अशोक सिंघलजी यांचे कार्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या अनेक पदरांशी जोडलेले आहे. त्यांच्या कार्यामागील प्रेरणा आणि त्यातून निर्माण प्रभाव समजून घेणे, हा समकालीन भारताचा अध्याय समजून घेण्यासारखे आहे. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
वृक्षकबहुँ नहिं फल भखै, नदी न संचै नीर|
परमारथ के कारने, साधुन धरा शरीर॥
अशी एक सुंदर उक्ती आहे. याचा अर्थ असा की, वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाही आणि नदी स्वतःचे पाणी स्वतः साठवून ठेवत नाही. दोन्ही इतरांच्या कल्याणासाठीच अस्तित्वात असतात. आपले संत आणि ऋषिमुनीदेखील अनंत काळापासून, आपल्याला हीच शिकवण देत आले आहेत. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित जीवन, हे वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरते. आपल्या जगण्यात सातत्याने याच भावनेचे प्रतिबिंब असलेली अशी एखादी व्यक्ती जर कोण असेल, तर ते अशोक सिंघलजी होते! दि. २७ सप्टेंबरपासून आपण आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक प्रबोधन आणि अनेक दशकांचे समर्पित संघटनात्मक कार्याचे एकात्मीकरण घडवून आणणार्या या महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासाठी, त्यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत.
अशोकजी यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या स्नेहाची अनुभूती घेण्याच्या अगणित संधी मला लाभल्या, हा मी माझा बहुमानच मानतो. त्यांच्या बाबतीतल्या माझ्या अगदी सुरुवातीच्या आठवणींपैकी, एक आठवण १९८१ मधली आहे. त्यावेळी मी माझ्यावर सोपवलेल्या संघटनात्मक जबाबदार्या पार पाडणारा एक तरुण कार्यकर्ता होतो. त्यावेळी मला त्यांनी, स्वतः हाताने पत्र लिहिले होते. साहजिकच, तो माझ्यासाठी एक उल्लेखनीयच प्रसंग होता. या पत्रात त्यांनी एका महत्त्वाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल लिहिले होते आणि काही जबाबदार्या माझ्यावर सोपवल्या होत्या.
गेली अनेक दशके, मी त्यांना अहोरात्र काम करताना पाहिले आहे. ते कायमच दूरवरच्या आणि अनेकदा दुर्गम भागातल्या आव्हानात्मक प्रवासावर जात. गुजरातमधील आदिवासी भागांमध्ये, प्रवास करण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्यात कायम दिसे. त्यांचे मन सतत कुठे ना कुठे धावत असायचं, ते सतत समाजातील वंचित घटकांसाठी आणखी काय करता येईल, याचाच विचार करत राहायचे. जेव्हा कधी देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत, त्यावेळी अशोकजी हे एकतर तिथे स्वतः पोहोचणार्या किंवा बाधितांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार्या, पहिल्या लोकांमधले एक असत. २००१ मध्ये कच्छला आलेल्या भूकंपाच्या भीषण परिस्थितीच्या काळात, त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा स्वतःचा अनुभव तर मी कधीच विसरू शकत नाही.
इतरांबद्दलची ही करुणेची आणि त्यांची काळजी घेण्याची अशोकजी यांच्यातली ही भावना, अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्यात रुजलेली होती. खरे तर, ते एका अत्यंत प्रतिष्ठित आणि संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले. त्यांचे वडील, महावीरजी एक नामवंत प्रशासक होते. त्यांचे एक बंधू, बी. पी. सिंघलजी पोलीस दलात उच्च पदापर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर ते खासदारही झाले. त्यांचे दुसरे बंधू, व्ही. पी. सिंघलजी ज्यावेळी त्रिपुरा राज्याची नुकतीच निर्मिती झाली होती, तेव्हा त्रिपुराचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील, व्यापार आणि कृषिक्षेत्रात मोठेच यश मिळवले होते. पण, अशोकजी मात्र अगदी तरुण वयापासूनच एका वेगळ्याच ध्येयाकडे आकर्षित झाले होते. ते ध्येय म्हणजे, भारतमातेच्या लेकरांना त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देणे आणि राष्ट्राचे पुनरुत्थान घडवणे!
प्रयागराजमध्ये लहानाचे मोठे होत असतानाच, अशोकजी संगमाच्या काठावर तासन्तास बसत. नदीविषयी त्यांना स्वाभाविकच आकर्षण होते; पण संगमावर येणारे संत, साधू आणि भाविकही त्यांचे लक्ष वेधून घेत. या सगळ्या वातावरणातूनच, भारताच्या सांस्कृतिक जीवनमूल्यांची त्यांना ओळख होत गेली आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा अधिक बळकट झाली. इतरांसाठी जगण्याची हीच भावना, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे घेऊन गेली. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा एखादी जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा ती त्यांनी उत्साहाने, शिस्तीने आणि कर्तव्यभावनेने स्वीकारली.
अशोक सिंघलजींनी सातत्य आणि अथक परिश्रमाने, अनेक संस्था आणि चळवळी उभ्या केल्या. त्यांचा आवाज भारदस्त होता आणि त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाने, संपूर्ण सभा जणू भारावून जायची. सहकारी कार्यकर्त्यांबद्दलची त्यांची आस्था आणि आपुलकीही तितकीच उल्लेखनीय. त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही, त्यांच्या विलक्षण साधेपणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहायचे नाही. संत-समाजाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. देशभरातील संत आणि साधू-महंतांमध्ये त्यांना मोठा मानही होता. ते त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देत आणि अशोकजींचे म्हणणेही अत्यंत आदराने ऐकून घेत.
