काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘मॉ को कुर्सी दो’ म्हणत, निर्लज्जपणे फिदीफिदी हसणारा आणि अक्षरशः डुकरासारखे चेहर्यावर भाव असणार्या पुलकित मणीबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी अगदी रंगात आले होते, याचे अजिबात नवल वाटत नाही. कारण, कोणत्याही स्त्रीचा सन्मान, आदर करण्याची कुवत आणि संस्कार असावेच लागतात. राहुल गांधी ज्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षामध्ये हे संस्कार, ही कुवत आहे का? कारण, काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळातले काळे कारनामे, सध्या तामिळनाडूमध्ये उघड झाले आहेत. काँग्रेस नेत्यांच्या गळ्यातले ताईत असणार्या आर. वीरमणी या ८४ वर्षांच्या गुन्हेगाराने, गेल्या ५० वर्षांत माणुसकीला काळिमा फासला. त्याचा वेध घेणारा हा लेख...
"जेव्हा सरकारने माझ्या खाणकाम व्यवसायावर बंदी आणली, तेव्हा मी वरिष्ठ वकील पी. चिदंबरम यांच्या कायदेशीर सल्ल्याने आणि मदतीने त्या सरकारी कारवाईला न्यायालयात आव्हान दिले,” असे आर. वीरमणी याने, एका मुलाखतीत सांगितले. वीरमणी आणि काँग्रेस नेते चिदंबरम यांचे अतिशय स्नेहाचे, मैत्रीचे, इतकेच नाही; तर व्यावसायिक संबंधही होते. पुढे २००५ मध्ये जेव्हा पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी चेन्नईतील एका कार्यक्रमात वीरमणीचा सत्कार करून, ‘सर्वोच्च निर्यात’ पुरस्कार प्रदान केला होता. काँग्रेसच्या सत्ताकाळात वीरमणीचा व्यवसाय चांगलाच फोफावला. थोडक्यात, काँग्रेसच्या सत्ताकाळात अत्यंत यशस्वी भरभराट प्राप्त झालेला आर. वीरमणी, सध्या तुरुंगात आहे. का? तर, ऑक्टोबर २०२५ मध्ये एका स्वयंसेवी संस्थेला, अज्ञात व्यक्तीकडून एक पेनड्राईव्ह मिळाला. त्यात ८४ वर्षांचा आर. वीरमणी, हा १२ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडिओ होता. पुरावा असल्यामुळे वीरमणीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत चौकशी सुरू झाली. "बालिकेची ओळख पटत नाही, वीरमणी याच्याविरोधात अशी तक्रारही कुणी केली नाही, त्यामुळे विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने ही केस बंद करावी,” असा अहवाल पोलिसांनी, ‘पॉक्सो’ न्यायालयात सादर केला.
मात्र, विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने हा अहवाल फेटाळला आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महिला पोलिसांचे विशेष पथक कामाला लावले. तेव्हा सत्य समोर आले की, २०१० सालापासून वीरमणीने चेन्नईमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. तिथे बालिकांना आमिष देऊन, फसवून किंवा जबरदस्तीने आणले जात असे. वीरमणी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करे आणि याबद्दल कुठे वाच्यता केल्यास, जीवे मारण्याची धमकी देत असे, ब्लॅकमेलही करायचा. या प्रकरणी वीरमणीसोबत त्याची सहकारी शांता आणि तिचा पती महेंद्र सिम्हन, या दोघांनाही अटक झाली आहे. शांता बालिकांना फसवून किंवा जबरदस्तीने वीरमणीकडे पोहोचवत असे. तिला याच कामासाठी वीरमणीने ठेवले होते.
मात्र, शांताला अटक केल्यानंतर तिने पोलीस चौकशीत जे सांगितले, ते वीरमणीच्या विकृत कृत्याची झलकच होती. तिने सांगितले की, ५० वर्षांपूर्वी ती १३ वर्षांची होती, तेव्हा वीरमणी ३५ वर्षांचा होता. वीरमणीने त्यावेळी तिच्यावर अत्याचार केला, तिचे शोषण केले, स्वत:च्या कुकृत्यात तिला बांधून ठेवले. पुढे तिने महेंद्रशी विवाह केला आणि वीरमणीसोबतच्या घृणास्पद कामात, तिला पतीलाही सामील करून घ्यावे लागले. भयंकर आणि दुःखद तितकेच संतापजनकही! याचाच अर्थ, २०१० सालापासूनचे वीरमणीचे गुन्हे आतापर्यंत उघड झाले असले, तरी त्याआधी ५० वर्षांपूर्वीपासून तो गुन्हेगारच होता. तो बालिकांवर अत्याचार करतच होता. या विकृत आणि अतिशय घृणास्पद गुन्हेगाराचे, काळे साम्राज्य सुखेनैव तामिळनाडूमध्ये सुरू होते. हा आर. वीरमणी ‘जेम ग्रेनाईट’ या प्रसिद्ध उद्योगसमूहाचा संस्थापक असून, तो तामिळनाडूमधील अत्यंत श्रीमंत आणि प्रसिद्ध उद्योगपती आहे. ८६ पेक्षा जास्त देशांमध्ये त्याचा व्यवसाय आहे.
