श्री संत राम मारुती संस्थानच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात; पादुकांचे मंदिरात आगमन!

    27-Sep-2026   
Ram Maruti Maharaj 108th Death Anniversary
कल्याण (Ram Maruti Maharaj 108th Death Anniversary) : येथील राममारुती रस्ता स्थित श्री संत राममारुती समाधी संस्थानच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवाचा प्रारंभ शनिवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. उत्सवाच्या पूर्वसंध्येला सकाळी ९:३० वाजता श्रीमंत सद्‌गुरु माऊली राममारुती महाराजांच्या पादुकांचे श्री जगदंबा मंदिर (दळवी वाडा, कल्याण) येथून संस्थानच्या समाधी मंदिरात आगमन झाले. संस्थानचे अध्यक्ष शिरीष अनंत गडकरी व विश्वस्तांच्या हस्ते पादुकांची मंदिरात स्थापना करण्यात आली.
रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ (भाद्रपद कृष्ण प्रतिपदा) पासून मुख्य उत्सवास सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजता अध्यक्ष शिरीष गडकरी व शीतल गडकरी (ठाणे) यांच्या हस्ते समाधीवर लघुरुद्राभिषेक, पंचामृत महापूजा, पादुका स्थापना व अखंड नामस्मरणाने उत्सवाचा प्रारंभ झाला. (Ram Maruti Maharaj 108th Death Anniversary)
उत्सवातील प्रमुख कार्यक्रम:
 
पंचदिनी श्री राम कथा: २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी ३:०० ते ६:३० या वेळेत भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील (सरळांबे) यांच्या 'पंचदिनी श्री रघुनाथ गाथा (श्री राम कथा)' चे आयोजन करण्यात आले आहे. (Ram Maruti Maharaj 108th Death Anniversary)
 महारुद्राभिषेक सोहळा: २८ सप्टेंबर रोजी समाधी सोहळ्यास १०८ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त सकाळी ७:०० वाजता ३० आचार्यांच्या उपस्थितीत विशेष महारुद्राभिषेक पार पडेल.
 विशेष उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम: २९ सप्टेंबर रोजी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तने, ३० सप्टेंबर रोजी भारुड, गोंधळ व जोगवा कार्यक्रम, तर २ ऑक्टोबर रोजी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या १८ व्या अध्यायाचे पठण व सांजवेळी दीपोत्सव साजरा होईल. तसेच २ ऑक्टोबर रोजी महाराजांच्या आवडीचा पुरणपोळीचा भोग लावला जाणार आहे.
प्रयाणकाळ उत्सव व पालखी सोहळा: उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजेच रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:१५ वाजता श्रींचा 'प्रयाणकाळ उत्सव' साजरा होईल. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे 'काल्याचे कीर्तन' व दुपारी १२:०० ते २:०० या वेळेत महाप्रसाद (भंडारा) होईल. सायंकाळी ५:०० वाजता शहरातून श्रींच्या पादुकांची पालखीतून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिरीष गडकरी आणि विश्वस्त मंडळाने केले आहे. (Ram Maruti Maharaj 108th Death Anniversary)





संबंधित मजकूर