मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शुष्क आणि पर्जन्यछायेच्या परिसंस्थेत वाघचोरा या भूईअमरीच्या आढळाची नवी नोंद करण्यात आली आहे (New Record of Queen of Khandala). सांगलीतील निसर्गअभ्यासकांनी ही नोंद केली आहे. पश्चिम घाटातील सदाहरित आणि निमसदाहरित अधिवासाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा हातकणंगलेच्या पूर्वेकडील तुलनेने शुष्क परिसरातील आढळ त्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरला आहे. (New Record of Queen of Khandala)
हातकणंगले तालुक्यात झालेली वाघचोरा आॅर्किडची नोंद झूप्रिंट या आशियातील जैवविविधता संशोधनावरील नियतकालिकात नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही नोंद बॉटनी फॉर पिपल्स असोसिएशनचे रोहन पाटील तसेच सांगलीच्या नेचर काँझर्वेशन सोसायटीचे (नॅकॉन्स) वन्यजीव अभ्यासक अमोल जाधव, विशाल कोठावळे आणि प्रज्योत हंचनाळे यांनी केली. सप्टेंबर २०२५ मध्ये हातकणंगले तालुक्यातील कुंथूगिरीजवळच्या डोंगराळ परिसरात वनस्पती ओळख कार्यक्रमादरम्यान ही वनस्पती त्यांच्या निदर्शनास आली. रोहन पाटील हे सांगली आणि कोल्हापूर परिसरातील जंगलांमध्ये नागरिक व विद्यार्थ्यांसाठी वनस्पती ओळख आणि निसर्गअभ्यासाचे कार्यक्रम घेतात. विद्यार्थ्यांना स्थानिक वनस्पतींची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अमोल जाधव, विशाल कोठावळे आणि प्रज्योत हंचनाळे यांना वाघचोरा दिसला. त्यांनी तत्काळ ही वनस्पती पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वनस्पतीची ओळख, उपलब्ध संदर्भ आणि भौगोलिक आढळ यांची पडताळणी करण्यात आली. त्यातून हातकणंगलेच्या शुष्क परिसरातील या आढळाची नोंद संशोधनपत्राच्या स्वरूपात करण्यात आली.
या संशोधनासाठी जळगाव येथील वनस्पतीतज्ज्ञ डॉ. दिलीपकुमार उंदीरवाडे यांनी रोहन पाटील यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अपर्णा वाटवे यांनी प्रकाशन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगलीवाडी यांनी संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिले. नॅकॉन्सचे अध्यक्ष तबरेज खान, घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक गोपाल गायकवाड आणि बीना इनामदार यांचेही या कामात सहकार्य मिळाले. वाघचोरा ही जमिनीवर वाढणारी मोठ्या आकाराची ऑर्किड प्रजाती आहे. स्थानिक पातळीवर तिला वाघचोरा किंवा भूईआमरी म्हणून ओळखले जाते. वनस्पतीच्या फुलातील विशिष्ट आकारामुळे तिच्या स्थानिक नावाची सांगड वाघाच्या चेहऱ्याशी घातली जाते. ही वनस्पती प्रामुख्याने मोकळ्या डोंगरउतारांवर, झुडपांच्या परिसरात आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिची वाढ सुरू होऊन काही महिन्यांनंतर जमिनीवरील भाग वाळून जातो.
पर्जन्यछायेतील आढळ महत्त्वाचा
वाघचोराचा संबंध प्रामुख्याने सदाहरित आणि निमसदाहरित वनांच्या अधिवासाशी जोडला जातो. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम घाट परिसरात अशा अधिवासांमध्ये या वनस्पतीच्या नोंदी आढळतात. त्याच्या तुलनेत हातकणंगले तालुक्याचा पूर्वेकडील भाग हा तुलनेने कोरडा आणि पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. त्यामुळे पश्चिम घाटाच्या तुलनेने अधिक आर्द्र अधिवासापासून दूर, शुष्क परिसरात वाघचोरा आढळल्याने या प्रदेशातील वनस्पतींच्या अधिवासविषयक अनुकूलनाचा आणि स्थानिक जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी ही नोंद महत्त्वाची ठरते. एखाद्या दुर्मीळ किंवा कमी नोंद झालेल्या वनस्पतीचा आढळ हा त्या परिसरातील अधिवासाची गुणवत्ता आणि सूक्ष्म अधिवासांची विविधता समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो.
स्थानिक निसर्गअभ्यासातून संशोधनाकडे
नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वनस्पती ओळख कार्यक्रमातून सुरू झालेली ही नोंद अखेर शास्त्रीय नियतकालिकापर्यंत पोहोचली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निसर्ग निरीक्षण, वनस्पतींची अचूक ओळख, संदर्भ साहित्याचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून जैवविविधतेच्या नव्या नोंदी कशा पुढे येऊ शकतात, याचे हे उदाहरण ठरते. - रोहन पाटील, वनस्पती अभ्यासक