‘धर्म’-‘रिलिजन’मधील मूलभूत फरक आणि पंडितजींचे चिंतन

    25-Sep-2026
 
Pandit Deendayal Upadhyaya
 
‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ या दोन्ही संकल्पनांमधील मूलभूत फरक सांस्कृतिक परंपरांचा पाश्चात्य आणि भारतीय दृष्टिकोन अधोरेखित करतो. थोर विचारवंत आणि ‘एकात्म मानवदर्शना’चे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही ‘धर्म’ व ‘रिलिजन’ यांच्या अर्थाचे सविस्तर विवेचन त्यांच्या व्याख्यानांतून केले आहे. तेव्हा, आज पंडितजींच्या जयंतीनिमित्ताने ‘धर्म’ व ‘रिलिजन’ यासंबंधी त्यांच्या आशयगर्भ विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
 
उज्जैन येथे ‘युवा धर्म संसद’च्या सहाव्या अधिवेशनात शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ यांतील मूलभूत फरक स्पष्ट केला. डॉ. भागवत म्हणाले, “रिलिजन’ म्हणजे बांधून ठेवणे. ‘रिलिजन’ हा शब्द ‘रिलिजिओ’ (Religio) या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ, ‘एखाद्या चौकटीत किंवा शिस्तीत बांधून ठेवणे’ असा होतो. ‘रिलिजन’ माणसाला विशिष्ट उपासनापद्धतीशी मर्यादित करतो. ‘धर्म’ हा शब्द संस्कृत धातू ‘धृ’पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ, ‘धारण करणे’ असा आहे. धर्म माणसाला कोणत्याही चौकटीत बांधत नाही, तर तो माणसाला मुक्तीकडे (मोक्षाकडे) घेऊन जातो. व्यापक आणि शाश्वत धर्म हा केवळ पूजाअर्चा किंवा वृद्धापकाळातील विषय नसून, तो सृष्टीच्या सुरुवातीपासून अंतराळाच्या विनाशापर्यंत टिकून राहणारा शाश्वत नियम आहे. जसे पाण्याचा धर्म वाहणे आणि अग्नीचा धर्म प्रज्वलित होणे आहे, तसेच मानवाचा धर्म सत्यावर आणि कर्तव्यावर चालणे आहे.”
 
खरा धर्म हा पूजापद्धतीवर नाही; तर सत्य, सुचिता, करुणा व आत्मसंयम या चार मुख्य मूल्यांवर आधारित आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे, हे मानवाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जंगलांचा विनाश आणि निसर्गाची हानी करणे, हा ‘अधर्म’ आहे.
 
समाजधारणेचा मंत्र म्हणजे धर्म
 
थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी चार व्याख्याने मुंबई येथे सन 1965च्या एप्रिल महिन्यात दिली व स्वतंत्र भारतासमोरील आव्हानांची सुस्पष्ट कल्पना दिली. त्यानंतर तीन वर्षांत 1968 मध्ये पंडितजींचा अकाली मृत्यू झाला. पण, रा. स्व. संघाकडून भारतविषयक काही मूलभूत विचार यांचे प्रसारण शक्यतो करायचे नाही, ही सार्वजनिक मानसिकता असल्यामुळे पंडितजींच्या विचारांचे प्रसारण मोठ्या प्रमाणात झाले नाही.
 
पंडितजींनी ‘धर्म’ व ‘रिलिजन’ यांच्या अर्थाचे सविस्तर विवेचन केले आहे. ते म्हणतात, “राष्ट्रीय पातळीवर राज्यव्यवस्था समाजाच्या सर्व अंगांचा विचार करते. पण, समाजधारणेचा आधार कोणता असतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. भारतीय संकल्पनेप्रमाणे ‘धर्म’ हा समाजधारणेचा प्रमुख आधार आहे. ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ नाही. ‘धर्म’ या शब्दाचे इंग्रजीमध्ये ‘रिलिजन’ हे रूप होऊ शकत नाही. ‘धर्म’ हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो, त्या संदर्भानुसार त्या शब्दाचा अर्थ समजला जातो. परंतु, सर्वसाधारणपणे, ‘धर्म म्हणजे सत्य, रचना, न्याय, प्रशिक्षण, कर्तव्य, सदाचारी वर्तणूक’ असे मानले जाते. ‘धर्म’ हा शब्द प्रथम ‘ऋग्वेदा’त क्रियाकर्म, न्यायपूर्ण व्यवहार याअर्थी वापरलेला आढळतो. ‘धर्म’ हा शब्द अनेकार्थी शक्तिशाली राहिला आहे. ‘धर्म’ हा शब्द पंथ किंवा संप्रदाय यापेक्षा वेगळा आहे.”
 
धर्माधिष्ठित जीवन; सुखी-समाधानी जीवन!
 
