भारतात अनेक खेळ पूर्वांपार होते. काही खेळ म्हणून, तर काही प्रात्यक्षिके उदरभरणासाठी होत. पुढे कालौघात यातील काही नष्ट झाले. तरीही आज नव्या रुपाने त्यातीलच काही प्रकार पुढे येत आहे. ‘सायकल बॅले’ हा त्यापैकीच एक! हा क्रीडा प्रकार आणि त्याचा जुन्या भारतीय खेळांशी असलेल्या संबंधांचा मागोवा घेणारा हा लेख...
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या हातातील हॉकी स्टिक जेव्हा मैदानात फिरायची, तेव्हा तो खेळ न वाटता, एखाद्या ‘बॅले’ नृत्यासारखा लयबद्ध वाटत असे. पण, एका सामान्य शिपायाला हॉकीचा ‘मेजर’ बनवण्यामागे आणि त्यांच्या खेळात हा ‘बॅले’ आणण्यामागे, खास गुरूचा हात होता. त्यांचे नाव होते मेजर बाले तिवारी! गुरूंच्या नावातील ‘बाले’ आणि ध्यानचंदांच्या खेळातील ‘बॅले’ हा कौशल्याचा सुवर्णयोग होता, असे आपल्याला खचितच वाटू शकते. आज याच ‘बॅले’ या शब्दाचा धागा पकडून, आपण एका वेगळ्याच खेळाच्या सफरीवर जात आहोत. तो खेळ म्हणजे, ‘सायकलवरील जिम्नॅस्टिस!’ याला जागतिक स्तरावर ‘बाईक बॅले’ किंवा ‘कलात्मक सायकलिंग’ म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ध्यानचंदांच्या खेळातील लयबद्धता मनाला भुरळ पाडत असे, अगदी तसाच सायकलवरील हा कलात्मक खेळही अनेकांसाठी आजही अनोखाच आहे. ‘बाईक बॅले’बाबत विचार करताना, मला लहानपण आठवते. माझ्या आत्येच सासर कल्याणचे. प्रत्येक सुटीत मी आत्येकडेच जाई. आत्येच्या चाळीसमोरच, कल्याणचा ऐतिहासिक काळा तलाव होता. काळा तलाव परिसरातील देवळाच्या प्रांगणातील सायकलचे खेळ बघण्यास आम्हा बच्चे-कंपनीला आवडत असे.
पोटा-पाण्यासाठी कित्येक दिवस सायकलवरून पाय खाली न टेकवता, एकाच जागी संतुलन राखणारे ते कलाकार खरोखरच अद्भुत होते. त्या लोकांचा तो खेळ लुप्त होण्याआधीचा काळ आणि आजच्या आधुनिक ‘बाईक बॅले’बद्दल, मला काही साधर्म्य जाणवू लागले आहे. पाय न टेकवता सायकल चालवणारे ते कलाकार हे सहसा भटके कलाकार, डोंबारी किंवा सायकलपटू असत. ते गावोगावी फिरून आपली कला सादर करत. अनेकजण सर्कशीत सायकलचे खेळ प्रदर्शित करत., तर काही कलाकार मंदिराच्या प्रांगणात किंवा मैदानात एक वर्तुळ आखून सायकल चालवत. सलग तीन ते पाच दिवस, काही वेळा तर सलग आठवडाभरही ते सायकलवरून खाली उतरत नसत. रोजचे जेवण, चहा-पाणी, दात-दाढी करणे, पेपर वाचन करणे आणि अगदी झोपणेसुद्धा सायकलवरच होई. त्यांच्या या कठीण तपश्चर्येला पाहून आजूबाजूचे लोक, देवदर्शनास येणारे भाविक त्यांना आर्थिक मदत करायचे.
आज हा खेळ दिसत नाही; ते कलाकारही आढळत नाहीत. पूर्वी मनोरंजनाचे साधन म्हणूनच, रस्त्यावरील असे खेळ गर्दी करून करून बघितले जात. आता मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे. आज महागाईच्या काळात, केवळ स्वेच्छेने दिलेल्या पैशांवर कुटुंब चालवणे अशक्य झाल्याने, या कलाकारांच्या पुढच्या पिढीने हा व्यवसाय सोडला. कालच्या ‘सायकल बॅलन्स’ची जागा, आजच्या आधुनिक ‘बाईक बॅले’ किंवा ‘स्टंट रायडिंग’ने घेतली आहे. यामध्ये कौशल्याचा पाया संतुलन हाच असला, तरी पण त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. थोडक्यात सांगायचे तर, कालचा सायकलचा खेळ हा संयम, सहनशीलता आणि जगण्याची धडपड दर्शवणारा होता. तर, आजचा ‘बाईक बॅले’ हा वेग, अचूकता आणि थरारांवंर आधारित जागतिक दर्जाचा क्रीडाप्रकार आहे. काळ बदलला, तरी चाकांवर तोल सांभाळण्याची कला आजही विविध रूपांत जिवंत आहे. त्याच ‘सायकल बॅले’ला, ‘जागतिक स्तरावरील क्रीडाप्रकार’ म्हणून मान्यता मिळत आहे.
