अनंता तुला ते कसे रे स्तवावे

    24-Sep-2026
 
Anant Chaturdashi 2026
 
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायांच्या विसर्जनाचा दिवस जवळ आला. हा दिवस म्हणजे सर्वांनाच परिचित अनंत चतुर्दशी! ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी गळ घालत प्रत्येक जण जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देतो, तो हा दिवस. हळूहळू या सगळ्यात एक वर्षाचा काळ लोटतो, या काळात माणसाचे आयुष्यही बदलते. अर्थात, बदल हा काळाचा नियम आहेच. मात्र, या काळापलीकडे आहे, तो अनंत! त्याच्या पूजनाचा दिवस, म्हणजेच अनंत चतुर्दशी! अनंताचे व्रत, त्याची उपासना आणि त्याचे महत्त्व या अंगाने चतुर्दशीचा अर्थ समजून घेणारा हा लेख...
 
‘अनंत चतुर्दशी’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर गणेश विसर्जनाची मिरवणूकच उभी राहते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाने भरलेले रस्ते, विसर्जन घाटांवरची गर्दी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या म्हणताना दाटून आलेला कंठ! महाराष्ट्रात या दिवसाची ओळख गणेश विसर्जनाशी इतकी घट्ट जोडली गेली आहे की ‘अनंत चतुर्दशी’ या नावातील ‘अनंत’ नेमका कोण, याचा विचारही सहसा आपल्या मनात येत नाही. वास्तविक, या तिथीचे स्वतंत्र धार्मिक महत्त्व आहे. भाद्रपद शुल चतुर्दशी ही भगवान विष्णूच्या ‘अनंत’ स्वरूपाच्या उपासनेची तिथी असून, या दिवशी केले जाणारे ‘अनंतव्रत’ ही आपली जुनी व्रतपरंपरा आहे. ‘नारद पुराणा’च्या पूर्वभागातील १२३व्या अध्यायात, या व्रताचा विधी विस्ताराने सांगितला आहे.
 
‘अनंत’ या एका शब्दातच या व्रताचे सारे तत्त्वज्ञान सामावलेले आहे. ज्याला अंत नाही तो अनंत! ज्याला काळाची मर्यादा नाही, देशाची सीमा नाही, उत्पत्ती आणि विनाशाच्या फेर्‍यांनी ज्याच्या अस्तित्वाला बाधा येत नाही, ते तत्त्व म्हणजे अनंत. ‘अनंत’ हे शेषाचेही नाव आहे; पण या व्रतातील उपास्य ‘अनंत’ म्हणजे अनंतस्वरूपी भगवान विष्णू. अनंतशेषावर शयन करणार्‍या भगवान विष्णूची प्रतिमा आपण पाहतो. त्या प्रतिमेकडे केवळ देवतेचे चित्र म्हणून न पाहता, त्यातील तत्त्व समजून घेतल्यास्स तिचा अर्थ फार सुंदर होतो. विश्वातील असंख्य रूपे जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि नाहीशी होतात. काळ सर्वांनाच आपल्या पोटात घेतो. पण, या सगळ्या उत्पत्ती-स्थिती-लयाच्या पाठीशी असणारे परम अधिष्ठान मात्र शाश्वत आहे, तेच ‘अनंत!’
 
या दिवशी अनंताची पूजा करून, हातात १४ गाठींचे अनंतसूत्र बांधण्याची परंपरा आहे. ‘नारद पुराणा’त नवीन रेशमी किंवा सुती सूत्र घेऊन, त्याला १४ गाठी बांधण्याचे स्पष्ट विधान आहे. पुरुषाने ते उजव्या हातात आणि स्त्रीने डाव्या हातात धारण करावे, हे व्रत १४ वर्षे करुन, त्यानंतर उद्यापन करावे, असेही सांगितले आहे. १४ गाठींचा संबंध परंपरेने १४ भुवनांशी लावला जातो. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पुराणातील मूळ विधान १४ गाठींचे आहे; १४ लोकांशी त्यांची सांगड हा त्यावर विकसित झालेला पारंपरिक प्रतीकार्थ आहे. हे अनंतसूत्र बांधताना म्हटला जाणारा एक सुंदर मंत्र, या व्रताला अध्यात्माच्या उंचीवर नेतो.

अनन्तसंसारमहासमुद्रे मग्नान् समभ्युद्धर वासुदेव|
अनन्तरूपे विनियोजयस्व ह्यनन्तरूपाय नमो नमस्ते॥
 
अर्थात, हे वासुदेवा! या अनंत संसाररूपी महासागरात बुडालेल्या मला वर काढ आणि मला तुझ्या अनंत स्वरूपाशी जोड. त्या अनंतस्वरूपाला माझा वारंवार नमस्कार. भविष्योत्तर परंपरेतील अनंतव्रतविधीत हा मंत्र, अनंतसूत्र धारण करण्याशी जोडलेला आढळतो.
 
हा मंत्र समजला की, हातातील त्या साध्या धाग्याचा अर्थही बदलतो. ‘अनंतसूत्र’ म्हणजे संकट दूर करणारा एखादा जादूचा धागा नाही. आपण मर्यादित आहोत, पण ज्याच्याशी आपले अस्तित्व जोडलेले आहे ते तत्त्व अनंत आहे, याची मनगटावर बांधलेली आठवण म्हणजेच अनंतसूत्र! माणसाचे आयुष्य किती? त्याची संपत्ती किती दिवसांची? सत्ता, सौंदर्य, शरीर, यश, अपयश-सगळ्यालाच अंत आहे. आपण मात्र या सगळ्या सान्त गोष्टींनाच ‘मी’ समजून बसतो. अनंतव्रत त्या भ्रमातून क्षणभर बाहेर काढून विचारते, या सगळ्याच्या पाठीशी असलेल्या अनंताशी तुझे नाते काय?
 
या व्रताशी जोडलेली सुशीला आणि कौंडिण्य ऋषींची कथा तर अधिकच अर्थपूर्ण. सुशीलेचा विवाह कौंडिण्यांशी होतो. पतीबरोबर जात असताना, नदीकाठी काही स्त्रिया अनंतव्रत करताना तिला दिसतात. ती त्यांच्याकडून व्रत समजून घेते, अनंताची पूजा करते आणि अनंतसूत्र धारण करते. पुढे त्यांच्या संसारात समृद्धी येते. एके दिवशी कौंडिण्याच्या नजरेस तिच्या हातातील सूत्र पडते. त्याला त्या सूत्रामागील श्रद्धा मान्य होत नाही. क्रोधाच्या भरात तो त्याचा अवमान करतो. त्यानंतर त्यांच्या वैभवाला उतरती कळा लागते. अखेरीस कौंडिण्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो ‘अनंत’च्या शोधासाठी निघतो. अनंताच्या कृपेने त्याला पुन्हा कल्याणाचा मार्ग सापडतो, अशी व्रतकथा सांगते. अनंतव्रताच्या पुराणपरंपरेत, कौंडिण्याच्या या आख्यानालाही महत्त्वाचे स्थान आहे.
 
या कथेकडे केवळ धागा तोडल्याने संपत्ती गेली आणि पुन्हा व्रत केल्याने संपत्ती आली, अशा व्यवहाराच्या हिशोबाने पाहिले, तर तिच्यातील अध्यात्म हरवते. मला या कथेत आणखी अधिकचे काही दिसते. सुशीलेच्या हातातील अनंतसूत्र म्हणजेच, श्रद्धेने स्वीकारलेले परम अधिष्ठान आणि ते तोडणारा कौंडिण्य म्हणजे, स्वतःच्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या मर्यादा विसरलेला मानवी अहंकार. जोपर्यंत माणूस म्हणतो ‘मीच सर्व काही’, तोपर्यंत त्याचा प्रवास मर्यादित ‘मी’भोवतीच फिरत राहतो. ज्याक्षणी तो त्या मर्यादेच्या पलीकडे काहीतरी अनंत असल्याचे स्वीकारतो, त्याच क्षणी त्याचा खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. कौंडिण्याचा ‘अनंताचा शोध’ म्हणूनच, बाहेरच्या देवाचा शोध कमी आणि स्वतःच्या अहंकाराच्या पलीकडच्या सत्याचा शोध अधिक वाटतो.
 
‘नारद पुराणा’तील अनंतव्रत केवळ धागा बांधण्यापुरतेही मर्यादित नाही. पूजा, कलशस्थापना, अनंतप्रतिमा, नैवेद्य, होम, १४ वर्षांचे व्रत आणि त्यानंतर उद्यापन अशी त्याची सविस्तर विधिपरंपरा आहे. त्याच्या फलश्रुतीत लौकिक कल्याणाबरोबरच, शेवटी अनंताच्या कृपेने परमगतीचाही विचार येतो. म्हणून, अनंतव्रताकडे केवळ धन, सुख किंवा संकटमोचनासाठी केले जाणारे व्रत म्हणून पाहणेही अपुरेच ठरेल. भारतीय व्रतपरंपरेचे वैशिष्ट्यच हे आहे की, ती लौकिक जीवन नाकारत नाही. पण, लौकिकाच्या पलीकडे असलेल्या पारमार्थिक सत्याची आठवण मात्र सतत करून देते.
 
ज्या दिवशी आपण ‘अनंत’ची उपासना करतो, त्याच दिवशी महाराष्ट्रात गणरायाचे विसर्जन होते. या दोन परंपरांचा ऐतिहासिक विकास स्वतंत्र असला, तरी त्यांना अध्यात्माच्या पातळीवर एकत्र पाहिल्यास एक सुंदर अर्थ निर्माण होतो! दहा दिवस आपण मातीच्या गणेशमूर्तीमध्ये देवत्व पाहतो, तिची पूजा करतो, तिला नैवेद्य दाखवतो, तिच्याशी बोलतो, तिच्यासमोर आपले सुख-दुःख मांडतो. आणि अनंत चतुर्दशीला त्याच मूर्तीला पाण्यात सोडून देतो. हळूहळू तिचा आकार विरघळतो. ज्याला आपण दहा दिवस ‘बाप्पा’ म्हणून आलिंगन दिले, ते दृश्य रूप नाहीसे होते. पण ‘देव’ नाहीसा होतो का? तर नाही! रूपाचे विसर्जन होते; तत्त्वाचे नाही. आणि नेमया त्याच दिवशी अनंतव्रत आपल्याला सांगत असते, रूपाला आरंभ आहे आणि अंत आहे; पण त्या प्रत्येक रूपाच्या पाठीशी असलेल्या परम् तत्त्वाला अंत नाही. गणेशमूर्तीचे विसर्जन आणि अनंत नारायणाची उपासना या दोन परंपरा वेगळ्या असल्या, तरी एका साधकाच्या मनात त्या एका विलक्षण आध्यात्मिक सत्यापाशीच येऊन भेटू शकतात, सान्त रूपातून अनंत तत्त्वाकडे जाणे!
 
म्हणूनच यंदा अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहताना, क्षणभर या ‘अनंता’चीही आठवण ठेवूया. ढोल-ताशांचा आवाज थांबल्यावर, गुलाल खाली बसल्यानंतर आणि विसर्जनाच्या पाण्यात गणरायाचे दृश्य रूप विरघळल्यानंतरही जे उरते, त्याचा विचार करूया. आपण गणरायाला निरोप देताना म्हणतो, ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ पण अनंताला तसे म्हणावेच लागत नाही. कारण, अनंत कुठे जातच नाही. जाणारे ते रूप असते, बदलणारा तो आकार असतो, संपणाराही काळ असतो. त्या सगळ्यांच्या पाठीशी जे कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल, त्याचेच नाव ‘अनंत!’
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज




संबंधित मजकूर