख्या जबड्यांमुळे सहज ओळखता येतो. नद्या, जलाशय आणि इतर गोड्या पाण्याच्या अधिवासांमध्ये आढळणारा हा मासा भारताच्या विविध भागांत खाद्य मासा म्हणूनही वापरला जातो. करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (झेडएसआय), पश्चिम प्रादेशिक केंद्र, पुणे येथील डॉ. रणजित मोरे, डॉ. जीवन सरवदे, ए. शबनम आणि डॉ. के. पी. दिनेश यांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात निडलफीश गार या माशाचे सात स्पष्टपणे वेगळे आनुवंशिक वंश आढळले आहेत. ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’मध्ये या संबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून मिळालेल्या वर्गीकरणदृष्ट्या प्रमाणित नमुन्यांचा अभ्यास करून त्यांच्या मायटोकॉन्ड्रियल डीएनए अनुक्रमांचे विश्लेषण केले. या अनुक्रमांची भारतासह बांगलादेश, थायलंड, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका आदी ठिकाणांहून सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या आनुवंशिक माहितीशी तुलना करण्यात आली.
 
 
या तुलनेत सध्या निडलफीश गार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या गटात सात वेगळे आनुवंशिक वंश असल्याचे दिसून आले. यातील उजनी जलाशयातील वंशाचा संबंध गंगा नदीतून १८२२ मध्ये हॅमिल्टन यांनी वर्णन केलेल्या मूळ माशासोबत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. इतर आनुवंशिक वंश महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, मणिपूर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील नमुन्यांशी संबंधित असल्याचे आढळले. या निष्कर्षाचा अर्थ सध्या ‘चोच माशाच्या सात नवीन प्रजाती सापडल्या’ असा घेता येणार नाही. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की अभ्यासातून सात वेगळे आनुवंशिक वंश आढळले असले, तरी त्यांना स्वतंत्र प्रजाती म्हणून औपचारिक मान्यता देण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.
 
 
गोड्या पाण्यातील माशांमध्ये अशा प्रकारची सुप्त जैवविविधता असण्याची शक्यता या अभ्यासामुळे अधोरेखित झाली आहे. एखादी व्यापक आणि सर्वसामान्य मानली जाणारी प्रजाती प्रत्यक्षात भौगोलिकदृष्ट्या मर्यादित आणि उत्क्रांतीच्या दृष्टीने वेगळ्या वंशांचा समूह असू शकते. त्यामुळे भारत आणि शेजारील प्रदेशांमध्ये चोच माशांचे अधिक व्यापक नमुना संकलन करून आनुवंशिक आणि आकारशास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे. - डॉ. रणजित मोरे. संशोधक




संबंधित मजकूर