डोंबिवली (Dombivli Permanent Ganesh Idol) : डोंबिवलीतील श्रीखंडे वाडी येथील नामांकित 'तरुण मित्र मंडळ' यंदा आपल्या स्थापनेचे ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करत आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून मंडळाने डोंबिवलीत प्रथमच एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. यंदापासून मंडळाने फायबरची अत्यंत देखणी, कायमस्वरूपी श्री गणेश मूर्ती घेतली असून तिचे विसर्जन केले जाणार नाही. विसर्जनाच्या दिवशी केवळ लहान पूजेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे असा निर्णय घेतला आहे. (Dombivli Permanent Ganesh Idol)
डोंबिवली श्रीखंडे वाडी मधील तरुण मित्र मंडळाची १९७७ मध्ये स्थापना झाली. हे मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षीपासून त्यांनी फायबरची अतिशय सुंदर अशी श्री गणेश मूर्ती ही कायमस्वरूपी विकत घेतली आहे. यावर्षीपासून ते ही गणेश मूर्ती विसर्जन करणार नाही. अशा पध्दतीने कायमस्वरूपी गणेश मूर्ती घेऊन स्थापना करणारे हे डोंबिवलीतील एकमेव मंडळ आहे. फक्त छोटी पूजेची श्री गणेश मूर्ती ते विसर्जन करणार आहेत. सदर ही कायमस्वरूपी गणेश मूर्ती ही मंडळाची स्वतःची अशी मोठी जागा नसल्याने जवळच तेथे असलेल्या शुभकार्य होणाऱ्या एका हॉलमध्ये ठेवणार आहेत. या मंडळाची विसर्जन मिरवणूक दरवर्षी डोंबिवलीच्या प्रमुख रस्त्यावर फिरते. ही मिरवणूक विविध देखावे, चित्ररथ, पथनाट्य, लेझीम, ढोलपथक यासह निघते. ही मिरवणुक देखण्यालायक असल्याने डोंबिवलीतील या मंडळाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीकर खास आवर्जून पाहण्यास येतात. आता हे कायमस्वरूपी घेतलेल्या मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाहीत. या मूर्तीसह नेहमीप्रमाणे विविध भव्य देखाव्यासहीत विसर्जन मिरवणुक मात्र काढणार आहेत आणि शेवटी छोट्या पूजेच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन हे मंडपात ड्रम मध्ये स्वच्छ पाण्यात होणार आहे. (Dombivli Permanent Ganesh Idol)