‘एनएसई’ची मुंबई शेअर बाजारात एण्ट्री! टॉप-१० कंपन्यांमध्ये सामावेश!

जगभरातील नोंदणीकृत शेअर बाजारांच्या यादीत सातव्या स्थानी

    24-Sep-2026   
NSE (1)
 
 
मुंबई, दि. २४ (विशेष प्रतिनिधी) (NSE Share Price Today) : राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) ‘आयपीओ’नंतर मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत प्रक्रिया गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. एनएसईचा शेअर बीएसईच्या शेअर बाजारात नोंदणीकृत झाला. इश्यू प्राईजपेक्षा १५ रुपयांनी वाढून तो १८०० रुपयांवर लिस्टींग झाला. इश्यू प्राईज १७८५ रुपयांपेक्षा ०.८४ टक्के वाढ झाली. दरम्यान, नोंदणी झाल्यानंतर लगेचच शेअर १८७६ रुपयांवर कामगिरी करत होता. तसेच मुंबई शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी निर्देशांक मानली जाणारी ‘एनएसई’ ही संस्था आता सुचिबद्ध कंपनी बनली आहे.
 
एनएसई आता ४ लाख ५४ हजार ९६६.८८ कोटींचे भाग भांडवल असणारी कंपनी बनली असून प्रमुख १० कंपन्यांमध्ये एनएसईचा सामावेश झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३४ लाख किरकोळ गुंतवणूकदारांना अलॉट झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले.
 
एनएसईच्या आयपीओ एकूण ५.७१ पट सबस्क्राईब झाला होता. गुंतवणूकदारांनी एकूण ८.८६ कोटी समभागांच्या तुलनेत ५०.२८ कोटी समभागांसाठी बोली लावली होती. यात सर्वात मोठी मागणी ही विदेशी आणि देशांतर्गत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आली होती. त्यांचा कोटा तब्बल १२.६८ पटींनी सबस्क्राईब झाला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ६.५५ पट तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा १.३९ पट इतका सबस्क्राईब झाला. हा आयपीओ १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत खुला झाला. त्यासाठी १७०० ते १७८५ इतका प्राईज बँड निश्चित झाला होता. एकूण २२,५६२ कोटींचा हा संपूर्ण इश्यू ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) होता. अर्थात कंपनीने कुठलेही नवे शेअर जारी केलेले नाहीत.
 
‘एनएसई’ ‘बीएसई’वरच नोंदणीकृत का झाला?

स्वतः एक शेअर ट्रेडींग प्लॅटफॉर्म कंपनी असल्याने नियमानुसार, एनएसईला स्वतःच्याच मंचावर नोंदणी करता येणे शक्य नाही. त्यामुळे एनएसईच्या समभागांचे व्यवहार हे बीएसईच्या मंचावर होणार आहेत.
‘एनएसई’ने भारतातील गुंतवणूकदारांना भांडवली बाजाराबद्दल विश्वास निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले. शतकानुशतके एनएसई हा विश्वास कायम जपेल, असा मला विश्वास आहे जे भारताच्या भविष्यासाठी चांगले असेल ते एनएसईसाठीही चांगले
 असेल. : आशिषकुमार चौहान, सीईओ आणि एमडी, एनएसई





तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर