पालघर जिल्ह्यातील दुर्गम जव्हारच्या दर्याखोर्यांत मागील चार दशकांपासून वंचितांचे अश्रू पुसून, आयुष्याला स्वाभिमानाचा प्रकाश देणार्या प्रमिला औदुंबर कोकड यांच्याविषयी...
ओं विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव।
यद भद्रं तन्न आसुव॥
(यजुर्वेद - ३०.३)
अर्थात, हे प्रकाशमय परमेश्वरा, आमच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि वाईट विचार दूर कर आणि जे कल्याणकारी, मंगलमयी व श्रेष्ठ आहे, ते आम्हाला प्राप्त करून दे. कारण, मानवाच्या आयुष्यात खरी समृद्धी ही धन-संपत्तीने नाही, तर त्याने समाजासाठी दिलेल्या योगदानाने मोजली जाते. परमेश्वराने आपल्याला 24 तास दिले आहेत; त्यातील किमान एक तास तरी नि:स्वार्थपणे समाजासाठी द्यावा, हा पवित्र मूलमंत्र उराशी बाळगून गेली चार दशके आदिवासी आणि दुर्गम भागातील दिव्यांग, महिला आणि वंचितांसाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या आधुनिक कर्मयोगिनी म्हणजे प्रमिला औदुंबर कोकड!
दि. १५ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेल्या प्रमिला यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील औदुंबर कोकड (नाना) हे लोणावळ्याच्या ‘मन:शक्ती’ केंद्राचे साधक होते.
वडिलांच्या नोकरीतील बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण गुजरात आणि महाराष्ट्रात झाले. भावंडांमध्ये मोठ्या असलेल्या प्रमिला यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी सुरू केली; पण नियतीने त्यांच्यासाठी एक उदात्त ध्येय आखले होते. पुण्यातील टिळक ‘बीएड‘ महाविद्यालयात कर्णबधिर शिक्षक प्रशिक्षणादरम्यान त्यांना एका महान सत्याची जाणीव झाली-कर्णबधिर मुलांच्या वाक्यंत्रणेत दोष नसतो, योग्य शिक्षण आणि आपुलकी मिळाल्यास ही मुलेही स्वाभिमानाने जगू शकतात.
शहरात सुखकर नोकरीची संधी असतानाही त्यांनी आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे जाण्याचा निर्णय घेतला. १९८६ साली जव्हारमधील एका राम मंदिरात अवघ्या आठ ते दहा कर्णबधिर मुलांपासून त्यांनी अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत हा खडतर प्रवास सुरू केला. मुलांची स्वच्छता, स्वयंपाक, शिक्षण ते संगोपन अशा सर्व भूमिका प्रमिला यांनी एकटीने सांभाळल्या.
या निष्काम सेवेला हळूहळू समाजातील दानशूर हातांची साथ मिळाली व श्यामराव तेंडुलकर यांनी त्यांचे वडील शिवराम तेंडुलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या एक एकर जमिनीवर शाळेची वास्तू उभी राहिली. नंतर १९८९ साली शाळेला अनुदान मिळाले व शाळा नावारूपाला आली. दि. ३ डिसेंबर २००० रोजी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कला व नृत्य स्पर्धेत भारतातील ९७ नामांकित शाळांना मागे टाकत जव्हारच्या या मूकबधिर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
दि. २३ मे १९९४ रोजी त्यांनी ‘सुहासिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. आज या संस्थेच्या चार शाखा असून, ३ हजार ५००हून अधिक महिला सभासद आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.
‘कोहिनूर आदिवासी कला केंद्र’ आणि ‘वारली आर्ट हेरिटेज’च्या माध्यमातून त्यांनी पारंपरिक वारली कलेला जागतिक ओळख मिळवून देत, शेकडो आदिवासी तरुणांना रोजगाराचा मार्ग दाखवला.
“कर्णबधिर आणि विशेष मुलांच्या डोळ्यांत जेव्हा आत्मविश्वासाची चमक दिसते, तेव्हा जगातल्या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठे समाधान मिळते,” असे प्रमिला कोकड सांगतात.
संवेदनशीलतेचे केंद्रनिवृत्तीनंतर मिळणारे हक्काचे पैसे स्वतःसाठी न वापरता त्यांनी २००७ मध्ये ‘दिव्य विद्यालय’ची (गुलमोहर मतिमंद व अंध मुलांची निवासी शाळा) पायाभरणी केली. लायन्स क्लब, सेवा यूके (UK) आणि दानशूर हितचिंतकांच्या मदतीने जव्हारच्या निसर्गरम्य परिसरात १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक निधीतून भव्य वास्तू उभी राहिली. आज येथे ‘ऑटिझम’, ‘डाऊन सिंड्रोम’, बहुविकलांग आणि दृष्टिबाधित मुलांना ब्रेल लिपी, ‘एनव्हीडीए’ टॉकिंग सॉफ्टवेअर, संगीत, मल्लखांब आणि ‘व्होकेशनल ट्रेनिंग’द्वारे स्वावलंबी बनवले जाते.
‘कोविड-१९’च्या भीषण काळातही त्यांनी भयमुक्त होऊन ५० बेडचे कोविड सेंटर चालवले आणि गरजू कुटुंबांना ३ हजार ५०० धान्य किट्सचे वाटप केले. या विविध क्षेत्रांत प्रमिला कोकड यांच्या योगदानामुळे दिव्यांग शाळेस राष्ट्रीयस्तरावर चित्रकला व नृत्यात प्रथम क्रमांक, ३ हजार ५०० सदस्य असलेल्या चार महिला पतसंस्था व दोन हजारांहून अधिक महिलांना रोजगार, ५० बेडचे ‘कोविड’ रुग्णालय, ३ हजार ५०० धान्य किटचे वाटप, ‘अपंग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार’ (२००९) असे अनेक मानाचे व समाधानाचे अनुभव घेता आले.
प्रमिला कोकड यांच्या कार्यात आदिवासी कला व संस्कृतीला विशेष स्थान आहे. संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी दहा वर्षे ‘वनोत्सव’ हा उपक्रम राबवला. २००७ साली ‘गुलमोहर’ गतिमंद व अंध मुलांची निवासी शाळा सुरेश जोशी (भैय्याजी) यांच्या हस्ते सुरू केली. वसतिगृहाचे लोकार्पण इंग्लंडचे खासदार बॉब ब्लेकमन यांच्या हस्ते झाले. अंध, गतिमंद, कर्णबधिर मुला-मुलींची सेवा करतानाच, त्यांनी अखिल भारतीय परिषद, पालघर जिल्हा पालक म्हणूनही दायित्व सांभाळले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून ते महामहीम राष्ट्रपतींपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित होऊनही, वयाच्या ७६व्या वर्षी प्रमिला यांचे कार्य त्याच उत्साहाने सुरू आहे. त्यांचा हा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी प्रामाणिक निष्ठा आणि नि:स्वार्थ सेवाभाव असेल; तर दुर्गम दर्याखोर्यांतही परिवर्तनाचा सूर्य उगवू शकतो. प्रमिला यांचे जीवन हे आजच्या आणि येणार्या पिढ्यांसाठी मानवतेचा दीपस्तंभ आणि अमूल्य प्रेरणास्रोत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
- कमलेश संखे