योगीराज चैतन्यमूर्ती श्रीसंत राममारुती महाराज

    27-Sep-2026
 
Rammaruti Maharaj Biography
 
महाराष्ट्र ही संतांची भूमी. या मातीमध्ये अनेक संतांनी अवतार घेतला. त्या सद्पुरुषांपैकी एक अवतारपुरुष म्हणजे, संत श्री राममारुती महाराज! आज रविवार, दि. २७ सप्टेंबरपासून श्री राममारूती महाराज यांचा उत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे कार्य, जीवनचरित्राचा परिचय करून देणारा हा लेख...
 
राम उपासनेची थोर परंपरा पुढे नेणारे व साक्षात श्रीराममारुतीचा अवतार म्हणून ओळखले जाणारे थोर संत श्री राममारुती महाराजांचा जन्म, रायगडच्या पेण येथे दि. ८ सप्टेंबर १८५६, भाद्रपद शुद्ध नवमी शके १७७८ रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात, देशपांडे घराण्यात झाला. महाराजांच्या पणजोबांचे नाव देवराम, आजोबांचे नाव सीताराम आणि वडिलांचे नाव राजाराम असे होते. म्हणजे त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील यांच्या नावातच ‘रामनाम’ होते. महाराजांच्या मातोश्री सीताबाई या पहिल्यापासूनच श्रीराम उपासक. हातात काम व मुखात ‘रामनाम’ हेच त्यांचे सहज वागणे. महाराजांच्या वेळेस त्यांची भजन व रामनामातील गोडी अधिकच वाढली. कधीकधी भजन चालू असताना, उंच उंच उड्डाण करावे, असेही त्यांना वाटे. पण, त्यांच्या पोटी महारुद्र हनुमानाचे अवतार जन्म घेणार आहे याची कल्पनाही कोणाला नव्हती. त्यांचा जन्म मूळ नक्षत्रात झाल्याने, त्याची शांती करण्यात आली. त्यांचे भिवंडी येथे सीताबाईंच्या माहेरी बारसे करण्यात येऊन, नाव ‘शंकर’ ठेवले गेले. ‘शं’ म्हणजे कल्याण; जो सर्वांचे कल्याण करतो, तो शंकर.
 
महाराज सात-आठ वर्षांचे असताना, गंगाधर महाराज टाकळीकरांनी त्यांचे नाव ‘रामजी’ ठेवले. ‘रामजी’ म्हणजे चैतन्यरूप! महाराजांना याचकाळात त्यांच्या चैतन्य स्वरूपाची जाणीव होऊ लागली. त्यानंतर सद्गुरू कृपेने १०-१२ वर्षे साधना झाल्यावर, स्वतःचे मूळ चैतन्यरूप जिकडे-तिकडे दिसू लागले. थोडयात, रामरूपी चैतन्य ओळखण्याची शक्ती व बुद्धी त्यांना प्राप्त झाली. म्हणूनच, सद्गुरू बालमुकुंद स्वामी महाराज यांनी त्यांचे नाव ‘राममारुती’ असे ठेवले. ही स्थिती प्राप्त झाली, म्हणूनही त्यांना ‘राममारुती’ असे नाव सद्गुरूंनी दिले असावे.
 
बालपण : महाराजांना एक भाऊ, मोठ्या दोन बहिणी होत्या. वयाच्या तीन-चार वर्षांपर्यंत महाराजांचे बालपण इतर मुलांप्रमाणे खेळण्यात गेले. मात्र, पाच-सहा वर्षांनंतर त्यांच्या वृत्तीत फरक दिसू लागला. मातोश्रीबरोबर देवदर्शनाला-कीर्तनाला जाणे, कधीकधी तर शंकर मंदिरात किंवा राम मंदिरात एकटेच जाऊन बसणे, गरीब-भुकेला दाराशी आल्यास स्वतःचे ताट त्यास देणे, प्रसंगी अंगावरचे कपडे काढून देणे, असे होऊ लागले. थोडक्यात, कमी वयातच विरक्तपणा वाढून, भगवंत सहवासाची ओढ वाढली. त्यांना शाळेत घातले; परंतु अंतरी परमेश्वराची ओढ असल्यामुळे शालेय शिक्षणात त्यांना रस वाटेना. मंदिरात तासन्तास बसत असल्याने, शाळेत नियमित जाणे होतच नसे. एकदा शिक्षकांनी महाराजाचे दप्तर तपासले, तेव्हा त्यात तुकारामांची ‘गाथा’ आढळली. तेव्हा शिक्षक महाराजांच्या वडिलांना म्हणाले की, "हा मुलगा पूर्वजन्मी पूर्ण शिक्षण झालेला अधिकारी पुरुष असावा, याला शिकवण्यास आम्ही पात्र नाही.” त्यामुळे यानंतर शाळेचा विषय बंदच झाला. यानंतर महाराजांचे वास्तव्य भिवंडी येथील श्री भीमेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर, श्री मारुती मंदिर, रामेश्वराचे मंदिरात वाढले. महाराज देवालयात पोत्यात पाय घालून, पिंडीवर डोके ठेवून तासन्तास पालथे पडलेले असत. ते जणू शंकराला त्याचा आवडता ‘राम’ जप ऐकवत आहेत, असेच वाटे.
 
श्रीसद्गुरू कृपा : महाराजांची साधना सुरूच होती, त्यांना गुरूचा ध्यास लागला. त्यांचे मामाआजोबा माधव खारकर त्यांना, सद्गुरू बालमुकुंद स्वामी यांच्याकडे घेऊन गेले व त्यांना आठवण करून दिली की, "हा मुलगा सहा महिन्यांचा असताना, आम्ही याला आपल्या चरणांवर घातला होता. तेव्हा आपण म्हणाला होतात की, हा मुलगा तुमचा नसून माझा आहे. माझा प्रसाद म्हणून आपल्या येथेच वाढू द्या, योग्यकाळी मी याला घेऊन जाईन.” स्वामींनी त्यांना स्वीकारले व गुरुमंत्राची दीक्षा दिली. तेव्हापासून महाराज कायमचे गुरुगृही राहू लागले. सन १८८३ साली स्वामींनी, राममारुती महाराजांच्या मांडीवर मस्तक ठेवूनचवैकुंठगमन केले.
 
व्यक्तिमत्त्व : राममारुती महाराजांची शरीरयष्टी उंच होती, बांधा पिळदार होता, कांती सुवर्णासारखी तेजस्वी होती. हात-पाय मात्र अशक्त दिसत. त्यामुळे त्यांना लहानपणी पांगळे समजले जाई. छाती रुंद होती, महाराजांचा चेहरा, दृष्टी, नाकाची ठेवण, तसेच हातांची बोटे वळवण्याची पद्धत अशी होती की, पाहणार्‍यास प्रत्यक्ष मारुतीच पाहात आहोत, असे वाटे. महाराज तीर्थाटनास जाईपर्यंत, त्यांच्या अंगावर जरीकाठी उपरणे, रुमाल, गळ्यात सोन्याची कंठी, हातात सलकडे, बोटात अंगठ्या, कानात टपोरी भिकबाळी व पायात जोडा असे.
 
तीर्थाटनाहून आल्यावर मात्र त्यांच्या पोशाखात बदल झाला. कास मारलेले शुभ्र धोतर, अंगावर उपरणे, डोयाला पांढरा जरीकाठी सोग्याचा रुमाल, हातात काठी, पायात वहाणा, डाव्या मनगटात तांब्याचे कडे, बोटात सल्ले आणि कानात लहानपणापासूनची भिकबाळी, असे. महाराज आपणहून कोणाजवळ काही मागत नसत. गुरुपूजन म्हणून शाली व वस्त्रे, तसेच दक्षिणा दिल्यास जरुरीपुरते पैसे व वस्त्रे घेत, बाकी सर्व गरजूंना वाटत.
 
महाराजांचे वैराग्य व ब्रह्मचर्य : महाराजांच्या ईश्वरनाम भाषेत स्त्रीवाचक शब्दही नसे. स्त्रीसाठी ते ईश्वरनाम भाषेत ‘जय जय राम’ हे नाम उच्चारीत असत. स्त्रिया नमस्कार करण्यास आल्यास, त्यांना लांबून नमस्कार करण्यास सांगत. आपली दृष्टीही त्यांच्याकडे जाऊ देत नसत. उलट, तेच त्यांना नमस्कार करीत. महाराजांचे वैराग्य व ब्रह्मचर्य अतिशय तीव्र होते.
 