संपत्ती व स्त्री-पुरुष आकर्षण या गोष्टींना मानवी आयुष्यात स्थान आहे. प्रत्येकास आपल्या भौतिक गरजा भागविण्याची इच्छा असते. आयुष्यात कला, वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी पुरेसा वेळ मिळणेही आवश्यक असते. माणसे पैसे मिळविणे आणि भौतिक गरजा भागविणे यात एवढे गढून जातात की, त्यामुळे त्यांना आपण समाजजीवनास काही हानी पोहोचवितो, याचे भान त्यांस राहात नाही. आपल्या पूर्वजांना या गोष्टींची कल्पना होती आणि म्हणून त्यांनी अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी समाजासाठी काही नियम ठरविले. व्यक्तीचे जीवनात अधःपतन न होता, समाज दुभंगला न जाता, व्यक्ती व समाज सतत विकसनशील राहावेत; यासाठी सर्वव्यापी व शाश्वत असे काही नियम निश्चित केले. त्या सर्व एकत्रित नियमांचे नाव ‘धर्म’ असे आहे. पण, संपत्ती व भौतिक गरजा यांचे महत्त्व जाणून त्यांनी त्यांचा समावेश धर्म आणि जीवनाचे ध्येय यामध्ये केला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार गोष्टी म्हणजे जीवनातील चार पुरुषार्थ आहेत. त्यांचे महत्त्व समान मानले आहे. या चार पुरुषार्थांच्या आधारे व्यक्तीने धर्म म्हणजे कर्तव्य, कर्म व मोक्ष म्हणजे जीवनाचे ध्येय; या मर्यादेत अर्थ-संपत्ती मिळवावी. वैयक्तिक व कौटुंबिक कलात्मक, आध्यात्मिक आवडी-निवडी जपाव्यात व अपेक्षित भौतिक गरजा भागवाव्यात. या चार पुरुषार्थांच्या आधारे व्यक्तीने आपल्या क्षमतेप्रमाणे आपले जीवन जगणे, ही जीवनाची सार्थकता असते.
 
राष्ट्राच्या संदर्भात ‘धर्म’
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्राच्या संदर्भात ‘धर्म’ ही संकल्पना कशी विचारात घ्यावी, हे देखील स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, “राष्ट्राची ध्येये-धोरणे पूर्ण करण्यासाठी जे नीतिनियम पाळावयाचे असतात, तो त्या राष्ट्राचा धर्म असतो. धर्म हा राष्ट्राचा ठेवा असतो. धर्मास बाधा पोहोचली, तर राष्ट्राचे नुकसान होते. राष्ट्राच्या धर्माविरुद्ध जाणे, याचा अर्थ राष्ट्राच्या विरुद्ध जाणे असा होतो. राष्ट्राचा धर्म हा देवळात, मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये नसतो. देवळात जाणे हे त्याने अवलंबिलेल्या पंथाच्या किंवा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे असेल; पण ते धर्मकृत्य असेल असे नाही. तसे ते धर्मकृत्य धरले जाते. कारण, धर्माचा अर्थ, ‘रिलिजन म्हणजे पंथ व संप्रदाय हा प्रचलित झाला व भ्रामकता निर्माण झाली.”
 
संघर्ष ‘रिलिजन’मुळे, धर्मामुळे नाही!
 
‘धर्म’ व ‘रिलिजन’ यात मूलगामी फरक आहे. हा फरक जाणून न घेता, या शब्दांचा उपयोग करण्यात आल्यामुळे २०व्या शतकात मानवी समाजास अनेक खडतर प्रश्नांना तोंड द्यावे लागले. अद्याप तीच परिस्थिती आहे. प्रचलित परिभाषेमध्ये ‘रिलिजन’ म्हणजे धर्म, असे सर्रास समजले जाते. काही सुसंघटित रिलिजन/पंथ/संप्रदाय यांचे अनुयायी एका पुस्तकास किंवा एका देवदूतास मानतात. त्यांना न मानणारे हे अगदी पापी नाहीत; पण अधार्मिक समजले जातात. त्यांच्या मते, मानवी जीवांचे निर्वाण व मोक्ष या देवदूतांकडूनच शक्य असते. मानवी इतिहासात ‘रिलिजन’वर विश्वास ठेवणार्‍यांकडून छळ, असहिष्णुता, समाजावर अधिपत्य गाजविण्यासाठी रक्तपात घडवून आणून समाज विखुरला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. समाज दुभंगणारी एक प्रचंड शक्ती म्हणून ‘रिलिजन’चे इतिहासात स्थान निर्माण झालेले आहे. ‘रिलिजन’ आणि ‘धर्म’ यासंबंधी सांगताना पंडित दीनदयाळ यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले होते की, “आपण ‘रिलिजन’ या शब्दाचा वापर ‘धर्म’ म्हणून करतो. युरोपियन जीवनपद्धतीच्या शिक्षण प्रणालीचा आपण मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. त्याचा परिणाम म्हणून ‘रिलिजन म्हणजे धर्म’ असे समीकरण आपण गृहीत धरले. वास्तविकतः पश्चिमेच्या क्षेत्रात जे अन्यायकारी-अत्याचारी प्रकार झाले, ते ‘रिलिजन’मुळे झाले. संघर्ष काही पंथांमध्ये, संप्रदायांमध्ये झाले; ते संघर्ष धर्मामुळे झालेले नव्हते. ते सर्व संघर्ष धर्मामुळे झाले असे मानले गेले, ही चूक आहे.”
 
