हैदराबाद (Pink Power Run Hyderabad 2026) : स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपायांचा प्रसार करणे आणि महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंक पॉवर रन ३.०’मध्ये तब्बल ३५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील रमाबाई रणवीर यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) आणि सुधा रेड्डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे आणि महिलांना आरोग्याबाबत जागरूक करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. (Pink Power Run Hyderabad 2026)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी यापूर्वी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अनवाणी पायांनी ५ किलोमीटर धाव घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नाची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. पिंक पॉवर रनमधील त्यांच्या सहभागामुळे महिलांच्या जिद्दीची आणि चिकाटीची झलक पाहायला मिळाली. (Pink Power Run Hyderabad 2026)
पिंक पॉवर रनमध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांचा समावेश होता. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ७५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच दिव्यांग व्यक्तींनीही उत्साहाने सहभाग घेतला. स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच महिलांच्या आरोग्याचा आणि सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. (Pink Power Run Hyderabad 2026)