कालसुसंगत असायला हवे

    24-Sep-2026   

Jamui Minor Girl Harassment Case 
 
बिहारच्या जमुईमध्ये अल्पवयीन मुलीसोबत जे घडले, ते अत्यंत संतापजनक असेच. नराधम गुंडांनी तिला अडवले. त्यांनी मुलाला मारहाण केली आणि मुलीचा विनयभंग केला. माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक वर्तन. त्या नराधमांवर कारवाई झालीच. ते गुंड तेजस्वी यादवच्या राजद पक्षाचे कार्यकर्ते होते, असे पुढे दिसून आले. मात्र, काही हिंदूद्वेष्ट्यांनी लगेच जावईशोध लावला की, हे गुंड हिंदुत्ववादी असणार. पण, हिंदूद्वेष्ट्यांचे पोटपाणीच हिंदूंबाबत खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरवण्यावर चालते, हेच खरे. त्यामुळे काय बोलणार?
 
असो. हिंदूंना शिव्या-शाप देण्यासाठी सदैव सोशल मीडियावर पडीक असलेल्या काही निलाजर्‍या लोकांनी (जे जन्माने हिंदू आहेत) या घटनेतील नराधमांबद्दल म्हटले की, हेच ते लोक, जे ‘लव्ह जिहाद’ म्हणत मुसलमांनावर अत्याचार करतात. असे बोलणार्‍या लोकांना येन-केन-प्रकारेण असल्या घटनाचे खापर हिंदूंवर फोडायचे असते. ‘लव्ह जिहाद’विरोधी अभियानावर ताशेरे ओढायचे असतात. यावर वाटते की, अशा लोकांनी स्वतः ‘लव्ह जिहाद’चा बळी व्हावे; स्वतःचा अगदी ‘हलाला’ करून घ्यावा. पण, त्यांनी हिंदूद्वेषाच्या नादात ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर गुन्ह्यांचे समर्थन करू नये. आता काही लोक म्हणतील की, ‘लव्ह जिहाद’चा विषय काढून या घटनेमधील नराधमांचा गुन्हा मागे टाकायचा का? तर मुलीबाळींवर काय, कोणावरही अत्याचार करणार्‍यांना कठोर शासन व्हायलाच हवे. दुसरीकडे याच घटनेतील मुलीसोबतच्या मुलाचे कौतुक होत आहे. कारण, ही घटना घडत असताना तो मुलगा गुंडांचा प्रतिकार करत ठाम उभा राहिला. हे कौतुकास्पदच. पण, निर्जनस्थळी काही अघटित घडले, तर त्याला आपण कसे सामोरे जाऊ, याचा विचार या दोन्ही मुलांनी केलाच नसणार. नव्हे, ९० टक्के लोक हा विचार करतच नाहीत. ‘सातच्या आत घरात’ हा नियम अतिशय कालबाह्य. पण, जिथे कुठे जाणार असू, तिथे जाण्याआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे. शक्य-अशक्यतेचा विचार करायलाच हवा. स्मार्ट ‘जेन-झी’नेच नाही, तर ‘अल्फा-बिटा’ आणि सगळ्यांनीच ही सतर्कता आत्मसात करणे गरजेचे. सरकार- प्रशासन काय करायचे ते करतील, पण आपण स्वतःसाठी सज्ज असायलाच हवे. हे तर कालसुसंगतच आहे ना?

यांचे काय करायचे?
 
राष्ट्रीय गौरव अपमान निवारण (संशोधन) अधिनियम, २०२६’अंतर्गत ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची सहा कडवी संपूर्ण गाणे अनिवार्य आहे. हे गीत गात असताना कुणी जाणीवपूर्वक अडथळा (व्यत्यय) आणत असेल, किंवा रोखत असेल, तर त्या व्यक्तीवर कारवाई होणार. याविरोधात टी. एम. कृष्णा यांनी (थोडुर मादबुसी कृष्णा) याचिका दाखल केली. त्यांचे म्हणणे आहे की, ‘वन्दे मातरम्’ची सहाही कडवी म्हणण्यामुळे अल्ला आणि जिझसला मानणार्‍या लोकांच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचेही हनन होते. याच याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, "एखाद्या राष्ट्रीय गीतात विशिष्ट देवाचा, त्याच्या रूपाचा उल्लेख असण्याने, देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचत नाही. तसेच राष्ट्रगीत कोणते असावे, किती कडवी गावीत, हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही.”
 
असो. त्या याचिकेची सुनावणी करताना कृष्णा यांचे वकील एस. मुरलीधर यांनी ‘वन्दे मातरम्’संदर्भातल्या कायद्यावर प्रश्न उपस्थित केला. यावर केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, "कायदा बनवण्याची प्रक्रिया संसदेद्वारे केली जाते. हीच घटनात्मक पद्धत आहे. नक्षलवाद्यांना हवा तसा कायदा बनवला जाऊ शकत नाही.” या टी. एम. कृष्णा याला ‘आंतरराष्ट्रीय मॅगसेस पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्याला कडवट कम्युनिस्टांनी डोक्यावर घेतले; पण कृष्णाच्या कामाचा मागोवा घेतला, तर जाणवते की पारंपरिक कर्नाटकी संगीत हे शिव-राम-कृष्ण किंवा देव-देवतांवर आधारित आहे. मात्र, या पारंपरिक संगीतामध्ये हिंदू देव-देवतांची नावे वगळून त्या जागी इसामसिहा आणि अल्लाचे नाव टाकू टी. एम. कृष्णा यांनी गीत गायला सुरुवात केली. अर्थात, त्यामुळे काही भोळे-भाबडे हिंदू संगीताच्या चालीमुळे येशू आणि अल्लाकडे वळले नसतील तर नवल. दुसरीकडे "केरळम्मध्ये रा. स्व. संघाच्या हत्या झालेल्या स्वयंसेवकाबद्दल जराही मनात सहानुभूती नाही,” असे कृष्णाने उघड-उघड म्हटले होते. निष्पापांच्या मृत्यूवर असंवेदनशील असणार्‍या आणि ‘वन्दे मातरम्’च्या सहा कडव्यांना विरोध करणार्‍या कृष्णा यांची ही मानसिकता किती विकृत आहे. या असल्या लोकांचे करायचे काय?
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर