अनेक वर्षे हिंदूंनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. प्रभू श्रीराम अयोध्येच्या मंदिरात विराजमान झाले. या सगळ्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते अशोकजी सिंघल यांचे हे जन्मशताब्दी वर्ष! या तपस्वी व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तुत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
काही व्यक्ती इतिहास घडवतात, काही व्यक्ती स्वतः इतिहास बनतात, काहींच्या आयुष्याची उंची त्यांच्या पदामुळे ठरते, तर काहींच्या व्यक्तिमत्त्वाची उंची त्यांच्या त्याग, तपस्या आणि ध्येयनिष्ठेमुळेच ठरते. स्वर्गीय अशोकजी सिंघल हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. हिंदू समाजाच्या जागरणासाठी, संघटनेसाठी आणि अस्मितेच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी, आपल्या आयुष्याचा होम केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विराट हिंदू एकतेचे शिल्पकार म्हणून, अशोक सिंघल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील संपन्न कुटुंबात दि. २७ सप्टेंबर १९२६ रोजी जन्मलेले, अशोकजी जन्मजात एक बुद्धिमान विद्यार्थीच म्हणून प्रसिद्ध होते. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून त्यांनी, १९५० साली ‘धातुकर्म अभियांत्रिकी’ शिक्षण घेतले. अत्यंत उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द समोर होती. सहा भाऊ आणि एक बहीण असे कुटुंब आणि त्यातील प्रत्येकजण विविध क्षेत्रात अग्रस्थानी. घरचा व्यवसाय, संपन्नता असतानाही त्यांनी स्वतःच्या सुख-समृद्धीपेक्षा, राष्ट्रकार्याची हाक मोठी मानली आणि तद्नंतर दिल्ली, हरियाणासारख्या प्रांतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. अशोकजी हे अभियंता होते परंतु, त्यांनी केवळ धातू घडवला नाही; तर संघसंस्काराच्या प्रकाशात अनेक जीवनांना आकार देण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती वेचली.
दि. १९ फेब्रुवारी १९८० रोजी तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या मीनाक्षीपुरम गावातील जवळपास २०० कुटुंबांतील ८०० व्यक्तींनी, सामूहिकरीत्या इस्लाम धर्म स्वीकारला. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. सामाजिक, राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटली. याच्या विरोधात देशभर जागरण करण्यासाठी, देशाच्या तीन ठिकाणांहून एकात्मता यात्रा काढण्यात आल्या. त्यावेळेपासून अशोकजींना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासाठी देण्यात आले.
१९८३ साली, अयोध्या श्रीराम जन्मभूमी मुक्तीचा विषय सामाजिक पटलावर आला. त्यातूनच पुढे १९८४ साली, दिल्लीच्या विज्ञानभवनात धर्मसंसदेचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले. अनेक साधुसंतांची, धर्माचार्यांची आणि मठाधिपतींची मनधरणी करत, त्यांना धर्मस्थानमुक्तीचे महत्त्व पटवत, धर्मसंसदेच्या व्यासपीठावर एकत्र आणले आणि याच धर्मसंसदेच्या माध्यमातून, श्रीराम जन्मभूमी मुक्तीची घोषणा झाली. अमोघ वक्तृत्व आणि अतुलनीय संघटनक्षमतेच्या जोरावर विविध संप्रदायांचे संत-महंत, पू. शंकराचार्य, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य हिंदू समाजाला एका व्यापक सांस्कृतिक ध्येयाभोवती आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. ‘बाबरी ढांचा’ हा केवळ स्थानिक जमिनीचा मुद्दा न मानता, त्याला राष्ट्रीय अस्मितेचे स्वरूप देण्यात अशोकजींचा मोलाचा वाटा आहे.
श्रीराम जन्मभूमी आंदोलन
अशोकजी सिंघल यांचे नाव घेतले की, ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलना’चा इतिहास अपरिहार्यपणे समोर येतो. श्रीराम मंदिराचा प्रश्न हा केवळ एका मंदिराचाच प्रश्न नाही, या देशाचे राष्ट्रपुरुष स्वातंत्र्यानंतरही कडीकुलपात बंदिस्त असतील, तर आमच्या स्वातंत्र्याला अर्थ काय? असा खडा सवाल अशोकजी करत. श्रीराम जन्मभूमीवरील ‘बाबरी ढांचा’रूपी कलंक मिटला पाहिजे, यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. संत-महंतांना जोडणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि सामान्य हिंदू समाजाला जात, पंथ, प्रांत, भाषा, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून संघटित करण्यासाठी अथक परिश्रम केले. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाने भारताचे राजकीय आणि सामाजिक परिदृश्यच पूर्णतः बदलून गेले.
एप्रिल १९८४ मध्ये धर्मसंसदेने ‘धर्मस्थान मुक्ती यज्ञ समिती’ची घोषणा केली. दुर्दैवाने दि. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या झाली आणि त्यानंतर डिसेंबर १९८४ मध्ये, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ५१४ पैकी ४०४ जागा जिंकल्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासात, प्रथमच एका पक्षाने ७८ टक्के जागा जिंकल्या होत्या. भाजपचा सुपडा साफ झाला होता. इंदिरा गांधी हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवर, राजीव गांधी प्रचंड बहुमताने निवडून आले, भाजपचा पालापाचोळा झाला. ‘भाजप संपला,’ ‘संघपरिवारातील सर्व संस्थांची दुकाने बंद होणार’ अशाप्रकारचेच मथळे आणि अग्रलेख वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले.
सामान्य कार्यकर्ता खचला होता, अनेक कार्यकर्ते निराश, हताश होऊन घरी बसले होते; पण अशोकजी पायाला भिंगरी बांधून संतांना, कार्यकर्त्यांना भेटत राहिले. ’श्रीराम जन्मभूमी आंदोलना’तील विविध कार्यक्रमांना गती देण्यासाठी बैठकांचा, प्रकट कार्यक्रमांचा धडाकाच त्यांनी सुरू केला. त्यावेळी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "संतों का आशीर्वाद इस कार्य को है| पू. देवराह बाबाने कहा हैं, बवंडर होगा, विरोधी शक्तियाँ इस बवंडर में धराशायी होगी| हिंदुत्व देश का केंद्रबिंदू बनेगा.” त्यावेळी वाटले, कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी अशोकजी बोलत आहेत; पण १९८४ ते २००० या काळातील राजकीय पटलावरील चित्र, त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारे होते. १९८४ साली भाजपच्या केवळ २ जागा, १९८९ मध्ये ८५ जागा, १९९१ मध्ये १२० जागा, १९९६ मध्ये १६१ जागा आणि १९९८ मध्ये १८२ जागा.
पूर्वी संघपरिवाराला ‘विशिष्ट जातीपुरतीच मर्यादित संघटना’ म्हणून हिणवले जाई, तर भाजपला शहरी भागातील पक्ष समजले जायचे, उच्चवर्णीय आणि ‘बनीयां’चा पक्ष म्हणून समजले जायचे. ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलना’ने, जाती-पंथ-भाषा संप्रदायांच्या भिंती गळून पडल्या. १९८९ साली झालेल्या मंदिराच्या शिलान्यासाची पहिली वीट ठेवण्याचा मान, अनुसूचित समाजातील रामेश्वर चौपाल यांना दिला गेला. "यह मंदिर का नहीं, हिंदूराष्ट्र का शिलान्यास है|” असे प्रेरणादायी उद्गार त्यावेळी, अशोकजींनी काढले होते.
