मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सातारा शहरालगतच्या महादरे संवर्धन राखीव क्षेत्रात तब्बल १२६ पक्षीप्रजातींची नोंद झाली आहे (Mahadare Conservation Reserve). विशेष म्हणजे अवघ्या १०५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या या सर्वेक्षणात भारतासाठी स्थानिक (Endemic) सात प्रजाती, ‘असुरक्षित’ (Vulnerable) तीन आणि संकट समिप श्रेणीतील (Near Threatened) दोन प्रजाती आढळल्या आहेत (Mahadare Conservation Reserve). महादरेच्या विविध अधिवासांमुळे येथे पक्ष्यांच्या खाद्यसाखळीतील विविध गटांचे वैविध्यही मोठे असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. (Mahadare Conservation Reserve)
‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’मध्ये २६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये महादरे संवर्धन राखीव क्षेत्रामधून नोंदवलेल्या पक्ष्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. रिया पाटील, गायत्री पवार, नेहा बेंद्रे, अरुणा शेलार आणि सुनील भोईटे यांनी महादरे संवर्धन राखीव क्षेत्रातील पक्षीवैविध्याचा अभ्यास केला आहे. एप्रिल २०२१ ते मे २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. पॉइंट काउंट पद्धतीसह प्रत्यक्ष नोंदींच्या माध्यमातून पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. महादरे संवर्धन राखीव क्षेत्र उत्तर सह्याद्रीमध्ये सुमारे ८०० मीटर उंचीवर असून त्याचे क्षेत्रफळ १०५ हेक्टर आहे. या परिसरात भातशेती, मानवी वस्ती, सागाची लागवड, गवताळ प्रदेश, वनक्षेत्र आणि पाणथळ अधिवास आहेत. दोन प्रमुख जलसाठे तसेच लहान हंगामी प्रवाहही या क्षेत्रात आहेत. विविध प्रकारच्या अधिवासांची ही रचना पक्ष्यांच्या विविध प्रजातींना अन्न, निवारा आणि प्रजननासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देते.
नोंद झालेल्या १२६ पैकी १२४ प्रजाती वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सूचीबद्ध आहेत. संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रजातींमध्ये पिंगट गरुड (Tawny Eagle), नदी सुरय (River Tern) आणि महाधनेश (Great Hornbill) या तीन प्रजातींचा, तर पांढऱ्या मानेचा करकोचा (Asian Woolly-necked Stork) आणि भारतीय धाविक (Indian Courser) या दोन संकट समिप प्रजातींचा समावेश आहे. तसेच बाकचोच सातभाई (Indian Scimitar-babbler), पिवळी रामगंगा (Indian Yellow Tit), पांढऱ्या कंठाची नाचण (Spot-breasted Fantail), पांढऱ्या गालाचा कुटूरगा, राखी रानकोंबडी (Grey Junglefowl), मलबार तुरेवाला मंडोल (Malabar Lark), मलबार शिळ कस्तूर (Malabar Whistling-thrush) या भारतापुरत्या स्थानिक सात प्रजातींची नोंद झाली.
खाद्याच्या आधारे पक्ष्यांचे सहा गट करण्यात आले. त्यामध्ये कीटकभक्षी पक्ष्यांच्या ३८, मांसाहारी ३४, सर्वभक्षी ३०, धान्यभक्षी १२, फळभक्षी ९ आणि मधुरस घेणाऱ्या तीन प्रजाती आढळल्या. यावरून महादरे परिसरातील खाद्यसंसाधनांची विविधता आणि त्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या कार्यात्मक वैविध्याचे महत्त्व अधोरेखित होते. महादरेतील जलस्रोतांमध्ये २२ माशांच्या प्रजाती आढळत असून त्यावर मासेभक्षी पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होते. याशिवाय परिसरात १८४ फुलपाखरांच्या प्रजाती आणि ३९२ वनस्पतींची नोंद यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये झाली आहे. त्यामुळे कीटक, फुलपाखरे, मासे, उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांसाठी हा परिसर महत्त्वाचा अधिवास ठरतो.