अलीकडे स्त्री-स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती असे शब्द अनेकदा कानांवर पडतात. स्त्री-स्वातंत्र्यावर अनेक देशांमध्ये चळवळ सुरू असल्याचेही ऐकू येते. मात्र, विविध विचारसरणीचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असमान असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. हाच धागा पकडून जगातील विविध विचारधारेतील स्त्री आणि तिच्या अस्तित्वाच्या संकल्पना यावर भाष्य करणार्या पुस्तकाचे हे परीक्षण...'
आज जर आपण धार्मिक आणि राजकीय विचार काही काळासाठी बाजूला ठेवून जगातील सर्व महिलांचा विचार केला, तर नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या त्या सर्व समान आहेत, जसे सर्व पुरुषही समान आहेत. परंतु, जेव्हा आपण त्यांच्याकडे धार्मिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून पाहू लागतो, तेव्हा हे चित्र बदलते. आता कुठे ती ‘औरत’ आहे, तर कुठे ‘इव्ह’ आणि ‘वुमन’. ‘कम्युनिझम’ अर्थात, साम्यवादाच्या दृष्टीने ती ‘शोषित आणि पीडित वर्ग’ आहे, तर बाजारपेठेच्या व्यवस्थेत ती एक ‘ऑब्जेटिफाईड ऑब्जेट’ अर्थात, वस्तू आहे. भारतात तिच्यासाठी ‘स्त्री’, ‘महिला’ यांसारखे शब्द प्रचलित आहेत.
डॉ. शुचि चौहान यांचे ‘स्त्री’ हे पुस्तक, याच विविध दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहण्याच्या विचारांना वाचकांसमोर मांडते. लेखिकेचे म्हणणे आहे की, वरील संबोधने केवळ शब्दच नाहीत, तर ती स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील व्यक्त करतात, ज्या अंतर्गत एखाद्या समाजाने आणि विचाराने स्त्रीला पाहिले आणि परिभाषित केले.
‘स्त्री’ हे पुस्तक स्त्रीला कोणत्याही एका विचाराच्या किंवा सामाजिक व्यवस्थेच्या चौकटीत मर्यादित करत नाही. याचा प्रवास भारतीय दृष्टिकोनापासून सुरू होऊन, इस्लामी आणि ख्रिश्चन दृष्टिकोनाचा आढावा घेत, साम्यवादी विचार आणि बाजारवादापर्यंत पोहोचतो. यानंतर, पाश्चात्त्य समाजात उदयास आलेली पितृसत्ता, व्यक्तिवाद, ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’, ‘माय बॉडी, माय चॉईस’ आणि ‘वोकिझम’सारख्या विचारांच्या माध्यमातूनही, आजच्या स्त्री-विमर्शाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते.
पुस्तकाची सुरुवातच भारतीय स्त्री-दृष्टिकोनातून होते. ‘स्त्री ब्रह्मस्वरूपा’, ‘स्त्री-पुरुष परस्पर पूरक’, ‘विवाह हे एक पवित्र बंधन’, ‘मातृत्व ही स्त्री-जीवनाची पूर्णता’ आणि ‘कुटुंबाचा कणा स्त्री’ यांसारखे विषय, भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीमध्ये स्त्रीची भूमिका स्पष्ट करतात. वैदिक काळापासून आधुनिक भारतापर्यंतच्या प्रवासात लेखिका हे सांगण्याचा प्रयत्न करते की, भारतीय परंपरेत स्त्रीला केवळ एकाच भूमिकेत बांधून पाहिलेले नाही. ती शक्ती आहे, निर्मितीचा आधार आहे, कुटुंबाचा केंद्रबिंदू असतानाच, ती सामाजिक जीवनातील सक्रिय भागीदारही आहे.
यानंतर, वाचक एका पूर्णपणे वेगळ्या सामाजिक आणि धार्मिक संदर्भात प्रवेश करतो, तो म्हणजे इस्लामी स्त्री-दृष्टिकोन! स्त्रीची उत्पत्ती, स्त्री-पुरुष संबंध, पडदा पद्धत, निकाह, हलाला आणि युद्धातील बंदी स्त्रिया यांसारख्या विषयांतून हे पुस्तक आज वादविवाद होत असलेल्या मुख्य प्रश्नांना समोर आणते.
यानंतर, हे पुस्तक ख्रिश्चन स्त्री-दृष्टिकोनावर भाष्य करते. पुस्तकाच्या या अध्यायात ‘इव्ह’, ‘ओरिजनल सिन’ आणि ‘विच हंट’ यांसारख्या लेखांच्या माध्यमातून युरोपच्या धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचे असे पापुद्रे उलगडले, ज्यांनी स्त्रीच्या सामाजिक प्रतिमेलाच खोलवर प्रभावित केले. पुस्तकातील ‘विच हंट’चा प्रसंग विशेषतः लक्ष वेधून घेतो. आज विकसित, आधुनिक आणि उदारमतवादी म्हटल्या जाणार्या युरोप आणि अमेरिकेचा स्त्री-इतिहास तितका उज्ज्वल नाही, याचीच आठवण हा प्रसंग करून देतो.