अविचल ध्येयनिष्ठा : अशोकजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना एक शब्द वारंवार आठवतो- अविचलता. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, टीका होत असो वा कौतुक, अपेक्षित परिणाम त्वरित दिसत असो वा दशकानुदशके वाट पाहावी लागत असो, ध्येयावरचा विश्वास ढळू न देणे हा त्यांचा स्थायीभाव होता. १९९०ची पहिली कारसेवा. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या मुलायमसिंहांचे शासन होते. कारसेवेची घोषणा झाली होती. मुलायमसिंहांनी ठणकावले, "कारसेवकांचे काय घेऊन बसलात, साधा पक्षीसुद्धा अयोध्येत आपले पंख फडफडू शकणार नाही. आलेला कारसेवक जिवंत जाणार नाही.” सर्व वर्तमानपत्रांनी ‘कारसेवा फसणार’, ‘उत्तर प्रदेशच्या सर्व सीमा सिलबंद’ असेच मथळे दिले. देशाच्या विविध भागांतील कारसेवकांचे अटकसत्र सुरू झाले, उत्तर प्रदेशचे तुरुंग कारसेवकांनी भरले होते. त्यावेळी भ्रमणध्वनी नव्हता, आम्ही काही कारसेवक महोबा जेलमध्ये बंद होतो. दि. ३० ऑक्टोबर १९९०, सकाळी १० वाजल्यापासून रेडिओला कान लावून बसलो होतो. वर्तमानपत्रातील बातम्यांवरून आम्हाला वाटत होते, कारसेवा होणार नाही. पण, दुपारी ११ वाजता रेडिओवर बातमी आली, कारसेवा झाली. वादग्रस्त घुमटावर कारसेवकांनी भगवा फडकवला. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तसे अयोध्येच्या गल्लीबोळातून कारसेवक बाहेर पडले. अशोकजींच्या नेतृत्वात जन्मस्थानाकडे कूच केली. अशोकजींनी अविचल ध्येयनिष्ठेच्या आधारावर, आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले होते. पोलिसांचा लाठीमार झेलला, डोके फुटले, रक्तबंबाळ झाले. "हार नही मानूंगा, काल के कपाल पर गीत नया लिखूंगा” या उक्तीप्रमाणे, आदर्श नेतृत्वाचा श्रेष्ठ वस्तुपाठ त्यांनी संपूर्ण देशासमोर ठेवला.
संत-महंतांशी निकट संवाद : अशोकजींच्या नेतृत्वाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे, साधुसंतांशी असलेला त्यांचा निकट संबंध. हिंदू समाजाचे प्रश्न केवळ राजकीय चौकटीतच सोडवता येणार नाहीत, तर समाजाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्तींना एकत्र आणले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच संतशक्तीच्या आदेशाने झालेल्या निर्णयाचे पालन विश्व हिंदू परिषदेने केले. आंदोलनादरम्यान सामाजिक समरसतेबाबत बोलणे होत असे. सर्व आंदोलनात सहभागी संत घोषणा देत असत, ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमी के काम का’, ‘हिंदू हिंदू एक रहे, भेदभाव को नही सहे’.त्यावेळी ‘कथनी और करनी’ तपासण्यासाठी डोम राजाने अशोकजींना विचारले, "सर्व साधुसंत, पू. शंकराचार्य माझ्या घरी भोजन करतील का?” अशोकजींनी तत्काळ सर्व संतांशी बोलून, डोम राजाकडे भोजन केले. सामाजिक समरसतेच्या आचरणाचा याहून वेगळा मार्ग कोणता असू शकतो! अशोकजींच्या प्रयत्नांमुळेच, अनेक संतांनी अनुसूचित जाती-जनजाती वस्त्यांमध्ये प्रवास सुरू केला, अनेक घरी भोजन केले. समरसता यज्ञाच्या आयोजनातूनच ‘मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता’ हा संदेश दिला.
युवाशक्तीची जोड : अशोकजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात आले, त्यावेळी त्यांचे वय साधारणतः ५६ वर्षांचे होते. त्यावेळच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे सरासरी वय ६० होते. ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलना’ची धार तीव्र होऊ लागली होती. ‘श्रीराम-जानकी यात्रां’नी तर उत्तर भारतच ढवळून निघाला. मुस्लीम नेत्यांनी यात्रांवर बंदीची मागणी केली, यात्रा रोखण्याची भाषा सुरू केली. यात्रांची सुरक्षा कोण करणार? संतांसमोर आणि एकंदरच आयोजकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. त्यावेळी अशोकजी पुढे सरसावले. त्यांनी तरुणाईला आवाहन केले की, "श्रीरामजी की यात्रा की सुरक्षा हेतु, हमे युवाओं में विद्यमान हनुमतशक्ती की आवश्यकता है.” बघता-बघता तरुणाईत हनुमानतत्त्व संचारले. यातूनच हिंदू समाजाचे सुरक्षाकवच म्हणून ‘बजरंग दला’चा जन्म झाला. पुढे ‘दुर्गावाहिनी’, मंदिर-अर्चक पुरोहित, सेवा, गौरक्षा, धर्मयात्रा असे अनेक आयाम, विश्व हिंदू परिषदेच्या कामाचा भाग झाले. आज आपण ‘जेन-झी’ची चर्चा करतो. पण, आज ‘जेन-झी’ खर्या अर्थाने आणि सर्वांत शक्तिशाली कुठे असेल, तर ती ‘बजरंग दल’ आणि ‘दुर्गावाहिनी’त आहे.