अशोकजींच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवणारे दोन प्रसंग, माझ्या मनात आजही ताजे आहेत. त्यांपैकी पहिला प्रसंग १९९३ सालचा आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने, ‘विश्व हिंदू परिषदे’ने अमेरिकेत एका अधिवेशनाचे आयोजन केले होते. परदेशात अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करण्याची कल्पना, त्यामागचे नियोजन आणि विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न या सगळ्यांतून, अशोकजींचे विलक्षण संघटनकौशल्य दिसून आले होते.
दुसरा प्रसंग २००० सालचा आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील ‘पोर्ट ऑफ स्पेन’ येथे, जागतिक हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींमध्ये अशोकजींच्या उपस्थितीने किती उत्साह निर्माण झाला होता, हे मला तिथे पाहायला मिळाले. माझे भाषण झाल्यावर, अशोकजींनी केलेले कौतुक माझ्यासाठी खूप भावणारे होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असे, हे मी पुन्हा एकदा अनुभवले.
अशोक सिंघलजींचा उल्लेख करताना, रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. १९९१ मध्ये बोट लबवर झालेल्या सभेतील त्यांचे भाषण कोण विसरू शकेल? आंदोलन ऐन भरात असताना, जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील अशोकजींचे ते चित्र आजही कुणीच विसरू शकत नाही. आज अयोध्येत जे भव्य राममंदिर उभे आहे, हे शय होण्यासाठी अशोकजींसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता, या कार्यासाठी आयुष्य वाहून घेतले. अयोध्येत राममंदिर साकारताना पाहून, अशोकजींना खूपच आनंद झाला असता.
अशोक सिंघलजी यांना विचारांची असाधारण स्पष्टता लाभली होती. समाजात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले पाहिजे आणि बंधुभावाचा संदेश सातत्याने अधोरेखित केला पाहिजे, हाच त्यांचा ठाम विश्वास होता. सामाजिक एकोपा आणि समतेची भावना दृढ करण्यासाठी, त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये आणि प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशीच त्यांची ठाम धारणा होती. अयोध्येतील राममंदिराची पहिली वीट ठेवण्याचा मान समाजातील वंचित घटकातून आलेल्या व्यक्तीला मिळावा, असाच त्यांचा विचार होता. त्यामुळे बिहारमधील वंचित घटकातून आलेले आणि ‘विश्व हिंदू परिषदे’चे तळागाळातील कार्यकर्ते कामेश्वर चौपालजी यांच्या हस्ते, राममंदिराच्या पहिल्या विटेचे पूजन करण्यात यावे, अशीच त्यांची भूमिका होती. काशी येथे आयोजित धर्मसंसदेत त्यांनी, डोम राजांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विविध सामुदायिक उपक्रमांमध्येही त्यांनी, डोम राजांसोबत काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान, प्रतिष्ठा आणि स्थान मिळाले पाहिजे, या त्यांच्या दृढ विचारांचे हे कृतीतून दिसून आलेले उदाहरण होते.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यापलीकडे अशोक सिंघलजी यांच्या जिव्हाळ्याचे आणखी दोन विषय होते, एक म्हणजे शिक्षण, विशेषतः वैदिक शिक्षण आणि दुसरे संगीत. वाराणसीचे खासदार म्हणून मला विशेष अभिमान वाटतो की, मी प्रतिनिधित्व करत असलेली शाश्वत काशी नगरी, अशोक सिंघलजी यांच्या जीवनाशी एका महत्त्वपूर्ण नात्याने जोडलेली आहे. त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. विद्यार्थीदशेत अत्यंत अभ्यासू आणि गुणवंत अशीच त्यांची ओळख होती. दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत, विशेषतः आदिवासी समाजापर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘एकल विद्यालय’ उपक्रमाशी, त्यांचा घनिष्ठ संबंध होता. अशोक सिंघलजी हे विपुल वाचन करणारे, तसेच उत्तम श्रोतेदेखील होते. अधिकाधिक वाचन करण्याचा सल्ला ते आपल्या तरुण कार्यकर्त्यांना, नेहमीच देत असत. ज्ञानसंपादनासाठी सातत्याने वाचन करण्याची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली.
अशोकजींना जवळून ओळखणार्यांना, त्यांच्या उत्तम गायनकौशल्याची निश्चितच जाणीव होती. नागपूर येथे झालेल्या काही बैठकींच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. या बैठकींमध्ये ते ‘एकल गीत’ सादर करत, त्यांच्या गायनाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध होत. त्यांच्या गायनामुळे बैठकीचे वातावरणही, विशेष उत्साहाने भारून जात असे. बैठकीची सुरुवातच एका वेगळ्या ऊर्जेने होई. २०१५मध्ये त्यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित करत हे ‘मातृभूमि मेरी, हे पितृभूमि मेरी’ हे गीत गायले. त्यांच्या या अनपेक्षित आणि उत्स्फूर्त गायनाचा व्हिडिओ, मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि तो सर्वत्र चर्चेचाच विषय ठरला.
त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, अधिकाधिक तरुणांना त्यांच्या महान कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याचा आपण संकल्प करूया. तसेच, आपल्या राष्ट्राच्या आणि देशवासीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया.
नरेंद्र मोदी
मा. पंतप्रधान