सायकलच्या त्या जुन्या खेळांमध्ये आणि आधुनिक ‘बाईक बॅले’त, आपल्याला साम्य जाणवेल. जुना सायकलचा खेळ करणार्या कलाकारांजवळ, कोणतीही आधुनिक सुरक्षा-साधने नसत. केवळ पाय न टेकवता एकाच जागी ‘ट्रॅक स्टॅण्ड’ करणे, म्हणजे हातांच्या, पायांच्या आणि शरीराच्या सूक्ष्म हालचालींवर ताबा ठेवून सायकल उभी राखणे होय. यामध्ये प्रचंड एकाग्रता आणि शारीरिक शक्तीची गरज असे. आजचे ‘बाईक बॅले’ करणारे रायडर्सही बाईकच्या वजनाचा आणि गतीचा वापर करून, एकाच चाकावर किंवा अगदी ‘स्लो-मोशन’मध्ये गाडीचे संतुलन राखतात. दोन्ही प्रकारांचा मुख्य गाभा संतुलन हाच आहे. सायकलच्या या खेळात सायकलवरून पाय न टेकवता हाताने लहान-सहान कामे करणे, हाताने कसरती दाखवणे किंवा लयबद्ध सायकल फिरवणे, ही एक कला होती. म्हणूनच त्याला लोककलेचे किंवा सर्कशीचे एक रूप मानले जाई. आधुनिक ‘बाईक बॅले’त संगीताच्या तालावर, अत्यंत नेटक्या पद्धतीने अवजड मोटरसायकलच्या साहाय्याने नेत्रदिपक हालचाली होतात. नावाप्रमाणेच यात ’स्पोर्ट्स’ आणि ‘बॅले’ डान्ससारखी नजाकत एकत्र अनुभवता येते. जुन्या सायकलच्या खेळात, दिवसानुदिवस एकाच जागेवर राहून शरीराचा थकवा, झोप, हवामानाचे उतार-चढाव सहन करणे, म्हणजे सहनशक्तीची पराकाष्ठा होती. तर आधुनिक ‘बाईक बॅले’तही, तासन्तास एकाग्रता ठेवून आणि शरीरावर ताण सहन करून या कसरती कराव्या लागतात. फरक एवढाच आहे की, आज तंत्रज्ञान आणि तंत्र अधिक प्रगत झाले आहे.जुना काळ पोटापाण्याची खटपट करण्याचा होता. पूर्वी हे खेळ जत्रा, मंदिरांचे प्रांगण किंवा नाक्यावर होत. लोकांकडून मिळणार्या तुटपुंज्या पैशांवरच, त्या कलाकारांचे उदरभरण होई. आजचा ‘बाईक बॅले’ किंवा ‘स्टंट रायडिंग’ हा एक अधिकृत, स्पॉन्सर्ड आणि आधुनिक क्रीडाप्रकार आहे. आता यात ‘सेफ्टी गिअर्स’ जसे की हेल्मेट, जॅकेट, पॅड्स, उपलब्ध असतात; आधुनिक सायकलीही उपलब्ध आहेत. या कलाकारांना प्रचंड संख्येने प्रेक्षकही लाभतात. मात्र, काळा तलावाच्या प्रांगणात सायकलवर दिवस-रात्र एक करणारा तो कलाकार आणि आज जागतिक स्तरावर सायकलवर ‘बॅले डान्स’ करणारा खेळाडू, या दोघांचा आत्मा एकच आहे. तो म्हणजे, सायकलशी साधलेले अद्भुत तादात्म्य!
कल्याणच्या काळा तलावा काठच्या आठवणीने, अत्याधुनिक सायकलिंग खेळाचा पाया कसा नकळत रचला गेला हे आपण पाहू शकतो. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये, काही कलाकारांनी २४ तास किंवा त्याहून अधिक काळ पाय खाली न टेकवता सायकल चालवणे किंवा संतुलन राखल्याच्या नोंदी आहेत. मी लहानपणी बघितलेला तसा कोणी कलाकार नसला, तरी गोव्याचा वैभव राजामणी यांनी एकूण १५१.३३ किमी (९४.०३ मैल) अंतर हातांचा वापर न करता सायकल चालवून, सर्वाधिक अंतराचा विक्रम स्थापित केला. पूर्वी अशी बुक रेकॉर्ड बहुदा घ्यायचे हे त्या लोकांना माहीत नसावे, असेच वाटते. पोटा-पाण्यासाठीची त्यांची ही कला होती, आताचा काळ बदललेला आहे.
कलात्मक सायकलिंगची अधिकृत सुरुवात १८८८ मध्ये झाली. डेव्हिड कॉर्नफोर्थ नावाच्या एका जर्मन-अमेरिकन सायकलपटूने, पहिल्यांदाच सायकलवर जिम्नॅस्टिसची प्रात्यक्षिके करून दाखवत, या खेळाचा पाया घातला.