पुस्तकाचा पुढचा टप्पा म्हणजे, साम्यवाद्यांचा स्त्री-दृष्टिकोन! येथे स्त्री-शोषण, आर्थिक परावलंबित्व, सामाजिक रचना आणि सक्षमीकरणांसारखे प्रश्न समोर येतात. साम्यवादी विचारातील स्त्रीमुक्तीला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडून पाहण्याच्या प्रवृत्तीवर चर्चा करताना, पुस्तक एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते. हा प्रश्न म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य हेच स्त्रीसाठी सर्वस्व आहे का? की तिच्या आयुष्यात कुटुंब, भावनिक संबंध, मातृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे?
हाच प्रश्न पुढे बाजारवादी स्त्री-दृष्टिकोनाच्या संदर्भात अधिक ठळक होतो. सौंदर्य स्पर्धा, जाहिराती, समाजमाध्यम, ‘व्हायरल होणे म्हणजेच यश’, स्त्री-देहाचे वस्तुकरण आणि उत्पादनांच्या ‘पॅकेजिंग’मधील मातृत्व, हे सर्वच विषय आजच्या जगाशी थेट जोडलेले आहेत. हे वाचताना वाचक आजूबाजूच्या जाहिराती आणि डिजिटल जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहू लागतो. या जगामध्ये स्त्रीला एकीकडे स्वतंत्र ग्राहक म्हटले जाते, तीच दुसरीकडे बाजारपेठेसाठी विकण्यायोग्य वस्तूमध्ये बदललेली त्याला दिसते.
‘माय बॉडी, माय चॉईस’ हा भाग, पुस्तकातील सर्वांत समकालीन भागांपैकी एक. संमती, वैयक्तिक स्वातंत्र्य, विवाह, मातृत्व आणि स्वतःच्या शरीरावरील अधिकार यांसारखे प्रश्न, पाश्चात्त्य समाजात झालेल्या आंदोलनांच्या संदर्भात मांडण्यात आले आहेत. ‘मी टू’पासून ‘चाईल्ड फ्री’सारख्या विचारांपर्यंत, आधुनिक स्त्री-विमर्शात स्वातंत्र्याची व्याख्या कशी बदलली, हे लेखिकेने या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक सक्षमीकरणाच्या प्रचलित संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. स्त्रीला सक्षम करणे म्हणजे, केवळ पुरुषाशी बरोबरी करणेच आहे का? की, तिच्या स्वतःच्या भावना, गरजा, क्षमता आणि आवडीनिवडी समजून घेणेही महत्त्वाचे आहे? स्वातंत्र्याचा अर्थ, फक्त स्वतःचा विचार करणे हाच आहे की, त्यात कुटुंब आणि समाजाचे हितही समाविष्ट असायला हवे?
पुस्तकाच्या शेवटच्या भागात जेव्हा प्रश्न येतो, ‘भारत पाश्चात्त्यांच्या निशाण्यावर का?’ तेव्हा संपूर्ण चर्चा पुन्हा एकदा भारतीय संदर्भाकडे वळते. पुस्तक सांगते की, येथे प्रश्न एखादा विचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा नाही, तर तो भारतीय समाजाची स्वतःची परिस्थिती, कौटुंबिक व्यवस्था आणि सांस्कृतिक अनुभवांच्या कसोटीवर समजून घेण्याचा आहे.
पुस्तकाची विषयवस्तू समकालीन आणि गंभीर आहे. हे पुस्तक जीवन जगताना येणारे विषय जसे की- विवाह, प्रेम, कुटुंब, मातृत्व, शरीर, करिअर, समाजमाध्यम, स्वातंत्र्य आणि ओळख यांसारख्या विषयांना अत्यंत परखडपणे मांडते. वास्तविक पाहता, हे केवळ स्त्रीवर लिहिलेले पुस्तक नाही. हा स्त्रीकडे पाहणार्या दृष्टिकोनावर घडवलेला एक संवाद आहे. हा संवाद वाचकाला आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडतो. हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करते. कोणत्याही विषयावर स्वतःचे मत लादण्याऐवजी हे पुस्तक स्त्री-विचारांशी जोडलेली संशोधनपर पार्श्वभूमी वाचकांसमोर ठेवते आणि त्यांना स्वतः विचार करण्यासाठी प्रवृत्त करते.
स्त्रीचा इतिहास आणि भारतात सुरू असलेला स्त्री-विमर्श जाणून घेण्याची व समजून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. हे पुस्तक ‘अॅमेझॉन’ आणि ‘सुरुची प्रकाशना’वरही उपलब्ध आहे.
पुस्तकाचे नाव : स्त्री
लेखिका : डॉ. शुचि चौहान
प्रकाशक : ज्ञान गंगा प्रकाशन
मूल्य : १८०
पृष्ठसंख्या : १३६
- वत्सला चौहान