२०२५ साली आर. वीरमणीवर पहिला गुन्हा दाखल झाला, तेव्हा द्रविड मुनेत्र कळघम पक्ष सत्तेत होता. तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री विजय यांनी आरोप केला की, "वीरमणी याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून तामिळनाडूच्या तत्कालीन सत्ताधारी द्रमुक पक्षाने दबाव आणला.” या पक्षाचा सत्तेमधला तत्कालीन सर्वांत मोठा साथीदार होता काँग्रेस पक्ष! बाकी इतर पक्षही होतेच. जसे की, ‘डीएमडीके’, ‘व्हीसीके’, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), ’इंडियन युनियन मुस्लीम लीग’, ‘एमडीएमके’, कमल हसन यांचा पक्ष ‘मक्कल निधी मय्यम’ पक्ष. हे सगळेच पक्ष आपण शोषित, वंचित आणि अल्पसंख्याकांचे कैवारी आहोत, अशाच थाटात नेहमी वावरतात, हेही इथे लक्षात घ्यायला हवे.
तसेच काँग्रेससोबत या पक्षाची युती इंदिरा गांधींच्या काळापासूनच होती. काँग्रेस आणि द्रमुकची दोस्ती अगदी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ याच स्तरावरची. तर, याच दोस्तीच्या काळात आर. वीरमणीसारख्या विकृत माणसाची आर्थिक सत्ता बळकट झाली. या ५० वर्षांच्या काळात, त्याने कितीतरी निष्पापांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल पण, त्याला सजा न होता उलट, चिदंबरमसारख्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्याने त्याचे महिमामंडन केले होते.
पण, आर. वीरमणीवर तत्कालीन राज्य सरकारने गुन्हा का दाखल केला नाही? तर, पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तपासात आढळले की, खटल्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि गुन्हा दाबण्यासाठी आरोपीने, ७० कोटी ते ९० कोटी रुपयांचा प्रचंड निधी वापरला. या अफाट पैशांचा वापर तपासात हलगर्जीपणा करणार्या काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना, राजकीय मध्यस्थांना, काही प्रसारमाध्यमांना आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी दिल्याचा प्राथमिक संशय आहे. तसेच, समाज माध्यम आणि सुरुवातीच्या काही माध्यम अहवालानुसार, मागील सरकार काळातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने हे प्रकरण बंद करण्यासाठी, पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप केला जात आहे. बरे, पोलीस तपासाअंतर्गत ज्या सात बालिकांवर वीरमणीने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले, त्या बालिका मागासवर्गीय समाजाच्याच आहेत. अर्थात, त्या कोणत्याही समाजाच्या असत्या; तरी वीरमणीच्या गुन्ह्याची तीव्रता तीच असती आणि त्याबद्दल संताप आणि दुःखही तेवढेच असते. मागासवर्गीय समाजाचे तारणहार असल्याचा आव आणणार्या काँग्रेसचे आणि त्यांच्या नेत्यांचे शोषित, वंचित समाजाबद्दलचे प्रेम कुठे गेले? खरेतर काँग्रेस असो की कम्युनिस्ट, यांनी मागासवर्गीय समाजाचा ‘प्यादे’ म्हणूनच उपयोग केला.
असो! केरळम्मध्येही काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे बिंग फुटले आहे. केरळम्मध्ये कम्युनिस्ट पक्षाची अनेक वर्षे सत्ता होती, आता तिथे काँग्रेस सत्तेत आहे. तिथे एक घटना उघड झाली. २०१९ साली महापुरात, वानियमनुझा पाड्यातील ‘पनियार’ समाजाच्या आदिवासींची घरे वाहून गेली. पाड्यातील लोकांनी वनमपुराच्या जंगलात आश्रय घेतला. आज सात वर्षे झाली; तिथे ना वीज, ना पाणी, ना शौचालय. अश्मयुगात माणूस जसा राहत होता, तसेच जगणे. जल-जमीन-जंगल नावाने देशभरात आदिवासी बांधवांना भ्रमित करणार्या कम्युनिस्ट पक्षाचेच इथे सरकार होते, आता काँग्रेसचे आहे.
गांधी परिवारासाठी तर केरळम् माहेरघरच. या आदिवासी बांधवांच्या दुःखाबाबत ना कम्युनिस्टांना पाझर फुटला, ना काँग्रेसला. शेवटी, केरळम् राज्य मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत, जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या निवासाची आणि इतर व्यवस्था करण्याचे आदेश दिले. हे आदेश दिल्यावर प्रियंका गांधी लगेचच तिथे गेल्या आणि त्यांनी ‘पनियार’ समाजाच्या काही लोकांना भेट देऊन त्यांच्यासाठी काहीतरी करू, असे आश्वासन दिले. मात्र, हे ‘काहीतरी करू’चे आश्वासन अजून हवेतच आहे, तर अशी ही काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सामाजिक बांधिलकी!
सत्तेत असल्यावर शोषित, वंचित समाजाकडे पाहायला यांना वेळ नसतो. सत्ता गेल्यावर मात्र याच समाजाचे कैवारी आहोत, अशा आवेशात आंदोलने, मोर्चे हे काढतात. सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी समाजामध्ये जातीअंतर्गत भेदभाव करत केवळ समाजाला अस्थिर करायचे, बदनाम करायचे, हा काही राजकीय पक्षांचा अजेंडा असू शकतो का? काहीही म्हणा, ‘क फॉर काँग्रेस’ आणि ‘क फॉर कम्युनिस्ट’ दोघेही सारखेच! शोषित, वंचित समाजासाठी यांचे प्रेम म्हणजे ‘पुतना’ मावशीचेच प्रेम!
९५९४९६९६३८