‘धर्म’ ही संकल्पना विस्तृत आहे. मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी ही संकल्पना आहे. समाजास जो धारण करतो, त्यास ‘धर्म’ म्हणतात. धर्माची तत्त्वे ही सर्वव्यापी व शाश्वत असतात. कालानुरूप त्यांची मांडणी वेगवेगळी असू शकते. कार्यवाही परिस्थितीप्रमाणे होते. धर्माची काही तत्त्वे प्रासंगिक असतात, काही नित्य असतात. ‘धर्म’ ही मानवी जीवन सातत्याने संरक्षित व सकारात्मक राहील, याची काळजी घेणारी उपाययोजना असते.
 
‘रिलिजन’चा पाश्चात्य दृष्टिकोन
 
पाश्चात्य सांस्कृतिक परंपरा ‘रिलिजन’ याभोवती वेष्टित आहेत. युरोपात 16व्या व 17व्या शतकात निर्माण झालेली राज्ये ही चर्च व कल्याणकारी राज्ये यांच्या संघर्षातून निर्माण झाली आहेत. आज राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली नामाभिधाने या संग्रामकाळात प्रचलित झाली आहेत. व्यक्ती, राज्ये व चर्च यांची कार्यक्षेत्रे व परस्पर संबंधांची प्रमेये याच काळात जन्मास आली. व्यक्तीची ओळख, वंशपरंपरा, स्वायत्तता आदी संज्ञा या चर्च आणि राज्ये यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आहेत. जगातील बर्‍याच भागावर असलेल्या प्रभावाचा परिणाम म्हणून पाश्चात्त्य देशांमध्ये जन्मास आलेल्या शक्ती या समाज विभाजित करणार्‍या असल्या, तरी त्या आधुनिक कल्पना आहेत; असा बोलबाला झाला. पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणपद्धतीचा प्रभाव म्हणून भारतीय तसाच विचार करावयास लागले. एवढेच नव्हे, तर भारतीय विचार-दृष्टिकोन हा मागासलेला आहे, असा विचार भारतीयांवर बिंबविला गेला. परिणाम म्हणून, भारतीय दार्शनिकांनी भारतीय विचारपद्धतीकडे कानाडोळा करून पाश्चात्य दृष्टिकोन स्वीकारला. आपण भारतीयांनी पाश्चात्य विचारांनी आणि संकल्पांनी तयार केलेल्या परिप्रेक्ष्यात स्वतःस सामावून घेतले. विभाजित करणार्‍या शक्तींचा स्वीकार केल्यामुळे भारतीय समाजात संघर्षाची, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
 
‘रिलिजन’ या शब्दामागे हिंदू व ख्रिश्चन दृष्टिकोनात फरक आहे, हे समजून घेतले पाहिजे. हिंदूंच्या दृष्टीने धर्म म्हणजे केवळ आचार नव्हे, तर ते जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. हिंदू परंपरेत केवळ एकच पवित्र ग्रंथ, एकच देवदूत, एकच परंपरा नाही. हिंदूंच्या दृष्टीने हा सनातन धर्म आहे. ‘सनातन’ याचा इंग्लिश अर्थ आहे, ‘timeless’. धर्म याचे भाषांतर ‘रिलिजन’ असे केले, तर ‘धर्म’ या संज्ञेत अभिप्रेत असलेली व्यापकता ‘रिलिजन’ या शब्दात ध्वनित होत नाही. धर्म हा ‘रिलिजन’ला सामावून घेऊ शकतो; पण रिलिजन ‘धर्म’ ही संकल्पना सामावू शकत नाही. तसे समजले की, गोंधळ निर्माण होतो.
 
समाजातील नैतिक जबाबदारीबाबत ‘सत्य’, ‘ऋत’, ‘ऋण’, ‘व्रत’ असे अनेक शब्द वापरले जातात. त्यांचा संबंध धर्माशी लावला जातो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ किंवा ‘अनो भद्रःक्रतावो विश्वतः’ (Let noble thoughts flow to us from all sides) हे सांगताना हा भारताचा राष्ट्रधर्म आहे, असेच सांगितले जाते. या घोषणा हिंदूंच्या पुरातन ग्रंथातून असल्या, तरी आज हजारो वर्षांनंतरही त्या विकासप्रेरक आहेत. आजही ‘काहीतरी असण्यापासून काहीतरी बनण्यासाठी’ मार्गदर्शक आहेत.
 
- प्रा. नारायण गुणे




संबंधित मजकूर