मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्गच्या किनारी समुद्रात आढळणाऱ्या दुर्मीळ इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉइजची संख्या ८२ असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे (Finless porpoise). प्रत्यक्ष दृश्य निरीक्षणासोबत सागरी सस्तन प्राण्यांनी पाण्याखाली निर्माण केलेले ध्वनी टिपणाऱ्या ध्वनीआधारित निरीक्षण पद्धतीचा (Passive Acoustic Monitoring – PAM) वापर करुन हे संशोधन पार पडले (Finless porpoise). महत्त्वाचे म्हणजे पॉरपॉइजसह इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनच्या वावर क्षेत्राची सरमिसळ ही मोठ्या प्रमाणात मासेमारीच्या क्षेत्रांसोबत होत असल्याचेही या संशोधनाने अधोरेखित केले आहे (Finless porpoise). मात्र, या सागरी सस्तन प्राण्याच्या घनतेत २०२० ते २०२३ दरम्यान सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय घट झाल्याची बाबही याच संशोधनामुळे समोर आली आहे. (Finless porpoise)
इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉइज हा सागरी सस्तन प्राणी असून स्थानिक भाषेत त्याला बुलिया किंवा बुलिगा असे म्हणतात. डॉल्फिनप्रमाणे या प्राण्याच्या पुष्ठभागावर वशिंड म्हणजेच उभार नसल्याने तो समुद्राच्या पुष्ठभागावर श्वास घेण्यासाठी आला तरी, त्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे या प्राण्याच्या संशोधनाकरिता ध्वनीआधारित पद्धत हे दृश्य निरीक्षणापेक्षा तीनपट अधिक प्रभावी ठरते. तिरुपतीच्या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या संशोधिका इशा बोपर्डीकर यांच्या पीएच.डी. संशोधनात २०२० ते २०२३ या काळात सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील फिनलेस पॉरपॉइज आणि डॉल्फिन या दोन सागरी सस्तन प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष दृश्य निरीक्षणासोबत या प्राण्यांनी पाण्याखाली निर्माण केलेले ध्वनी टिपणाऱ्या ध्वनीआधारित निरीक्षण पद्धतीचा तंत्राचा वापर करण्यात आला. हे तंत्रज्ञान फिनलेस पॉरपॉइजची संख्या मोजण्यासाठी परिणामकारक ठरले.
प्रदेशनिहाय विचार केल्यास, फिनलेस पॉरपॉइजची सर्वाधिक घनता निवती येथे प्रति चौरस किलोमीटर सुमारे ०.३ प्राणी इतकी नोंदवण्यात आली. तर विजयदुर्ग, आचरा, तळाशील आणि वेंगुर्ला या भागांमध्ये ही घनता प्रति चौरस किलोमीटर सुमारे ०.२ प्राणी इतकी होती. मात्र, या विविध भागांमध्ये नोंदवण्यात आलेल्या घनतेतील फरक सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय नसल्याचे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
२०२० ते २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणांनुसार, फिनलेस पॉरपॉइजची एकूण अंदाजित संख्या ८२ होती. वर्षनिहाय अंदाज पाहता, २०२० मध्ये अंदाजित संख्या १७३ (१२०–२४९) होती. त्यानंतर २०२२ मध्ये ती ३३ (१८–६१), तर २०२३ मध्ये ३६ (१८–७१) इतकी अंदाजित करण्यात आली. मात्र, तीन वर्षांच्या कालावधीत नोंदवण्यात आलेला डॉल्फिनच्या घनतेतील फरक सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय नसल्याचे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टीवर २०१३ ते २०२३ या कालावधीत फिनलेस पॉरपॉइज आणि हंपबॅक डॉल्फिन या दोन्ही प्रजातींचे मिळून २३२ मृत्यू नोंदवण्यात आले. यामध्ये २०२१ साली सर्वाधिक ४९ मृत्यूंची नोंद झाली. या संशोधनात दोन्ही प्रजातींसाठी ‘संभाव्य जैविक मृत्यू मर्यादा’ (Potential Biological Removal – PBR) निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, एखाद्या वन्यजीवाच्या गणसंख्येच्या दीर्घकालीन टिकावावर विपरीत परिणाम न होता मानवी कारणांमुळे होऊ शकणाऱ्या मृत्यूंची अंदाजित कमाल मर्यादा. ही मर्यादा फिनलेस पॉरपॉइजसाठी दरवर्षी ०.१, तर हंपबॅक डॉल्फिनसाठी दरवर्षी ०.२ मृत्यू इतकी मोजण्यात आली. प्रत्यक्षात नोंदवण्यात आलेले वार्षिक मृत्यू या अंदाजित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर २०२० ते २०२३ दरम्यान केलेल्या अभ्यासातून फिनलेस पॉरपॉइजच्या घनतेत, विशेषतः २०२० ते २०२२ या काळात, लक्षणीय घट दिसून आली. त्याचबरोबर पॉरपॉइज आणि हंपबॅक डॉल्फिन यांच्या अधिवासाचा मासेमारीच्या क्षेत्रांशी मोठ्या प्रमाणावर ओव्हरलॅप होत असल्याचेही स्पष्ट झाले. मात्र, या घटीचे कारण थेट मासेमारीलाच ठरवता येणार नाही. या प्रजातींची नेमकी स्थिती समजून घेण्यासाठी सातत्यपूर्ण गणसंख्येचे निरीक्षण, पॅसिव्ह अकॉस्टिक मॉनिटरिंग आणि मासेमारीच्या हालचालींची अधिक सविस्तर माहिती गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. – डाॅ. इशा बोपर्डीकर, सागरी संशोधक