नवी मुंबई (Vashi Ganeshotsav Tradition) : शहरातील वाढत्या पुनर्विकासाच्या लाटेमुळे अनेकदा जुन्या सोसायट्या आणि तिथले शेजारी दुरावल्याचे चित्र पाहायला मिळते. घरं दूर गेल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी बस्तान हलवावे लागल्यामुळे रोजच्या भेटीगाठी बंद होतात; मात्र वाशी सेक्टर ९ मधील एकता आणि कैलास सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या भौगोलिक अंतरालाही स्नेहाच्या धाग्याने जिंकून दाखवले आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून या भागात सुरू असलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही त्यांनी तितक्याच उत्साहात कायम ठेवत सामाजिक सलोख्याचा एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
एकता आणि कैलास या दोन्ही सोसायट्यांचा पुनर्विकास गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही संस्थांमध्ये मिळून एक हजारहून अधिक कुटुंबे राहत असून, पुनर्विकासाच्या कालावधीमुळे सध्या ही सर्व कुटुंबे भाड्याच्या किंवा अन्य निवासस्थानी विखुरलेली आहेत. पूर्वीसारखे शेजारी म्हणून एकत्र राहणे आणि रोज भेटणे शक्य नसले, तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे सर्वजण आपल्या जुन्या परिसरात आवर्जून एकत्र येतात. (Vashi Ganeshotsav Tradition)
सोसायट्यांच्या लगतच्या जागेतच यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात येथील रहिवासी मोठ्या उत्साहात सामील होत आहेत. वाजतगाजत निघणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये आबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय असतो. दररोजच्या आरतीसाठी सर्वजण आळीपाळीने उपस्थित राहतात आणि उत्सवाच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारीही आनंदाने एकत्र येऊन पार पाडतात. (Vashi Ganeshotsav Tradition)
गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात दररोज गणरायाच्या साक्षीने एक विशेष प्रार्थना केली जात आहे. पुनर्विकास प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, सर्व रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरांचा ताबा विनाविलंब मिळावा आणि सर्वांनी आपल्या नव्या घरात गुण्यागोविंदाने व सुखासमाधानाने राहावे, अशी साद सर्वजण बाप्पाचरणी घाजत आहेत.
नोकरी, धंदा आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई-नवी मुंबईच्या विविध भागांत वास्तव्यास गेलेले हे कुटुंबीय बाप्पाच्या आगमनासाठी आवर्जून वेळ काढून पुन्हा एकदा आपल्या जुन्या मातीत एकत्र येतात. त्यामुळे हा गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव न राहता, विखुरलेल्या मनांना जोडणारा, परस्पर सहकार्य, एकोपा आणि आपलेपणाची भावना जपणारा एक सांस्कृतिक सोहळा ठरला आहे. पुनर्विकासाच्या काळात घरं तात्पुरती दूर गेली असली, तरी बाप्पाने या शेजाऱ्यांना मनातून कधीच दूर जाऊ दिलेले नाही, हेच या रहिवाशांनी सिद्ध केले आहे. (Vashi Ganeshotsav Tradition)