महाराजांची शिक्षणातून राष्ट्रोन्नतीची कळकळ : श्रीराममारुती महाराजांना देशाची व समाजाची अवनती थांबवण्यासाठी तरुणपिढी सुशिक्षित, सुदृढ, स्वावलंबी व सुसंस्कारी असावी, असे वाटे. त्यासाठी असे शिक्षण देणार्‍या संस्था समाजात निर्माण व्हाव्यात व त्यामार्फत समाजातील विद्यार्थांना असे शिक्षण मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. १९१४ साली श्रीसंत नाना महाराज श्रीगोंदेकर यांची व महाराजांची भेट, श्री माधवराव नागले यांच्या घरी झाली. नाना महाराज हे मुरुडचे. दोघेही ‘सीकेपी’ समाजातील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दोघेही एकाच गुरुपरंपरेतील असल्याने, दोघांत अनेक विषयावर चर्चा झाली. राममारुती महाराजांनी नाना महाराजांना, शिक्षणाबाबतीतील आपली योजना सांगितली. सुरुवातीला ‘सीकेपी’ समाजात जागृती करावी, असे ठरले. नाना महाराजांनी राममारुती महाराजांच्या प्रेरणेने १९३१ साली अविश्रांत परिश्रम, सत्यनिष्ठा व आंतरिक तळमळ यांच्या बळावर, मुंबईत ‘कृष्णानंद प्रासादिक चां.का. प्रभू शिक्षणोत्तेजक परस्पर साहाय्यक शिक्षणसंस्था ’ व स्त्रियांसाठी ‘मातृवात्सल्य सेवा मंडळ’ या दोन संस्था व विठ्ठलनगर येथे ‘कृष्णानंद राममारुती विद्याश्रम’ संस्था स्थापन केल्या. पुढे त्या सर्व समाजासाठी खुल्या केल्या. अशा तर्‍हेने राममारुती महाराजांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न झाला; परंतु १९४२ नंतर शैक्षणिक संस्थेचे कार्य बंद झाले.

श्री राममारुती महाराजांचा संतसमागम : १९१० साली महाराजांनी शिर्डी येथे साईबाबांची भेट घेतली. भेटीत दोघांनाही खूप आनंद झाला. साईबाबांनी महाराजांना पोटाशी घट्ट कवटाळून धरले. महाराजही आनंदाने उड्या मारून, बाबांचे लाड करू लागले. दोघेही गहिवरले, बाबांच्या आग्रहाखातर महाराज अनेक दिवस शिर्डीत राहिले. निघण्यापूर्वी साईबाबांनी महाराजांना जवळ बोलावून, त्यांच्या कानात काही गुप्त संदेश दिला.राममारुती महाराजांना श्रीसंत गजानन महाराज (नाशिक), श्रीसंत गजानन महाराज (शेगाव), श्रीसंत केशवदत्त महाराज सोनगिरीकर, श्रीसंत शांतारामभाऊ जयवंत (भिवंडी) अशा संतांचा सहवास लाभला.

श्री राममारुती महाराजांची ‘ईश्वरनाम’ भाषा : राममारुती महाराजांचे गुरुबंधू एका बैठकीत, कोणत्यातरी मोठ्या व महत्त्वाच्या सिद्धान्तावर चर्चा करत होते. एक मुद्दा समोरच्या विद्वानांना पटवून देत होते परंतु, समोरच्यांना तो पटत नव्हता. महाराज तेथे होते, त्यांनी तो पटवून दिला. सर्व विद्वान खूश झाले, त्यांनी महाराजांचा गौरव केला. परंतु, त्यांचा गुरुबंधू नाराज झाला, तो म्हणाला, "मी तो मुद्दा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितला असता; परंतु तुमच्यामुळे मला कमीपणा आला.” हे ऐकून महाराजांचे मन उदास झाले. त्यांनी गुरुबंधूच्या पायावर डोके ठेवले व क्षमा मागून, "अशा वादासाठी यापुढे मी भाषा वापरणार नाही,” असे सांगून, त्याक्षणापासून श्रीराममारुती महाराजांनी प्राकृत भाषेचा त्याग केला. व स्वतः तयार केलेल्या ‘ईश्वरनाम’ भाषेचाच शेवटपर्यंत वापर केला. या ‘ईश्वरनाम’ भाषेत ईश्वराची फक्त २२ नावेच वापरली.
 
श्रीराम, जयराम, जय जय राम, रामचंद्र, रघुवीर, रघुपती, शिवशंकर, भीमाशंकर, हर हर महादेव, शिव-शिव, विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, गोविंद-१, गोपाळ-२, गणपती, गोपाळकृष्ण, हरी, हरिनारायण, दत्तात्रय, मारुती, बलभीम या नामांचा वापर करून, ते भाषा वापरत असत. वाराचा उल्लेखसुद्धा ते पुढीलप्रमाणे करत असत. सोमवार- शिवशंकर, मंगळवार- जय जय राम, बुधवार- विठोबा, गुरुवार- दत्तात्रय, शुक्रवार- शिव शिव जय जय राम, शनिवार- मारुती, रविवार- नारायण.
 
महाराजांनी ही भाषा विवक्षित रीतीने बसविली होती. ते इतके जलद बोलत की, जणू काय आपल्या व्यवहारातील ही भाषा आहे, असाच भास होई. सामन्यांपासून विद्वानांनाही, ही भाषा सहजपणे समजे. इतकेच नाही, तर ही कर्णमधुर भाषा अशीच त्यांच्या तोंडून ऐकत राहावी, अशी प्रबळ इच्छा ऐकणार्‍या सर्वांना वाटे. विशिष्ट व्यक्तींचे नाव व क्वचित प्रसंगी न समजलेले वाय दगडी रुळाने, पाटीवर लिहून दाखवित. या त्यांच्या ‘ईश्वरनाम’ भाषेत, महाराज त्यांच्याकडे येणार्‍या शाळकरी मुलांना अवघड अशी गणिते सोडवून देत. महाराजांचे इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, ही भाषा त्यांनी अल्पावधीतच तयार केली. त्यांच्या निधनापर्यंत जवळजवळ २५ वर्षे एकट्याने वापरली.त्यांच्या निधनानंतर ही भाषा नष्ट झाली, अशी भाषा जगातील एकमेव ठरली.
 
श्रीसंत राममारुती महाराजांचे निर्वाण : महाराजांनी निर्वाणापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाणच्या, भक्तांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. एकेदिवशी सकाळी आपले शिष्य श्री शंकरराव गडकरी यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्या सहा महिन्यांच्या पुतण्यास मांडीवर घेऊन, ‘भू: भू: कार’ करून उंच-उंच उड्या मारल्या व त्या बालकाच्या सर्वांगावर हात फिरवून त्यास मातेकडे दिले. हे भाग्यवान बालक म्हणजेच, पोथीचे लेखक अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी (संस्थेचे अध्यक्ष शिरीष अनंत गडकरी यांचे वडील) होत.
 
सर्व भक्तांच्या भेटी झाल्यावर ते कल्याण येथील दळवीवाड्यात आले. त्यांना खूप ताप भरल्याने, सर्व भक्त चिंतातुर झाले. महाराजांनी सर्व भक्तांना दूर जाण्यास सांगितले, आणि पायापासून डोयापर्यंत उपरणे ओढून घेऊन जोरजोरात नामस्मरण करण्यास सुरुवात केली. पहाटे सव्वापाच वाजता ब्राह्म मुहूर्तावर महाराज प्रभू श्रीरामचंद्र स्वरूपात विलीन झाले. ती तारीख होती, दि. २८ सप्टेंबर १९१८, वद्य नवमी शके १८४०. त्यावेळेस केशवराव दळवी एकटेच होते, त्यांनी सर्व भक्तांना ही दुःखद वार्ता सांगितली. हजारो भक्तांसह रात्री ८ वाजता दळवीवाड्यातून अंत्ययात्रा निघाली, ती रात्री १ वाजता कल्याण येथील लालचौकीजवळ पोहोचली. तेथे त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आला. ज्याठिकाणी हा अग्निसंस्कार सोहळा झाला, त्या जागेवर अस्थिकलश ठेवून समाधी बांधण्यात आली आहे.

भाविकांना विनम्र आवाहन : कल्याणच्या लालचौकीजवळ श्रीसंत राममारुती महाराजांचे समाधी मंदिर असून, ते सकाळी ८ ते १ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत दर्शनास उघडे असते. कल्याणमधील त्यांची ही समाधी हे भक्तांचे श्रद्धास्थान असून, भक्तांच्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद देतात, अशीच भक्तांची श्रद्धा आहे. संस्थेतर्फे विविध धार्मिक, तसेच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जातात. प. पू. स्व. अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी लिखित, श्रीसंत राममारुती महाराजांची पोथी व श्री राममारुती स्तवन माहात्म्य यांचे दैनंदिन पठण जरूर करावे. महाराजांच्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास, डॉ. आशाताई गडकरी यांनी लिहिलेले ‘योगीराज चैतन्यमूर्ती श्री राममारुती महाराज’ हे रंगीत फोटोसह २०६ पानी चरित्र वाचावे. हे वाचल्यानंतर महाराजांची महती व त्यांच्या कार्याची माहिती मिळते व सहज मनात विचार येतो,
 
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती! दि. ८ सप्टेंबर २०३१ रोजी महाराजांची १७५वी जयंती आहे. महाराजांची माहिती व महती देशाच्या कानाकोपर्‍यात जाईल, यासाठी आपण प्रयत्न करू.
 
- दिलीप गडकरी




संबंधित मजकूर