सुरुवातीला हा खेळ केवळ सर्कस किंवा मनोरंजनाचाच भाग मानला जाई. परंतु, १८९३ मध्ये पहिली अनधिकृत जागतिक स्पर्धा पार पडली. त्यानंतर १९५६ मध्ये ‘इंटरनॅशनल सायकलिंग युनियन’ने, या खेळाला अधिकृत जागतिक अजिंक्यपदस्पर्धेचा दर्जा दिला. हा खेळ प्रामुख्याने ‘इनडोअर’ खेळला जातो. यामध्ये खेळाडू ज्याला फिक्स गिअर असतो आणि ब्रेक नसतात, अशा खास सायकलवर हॅण्डबॅण्डवर उभे राहून, वेगवेगळ्या आसनांमध्ये कसरती करतात. हा खेळ जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. काहीच महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल शर्यत आयोजित केलेल्या पुण्याला, आता २०३२च्या जागतिक रस्ते सायकलिंग अजिंयपद स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. माँट्रियल येथील अलीकडे झालेल्या ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्या सभेत याची घोषणा झाली. या ‘यूसीआय’द्वारे आयोजित ‘सायकल बॅले’ किंवा ‘सायकल जिम्नॅस्टिस’ला, अधिकृतपणे ‘आर्टिस्टिक सायकलिंग’ म्हटले जाते. हा ‘इनडोअर सायकलिंग’ प्रकारातील, एक आकर्षक आणि कठीण क्रीडाप्रकार आहे. युरोपमधील निवडक राष्ट्र वगळता, त्याला लोकप्रियता नाही.
हा खेळ जिम्नॅस्टिस, बॅले नृत्य आणि सायकलिंग यांचे एकत्र मिश्रण आहे. यात खेळाडू एका विशेष प्रकारच्या सायकलीवर विविध स्टंट्स, जिम्नॅस्टिसच्या कसरती संगीताच्या तालावर करतात. या सायकलीचा गिअर फिक्स असल्याने, सायकल मागे-पुढे सहज चालवता येते. तिचे हॅण्डल ३६० अंशात फिरू शकते. शिवाय, सीट-हॅण्डलवर उभे राहूनही कसरती करता येतात. खेळाडूंना सादरीकरणासाठी अवघा पाच मिनिटांचा वेळ मिळतो. सिंगल खेळाडू, पेअर खेळाडू, चार जणांचा संघ ‘सायकलिंग जिम्नॅस्टिस’मध्ये सहभाग घेतात. कसरती करताना संतुलन बिघडणे, जमिनीला पाय लागणे किंवा वेळ संपल्यानंतर हालचाली करण्यासाठी, गुण कापले जातात. ज्यांचे गुण सर्वांत कमी कापले जातात, तो विजेता.
‘आर्टिस्टिक सायकलिंग’मध्ये, भारताचा सहभाग नगण्य आहे. आशियामध्ये या खेळात हाँगकाँग, मकाऊ आणि जपान हेच देश प्रगत आहेत. भारतामध्ये ‘रोड सायकलिंग’ आणि ‘ट्रॅक सायकलिंग’ हे प्रकार मुख्यत्वे खेळले जातात. ‘सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’कडून त्यांना पाठबळही मिळते. ‘आर्टिस्टिक सायकलिंग’साठी लागणार्या विशेष सायकली, लाकडी इनडोअर कोर्ट्स आणि प्रशिक्षित प्रशिक्षकांची भारतात कमतरता आहे. ‘यूसीआय’च्या ‘इनडोर सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये, भारताचे खेळाडू सहसा दिसत नाहीत.थोडयात म्हणजे, ‘आर्टिस्टिक सायकलिंग’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप लोकप्रिय असला, तरी भारतात अजूनही त्याचा विस्तार झालेला नाही. पुण्याच्या बालेवाडी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयोजनामुळे, जगभरातील अद्ययावत स्पोर्ट तंत्रज्ञान भारतात येईल. तसेच इनडोअर सायकलिंग हॉल आणि ट्रेनिंग सेंटर्सचाही विकास होईल. याचा फायदा ‘सायकल जिम्नॅस्टिस’च्या खेळाडूंना सरावासाठी होईल. ‘सायकल बॅले’साठी खास सायकली वापरल्या जातात. ‘जागतिक सायकलिंग संघटने’सोबतचे संबंध मजबूत झाल्याने, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकली भारतात सहज आणि परवडणार्या दरात उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा होईल.
ध्यानचंदांचे गुरू ‘बाले’ जसे प्रसिद्ध आहेत, तसाच ‘सायकलिंग बॅले’ही लोकमान्य-राजमान्य होईल का? आपल्याकडे तसे खेळाडू नक्कीच आहेत. मात्र, बाले तिवारी-ध्यानचंद या समीकरणाची वाट किती काळ बघायची, हा एक प्रश्न आहे. याचे उत्तर कोण देऊ शकेल बरे?
-श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४