विद्यार्थी संघाच्या निवडणुका या केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसतात; तर त्या त्या काळातील तरुणांच्या विचारविश्वाची, त्यांच्या आकांक्षांची आणि समाज-राष्ट्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचीही नोंद असते. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणूक निकालांनीही अशीच एक व्यापक चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आणली आहे. या निकालांकडे केवळ एका परिसरातील राजकीय घडामोड म्हणून नव्हे, तर विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण कार्यपद्धती, शैक्षणिक प्रश्नांवरील भूमिका आणि राष्ट्रीय विचारांशी जोडल्या जाणार्या युवकांच्या सहभागासंदर्भात पाहण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘अभाविप’च्या विजयामागील संदेश आणि त्याचे व्यापक परिणाम समजून घेण्याचा हा प्रयत्न...
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचे नुकतेच जाहीर झालेले निकाल हे केवळ एका विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीचे परिणाम नाहीत; तर ते देशातील तरुणांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या प्राधान्यक्रमांचे आणि विद्यार्थी राजकारणाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचेही प्रतिबिंब आहेत. म्हणूनच दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या या निवडणुकीत विजयात राष्ट्रीयतेच्या विचाराला मिळालेला स्पष्ट पाठिंबाही दिसून येतो. भारताच्या मूलभूत विचारांवरील विश्वासाची ही नोंद असून, विभाजनवादी प्रवृत्तींपेक्षा सृजनशीलतेला विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीचे हे प्रतीक आहे.
गेल्या काही काळापासून तरुणांची विचारसरणी बदलत असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. तथाकथित ‘जनरेशन झेड’च्या नावाखाली अनेक मंचांवर असा दावा केला जात होता की, नवी पिढी राष्ट्रीय विचारांपासून आणि सकारात्मक विद्यार्थी राजकारणापासून दूर जात आहे. विविध आंदोलनांमधून आणि सार्वजनिक चर्चांमधूनही देशातील तरुण एका वेगळ्या वैचारिक दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दिल्ली विद्यापीठाच्या निवडणूक निकालांनी अशा अनेक गैरसमजुतींना आव्हान दिले.
विद्यार्थ्यांनी मतदानातून स्पष्ट केले की, ते केवळ घोषणा आणि प्रचाराच्या प्रभावाखाली निर्णय घेत नाहीत, तर एखाद्या संघटनेचे काम, तिची कार्यपद्धती आणि विद्यार्थीहितासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या निकषांवर ते आपला कौल देतात. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने विद्यार्थी समस्यांचे निराकरण, शैक्षणिक सुधारणा, राष्ट्रनिर्माण आणि सकारात्मक विद्यार्थी नेतृत्व घडविण्यासाठी केलेल्या कार्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
हा विश्वास केवळ एका निवडणूक प्रचाराचा परिणाम नाही. विद्यार्थ्यांना हे चांगलेच ठावूक आहे की, ‘अभाविप’ ही केवळ निवडणुकीच्या काळात परिसरात दिसणारी संघटना नाही. वर्षातील सर्व ३६५ दिवस विद्यार्थीहित आणि समाजजीवनाशी निगडित विविध विषयांवर कार्यरत राहणारी ही विद्यार्थी संघटना आहे. विविध उपक्रम आणि आयामांद्वारे ती विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने कार्य करत असते.
‘अभाविप’चा ‘स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट’ हा उपक्रम जल, जंगल, जमीन, जन आणि पर्यावरण संरक्षणासारख्या विषयांवर कार्य करतो. ‘स्टुडंट्स फॉर सेवा’ समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत सेवा उपक्रम पोहोचवण्याचे काम करतो. कला मंच, कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तर ‘खेलो भारत’ या उपक्रमाद्वारे क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ‘अभाविप’चे कार्य केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नाही. शिक्षणाशी संबंधित मूलभूत प्रश्नांवरही ती सातत्याने भूमिका मांडत आली आहे. अभ्यासक्रमातील सुधारणा, शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक बदल, परीक्षा पद्धतीतील सुधारणा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन अशा विषयांवर ‘अभाविप’ने सातत्याने आवाज उठवला आहे. शिक्षण सुधारणा, परीक्षा सुधारणा, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावा संघटनेचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाठिंबा तिला केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर वर्षभर केलेल्या कामाच्या आधारे मिळत असल्याचे या निकालांतून दिसून येते.
हे निकाल केवळ दिल्ली विद्यापीठापुरते मर्यादित नाहीत. यापूर्वी पंजाब विद्यापीठासह देशातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थ्यांनी ‘अभाविप’ला पाठिंबा दिला आहे. त्यातून देशातील तरुण रचनात्मक कार्य, संघटनात्मक बांधिलकी आणि राष्ट्रहिताशी संबंधित मुद्द्यांना महत्त्व देत असल्याचे चित्र समोर येते. भारतीय युवक आजही आपल्या राष्ट्र, संस्कृती आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना जपून असल्याचा संदेशही या निकालांतून मिळतो. विद्यार्थी राजकारण केवळ विरोधापुरते मर्यादित न राहता, शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, रोजगार आणि राष्ट्रनिर्माण अशा विषयांवर केंद्रित होण्याची गरज आहे. ‘अभाविप’ दीर्घकाळापासून याच दिशेने कार्य करत असल्याचा दावा करते आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचा तिच्यावरील विश्वास सातत्याने वाढत असल्याचे या निकालांतून दिसून येते.
दिल्ली विद्यापीठाचे निकाल असा संदेश देतात की, भारतातील तरुण हा सर्वस्वी जागरूक आहे, विचारशील आहे आणि राष्ट्राप्रतीच्या आपल्या जबाबदार्या समजून घेत आहे. हा विजय केवळ निवडणुकीतील यश नाही; तर विद्यार्थीहित, सकारात्मक कार्यपद्धती आणि राष्ट्रनिर्माणाशी बांधिल असलेल्या विचारांवरील विद्यार्थ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या निकालांतून ‘अभाविप’ असा संदेश अधोरेखित करते की, देशातील तरुण पिढी राष्ट्रीय विचारांसोबत उभी आहे आणि विभाजनकारी, अराजक वा हिंसक प्रवृत्तींऐवजी भारतबोधावर आधारित रचनात्मक मार्गाची निवड करत आहे. संघटनेचा संकल्प असा आहे की, ती प्रत्येक परिसरात पोहोचत राहील, ‘भारतमाता की जय’चा जयघोष करत राहील आणि विभाजनकारी प्रवृत्तींविरोधात भक्कमपणे उभी राहील. देशाची युवा शक्ती कोणत्याही बहकाव्याला बळी न पडता, सृजन आणि राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर पुढे जात राहील आणि हा प्रवास अखंड सुरू राहील.
अनंत सोनी
(लेखक ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे छत्तीसगढ प्रदेशमंत्री आहेत.)