साधेपणा आणि कार्यकर्त्यांशी नाते : नेतृत्व मोठे होते ते केवळ मोठ्या व्यासपीठावरून नव्हे; तर सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण करूनच. समर्थ रामदासस्वामी उत्तम पुरुषाचे चार गुण सांगतात, नेमके काय योग्य आणि काय अयोग्य, हे ओळखण्याचा विवेक नेत्याच्या अंगी असावा; आपल्या सहकार्यांना एकत्र बांधून ठेवण्याची संघटन कुशलता असावी; यश आणि पदामुळे मीपणा किंवा गर्व येऊ देऊ नये आणि सर्वांत शेवटचे; पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, क्षमाशीलता. वरील सर्व गुणांचा संचय अशोकजींच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांची कार्यपद्धती ही कार्यकर्त्यांना जोडणारी होती. कार्यकर्त्यांमधील उणिवांकडे न बघता, त्यांच्या अवगुणांचा भागाकार आणि गुणांचा गुणाकार कसा करता येईल, याकडेच त्यांचे नेहमीच लक्ष असे.
यासंदर्भातील दोन घटना आठवतात. मुंबईतील एक कार्यकर्ता काही कारणामुळे नाराज असून, कामातून बाजूला होण्याचा विचार करत आहे, असे समजताच अशोकजी स्वतः मुंबईत आले. त्याला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या कार्यकर्त्याचे समर्पणही माहीत होते. कार्यकर्ता टिकला पाहिजे, असाच त्यांचा प्रयत्न होता. दुसरे उदाहरण अन्य राज्यातील आहे. अशोकजी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. विषय हिंदू समाजाच्या प्रश्नांबाबत होता पण, सदर मुख्यमंत्र्यांनी त्यांना तीन तास ताटकळत ठेवले. एका अर्थी, अशोकजींसारख्या संतप्रवृत्तीचा अपमानच केला होता. पण, अशोकजींनी त्याबाबत मनात कोणताही राग न ठेवता, सदर मुख्यमंत्र्यांना क्षमा केली. एवढेच नव्हे, तर पुढील निवडणुकीत ते निवडून यावेत, यासाठी सकल हिंदू समाजाने सहकार्य करावे, यासाठी प्रयत्नही केले. मोठ्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांचे अपराध पोटात घालणे, त्यांच्या गुणांचा उपयोग संघटनेसाठी होईल, यासाठी प्रेरणा देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी अनुयायी निर्माण करण्यापेक्षा संघटन-शरण कार्यकर्ते निर्माण करण्यावर भर दिला.
अशोकजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अल्पपरिचित परंतु सुंदर पैलू म्हणजे, त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांनी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडेच, संगीताचे शिक्षण घेतले होते. एका बाजूला संघटन, आंदोलन, प्रवास आणि कठोर सामाजिक संघर्ष; तर दुसर्या बाजूला संगीताची साधना. यातूनच त्या व्यक्तीच्या अंतर्मनाची श्रीमंती लक्षात येते. श्रद्धेय अशोकजी सिंघल यांचे जीवन म्हणजे, एका व्यक्तीची चरित्रकथा नाही, तर एका महान ध्येयासाठी संपूर्ण आयुष्य वेचणार्या ऋषीची प्रेरणागाथा आहे.आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण संकल्प करूया. स्वतःसाठी जगणारे अनेक असतात; परंतु समाजासाठी जगणारे इतिहास घडवतात. आज श्रद्धेय अशोकजींच्या विचारांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे. ध्येयनिष्ठ, तपस्वी आणि कर्मयोगी व्यक्तिमत्त्वाला, जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
मोहन सालेकर
(लेखक विश्व हिंदू परिषदेचे कोकणप्रांत मंत्री आहेत.)