श्रद्धे विरुद्ध आधुनिक विचारांचा संघर्ष ’द वन’!

    27-Sep-2026
 
The One Force of the Forest Review
 
गेल्या काही काळापासून बॉलीवूडमध्ये लोककथा आणि लोकसाहित्यावर आधारित चित्रपटनिर्मितीचा ट्रेंड सुरू आहे. मिथक-भयपट-विनोद हे सूत्र प्रेक्षक आणि बॉस ऑफिस या दोन्ही ठिकाणी प्रभावी ठरले आहे. मिथके आणि लोकप्रिय समजुतींना पडद्यावर अलौकिक पद्धतीने साकारण्याची प्रथा नवीन नाही. ‘पहेली’पासून ‘स्त्री’, ‘मुंज्या’ आणि ‘कांतारा’पर्यंत चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कथा लोककथांवरच आधारित केल्या. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी बिहारच्या एका गावातील, वनदेवीच्या आख्यायिकेवर आधारित ‘द वन : फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटाद्वारे हीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
 
चित्रपटाची ही कथा मुंबईत राहणार्‍या ऋषी (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि ममता (तमन्ना भाटिया) या पती-पत्नीभोवती फिरते. हे दाम्पत्य बर्‍याच काळापासून आई-वडील होण्याचा प्रयत्न करत असतात; पण त्यांना यश येत नसते. छठपूजेसाठी ते त्यांच्या मूळ गावी जातात, जिथे ऋषीचा भाऊ आणि वहिनी (अनुप सोनी आणि श्वेता तिवारी) त्यांच्या मुलांसोबत राहत असतात. त्यांच्यासोबत त्यांचा ‘ब्लॉगर’ मित्र वेद (मनीष पॉल) पण गावी जातो. गावात पोहोचल्यावर त्यांना कळते की, शतकानुशतके चालत आलेल्या श्रद्धा आजही तितयाच आदराने आणि भीतीने पाळल्या जातात. त्या गावात सूर्यास्तानंतर गावातील जंगलात प्रवेश करण्यास सक्त मनाई असते. याला ऋषी एक अंधश्रद्धा मानतो. गावात अशा काही घटना घडतात की, ऋषी सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेश करतो, तेव्हा त्याला त्याच्या कल्पनेपलीकडच्या रहस्यांचा सामना करावा लागतो. या शतकानुशतके चालत आलेल्या श्रद्धांमागे कोणते सत्य दडलेले आहे; हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.
 
‘पंचायत’ आणि ‘गुल्लक’सारख्या उत्कृष्ट मालिकांची निर्मिती करणारे दीपक मिश्रा आणि अरुणाभ कुमार जेव्हा एकता कपूरसोबत काम करतात, तेव्हा आपल्याला एक रंजक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी हॉरर-कॉमेडी पाहायला मिळेल, अशी आशा होती. पण, इथेच तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. कारण, हा चित्रपट ना धड हॉरर आहे, ना धड कॉमेडी! पटकथेवर थोडंसे अजून काम केले असत, तर हा एक उत्तम हॉरर-कॉमेडी चित्रपट तयार झाला असता.
 
असो. ‘द वन : फोर्स ऑफ द फॉरेस्ट’चा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे, त्याचे लोककथांचे जग. बिहारचे एक गाव, श्रद्धा विरुद्ध आधुनिक विचार यांचा संघर्ष, हे वातावरण चित्रपट सुरुवातीलाच निर्माण करतो. ते पाहून असे वाटते की, जणू ‘अमर चित्रकथे’तील एखादे पानच मोठ्या पडद्यावर जिवंत झाले आहे. ‘तुंबाड’ आणि ‘कांतारा’सारख्या चित्रपटांनी ज्याप्रकारे स्थानिक लोककथांना आपल्या स्वतःच्या ओळखीमध्ये सामावून घेतले, ‘द वन’सुद्धा त्याच मार्गावर जातो.
 
चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला झाला आहे, विशेषतः जेव्हा ऋषी, गाव, जमिनीचा वाद आणि एक रहस्यमय जंगलांच्या मधून चित्रपटाची कथा हळूहळू उलगडते. पण, मध्यांतरानंतर चित्रपटाची जादू थोडी कमी होते. कथानक श्रद्धा, लोभ, जंगल वाचवण्याचा लढा आणि विकासाची गरज यांसारख्या अनेक मुद्द्यांचा शोध घेते. पण, या गोष्टी तुमच्याशी जोडल्या जाऊ शकत नाहीत. ‘वनदेवी’, ‘रहस्यमय शक्ती’ आणि ‘जादुई वाघ’ यांसारखे घटक आकर्षक आहेत; परंतु अनेक ठिकाणी कथेला पुढे नेण्यासाठी त्यांचा वापर खूप घाईघाईमध्ये करण्यात आला आहे. हॉररच्या नावाखाली हा चित्रपट फारसे भय निर्माण करत नाही; पण रहस्य आणि थराराच्या साहाय्याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करतो. इथेच चित्रपटाचा प्रभाव ‘उत्कृष्ट’वरून ‘ठीकठाक आहे’ या श्रेणीत घसरतो. पूर्वार्ध जेवढा मनोरंजक आहे, त्या तुलनेत चित्रपटाचा उत्तरार्ध विस्कळीत वाटतो. कथानकदेखील एकसंध न वाटता, तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेले वाटते.
 
सेट डिझाईनमध्येही अधिक सुधारणेला वाव होता. दिग्दर्शकाने विकास आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्षात मानवी लोभावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. विषय उत्तम होता. पण, त्याची मांडणी मात्र फिस्कटली आहे. मनू आनंद यांचे छायाचित्रण, जंगलातील गूढतेचे वातावरण प्रभावीपणे निर्माण करते. मनीष पॉल आणि सुलभा आर्या यांची गाणीही कथेमध्ये विनोदाची भर घालतात. रहस्यमय वाघ, बैल आणि देवीचा नकारात्मक शक्तींशी होणारा सामना दर्शवणारी ‘व्हीएफएस’ दृश्ये काही वेळा प्रभावी वाटतात. मात्र, कथेत छठपूजेच्या भागावर अधिक विस्ताराने भाष्य करणे टाळले आहे.
 
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी नवीन असूनही चित्रपटात त्यांची केमिस्ट्री पडद्यावर प्रभावीपणे दिसते. सिद्धार्थने श्रद्धेचा धागा घट्ट धरणार्‍या एका सुशिक्षित आणि हुशार तरुणाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. तो पडद्यावर देखणा दिसतो, तर तमन्ना भाटिया आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने कथेच्या भावनिक गाभ्याला अधिक बळकट करते. अनुप सोनी आणि श्वेता तिवारी यांनी आपापल्या भूमिकांना सर्वार्थाने न्याय दिला आहे. मनीष पॉल आपल्या विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
 
चित्रपटातील सगळ्यात मोठे सरप्राईझ म्हणजे सुनील ग्रोवर! आपली विनोदी कलाकाराची चौकट मोडून पठ्ठ्याने कमाल काम केले आहे. चित्रपटाचे संगीत ठीकठाक असून, एकही गाणे तुमच्या लक्षात राहत नाही. एकंदरीतच, चित्रपटात एका उत्तम कथेचे आणि मनोरंजक कल्पनेचे सर्व घटक आहेत; परंतु असंतुलित पटकथा आणि कमकुवत लायमॅसमुळे तो एक चांगला चित्रपट होता होता राहिला, हेच खरे.
 
निर्माती : एकता कपूर
दिग्दर्शक : दीपक कुमार मिश्रा
कलाकार : सिद्धार्थ मल्होत्रा, तमन्ना भाटिया, सुनील ग्रोवर, श्वेता तिवारी, अनुप सोनी, मनीष पॉल
अवधी : २ तास २१ मिनिटे
 
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर