पश्चिम बंगालमधील २५० खासगी मदरशांना लागणार टाळे; शुभेंदु अधिकारी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

    24-Sep-2026   
 
West Bengal 250 Madrasas Closure
 
मुंबई (West Bengal 250 Madrasas Closure) : पश्चिम बंगाल सरकारने विद्यार्थीसंख्या कमी असलेल्या आणि पुरेशा मूलभूत सुविधा नसलेल्या २५० सरकारी मान्यताप्राप्त खासगी मदरशांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली. मात्र, सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून या मदरशांमध्ये डिसेंबरपर्यंत वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
 
एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बंद करण्याची तयारी असलेल्या २५० मदरशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी किंवा जवळपास नगण्य आहे. अनेक संस्थांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधाही अपुऱ्या असल्याचे आढळून आले आहे. या संस्थांशी संबंधित अहवाल दुर्गापूजेपूर्वी मिळण्याची अपेक्षा असून, त्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. (West Bengal 250 Madrasas Closure)
 
अशी माहिती आहे की, राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच २५२ अनधिकृत मदरसे बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच, कथित अनियमिततांप्रकरणी आणखी सुमारे १०० मदरशांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ही कारवाई करण्यात आली. या सर्वेक्षणात अनेक संस्थांकडे आवश्यक परवानग्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले.
 
सरकारच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सुमारे २,५०० मदरसे असे आहेत, ज्यांची सरकारी स्तरावर नोंदणी झालेली नाही. भविष्यात त्यांच्यावरही टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाऊ शकते. सध्या या संस्थांची स्थिती आणि आवश्यक परवानग्यांची तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (West Bengal 250 Madrasas Closure)

सरकारी विभागांमध्ये १.५१ लाख पदांच्या भरतीला मंजुरी
 
मंत्रिमंडळाने विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे १.५१ लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल पोलिसांमधील सुमारे १२ हजार आणि कोलकाता पोलिसांमधील ४ हजार पदांचा समावेश आहे. रिक्त पदे लवकर भरल्यास सरकारी सेवांवरील परिणाम कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री यांनी भरतीशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यास तसेच अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा निर्धारित योजनांनुसार वापर सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. (West Bengal 250 Madrasas Closure)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर