आपण सध्या २०२६ मध्ये आहोत; पण अजूनही आपल्याकडे काही भागात रूढी-परंपरांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झालेला नाही. आपण आज म्हणतो की, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळायला हवा, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीने काम करायला हवे. पण, अजूनही काही ठिकाणी पुरुषसत्ताक मानसिकता, स्त्रीला पंख पसरून उडू देण्याच्या विचारांच्या विरोधात आहे. पुरुषांनी आपला मार्ग निवडल्यास त्याची वाहवा होते; पण हेच पाऊल स्त्रीने उचल्यास लगेच तिचे पंख छाटण्यात येतात. जर कोणी याविरोधात जाऊन आपल्या स्वप्नांना बळकट करण्याचा प्रयत्न केला, तर समाज लगेच तिला ‘बंडखोर’ म्हणूनही मोकळा होतो. अशाच विभिन्न परिस्थितीतून आलेल्या सहा ‘बंडखोर’ महिलांची गोष्ट महेश मांजरेकर यांनी त्यांच्या चित्रपटात दाखविली आहे. महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट विविध भाषांमध्ये आहेत. मात्र, मांजरेकरांनी या चित्रपटातून या विषयाकडे वेगळ्या चष्म्याने बघण्याचा प्रयत्न केला आहे.
मीरा ( प्रियदर्शिनी इंदलकर), श्रद्धा (मृणाल कुलकर्णी), उषा (छाया कदम), रूपा (पूजा कातुर्डे), सीमा (तितिक्षा तावडे), उर्वशी (नित्यश्री पाटील) या सहा ‘बंडखोर’ महिलांभोवती चित्रपटाची कथा फिरते. आपल्या आजोबांचे निधन झाल्याची बातमी कळताच, मीरा आपल्या गावी येते. तिथे आल्यावर रूढी-परंपरांवरून तिचे तिच्या मामा (मंगेश देसाई)सोबत खटके उडतात.
आजही स्त्रियांवर बंधने लादली जातात, म्हणून मीरा व्यथित होते. मग वेगवेगळ्या टप्प्यांवर या सहा स्त्रियांचा रस्ता एकच असल्याची जाणीव त्यांना होते. आता अशा काय घटना घडतात की, सगळ्याजणी समाजाविरोधात बंडखोरी करतात? त्यात त्यांना यश मिळते का? हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची पटकथा अगदीच ‘ओल्ड स्कूल’ आहे. त्यामुळे आपण ९०च्या दशकातील चित्रपट बघतोय का काय, असे आपल्याला जाणवत राहते. पण, सिनेमाचा विषय वास्तववादी आहे. मात्र, सिनेमाच्या नावातच बंडखोरी असल्याने नावाप्रमाणेच काहीतरी धमाकेदार बघायला मिळेल, अशी तुमची अपेक्षा असेल; तर तुमचा अपेक्षाभंग नक्कीच होईल. चित्रपटाची कथा जर सशक्त असती, तर हाच विषय भन्नाट पद्धतीने सादर होऊ शकला असता. विस्कळीत पटकथेने चित्रपटाची सगळी मजाच घालवली असली, तरीही चित्रपटातील कलाकारांनी अभिनयाच्या बळावर चित्रपट तारून नेला आहे.
महेश मांजरेकरांनी या सिनेमात स्त्रियांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा, स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि समाजात सन्मानाने वावरण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित केले आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा अर्थ केवळ बंधनांमधून मुक्तता नव्हे; तर स्व-विकास, शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन असा आहे. संविधानाने स्त्रियांना समान हक्क दिले असले, तरी प्रत्यक्षात अजूनही समाज आणि कुटुंबातील मानसिकता बदलण्याची गरज आहे. खर्या अर्थाने स्त्री-स्वातंत्र्य तेव्हाच प्रस्थापित होईल, जेव्हा प्रत्येक स्त्रीला सुरक्षित, समान आणि भयमुक्त वातावरण मिळेल. अशा परिस्थितीत मांजरेकरांसारखा मुरलेला दिग्दर्शक असा विषय हाताळतो, हे कौतुकास्पदच!
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रियदर्शिनी इंदलकरने चेंडू थेट स्टेडियम बाहेर मारला आहे. ‘हास्यजत्रे’ची आपली विनोदी चौकट मोडून, अशी आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्याबद्दल प्रियदर्शिनीचे अभिनंदन! कमाल आणि नैसर्गिक काम केले आहे तिने. मंगेश देसाईसारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर तिचे सिन कमाल झाले आहेत. मंगेशनेही मामाच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. छाया कदम आणि मृणाल कुलकर्णी यांनी धीरगंभीर भूमिकेतही छाप सोडली आहे. तितिक्षा तावडेने वयापेक्षा मोठी भूमिका निभावून सगळ्यांनाच चकित केले. नित्यश्रीनेही तिची दखल घेण्यास भाग पाडले आहे. पूजा मात्र तिच्या पात्रात ‘मिस फिट’ झाली.
इरावती कर्णिक आणि सिद्धार्थ साळवी यांचे संवाद, ही चित्रपटाची जमेची बाजू. त्यांच्यातील साधे, सोपे, सरळ संवाद प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतात. हितेश मोदक यांचे संगीत ऐकण्यासारखे झाले आहे. सिनेमाचे शीर्षकगीतही मस्त जमून आले आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा सक्षमच आहे; पण पटकथेवर अजून काम केले असते, तर हा चित्रपट या वर्षातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक झाला असता. असो. पण, तरीही महेश मांजरेकर यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने सहा नायिकांची मोठ्या पडद्यावर दाखवलेली बंडखोरी नक्कीच बघण्यासारखी आहे.
निर्माता : संजय शेट्ये
कथा, पटकथा, दिग्दर्शक : महेश मांजरेकर
कलाकार : प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम, मृणाल कुलकर्णी, तितिक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री पाटील, मंगेश देसाई.
अवधी : २ तास १२ मिनिटे
- कपिल देशपांडे