मुंबई (Shitalnath Temple Srinagar Reopens) : श्रीनगरमधील ऐतिहासिक शीतलनाथ मंदिरात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा घंटानाद दुमदुमला. १९९०च्या दशकापासून ओस पडलेल्या या मंदिरात देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या काश्मीरी पंडितांनी उत्साहपूर्ण वातावरणात हवन आणि पूजा केली. काश्मीरमध्ये शांतता आणि बंधुभाव कायम राहावा, यासाठी यावेळी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. श्रीनगरमधील ऐतिहासिक शीतलनाथ मंदिराचे दरवाजे तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा पूर्णपणे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
अशी माहिती आहे की, १९९०च्या दशकात काश्मीरी पंडितांच्या पलायनानंतर दहशतवादाच्या काळात ओस पडलेल्या आणि कालांतराने भग्नावस्थेत गेलेल्या ऐतिहासिक मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. ‘श्रीनगर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत मंदिराची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, आता ते भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. (Shitalnath Temple Srinagar Reopens)
काश्मीरी पंडित समाजासाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान असलेले हे मंदिर काश्मीरमधील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते. उग्रवादाच्या काळात मंदिराची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. अनेक वर्षांनंतर येथे परतलेल्या काश्मीरी पंडितांनी पूजा आणि हवन केले. स्थानिक मुस्लिम समाजासोबत मिळून हा क्षण साजरा करता येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
Srinagar, Jammu & Kashmir: State Chief Secretary Atal Dulloo inaugurated the newly renovated Shital Nath Temple at Kralkhud.
State Chief Secretary Atal Dulloo says, "Let me tell you that today, this Shitalnath Ji temple here is very ancient and historical. It is not just a… pic.twitter.com/PlcyECtUch
मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे काश्मीरी पंडितांमध्ये आनंद
मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल काश्मीरी पंडितांनी आनंद व्यक्त केला. पूर्वी मंदिराची अवस्था पूर्णपणे भग्न झाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. आज पुन्हा येथे हवन आणि पूजा करताना १९९०च्या दशकापूर्वीचे दिवस परतल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. परिसरात शांतता आणि बंधुभावाचे वातावरण असून, स्थानिक मुस्लिम समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. १९९०च्या दशकात हा परिसर सोडून गेलेल्या काश्मीरी पंडितांच्या मते, हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. येथे भगवान भैरवाच्या आठ रूपांपैकी एक रूप प्रतिष्ठापित असल्याची श्रद्धा आहे. लाखो काश्मीरी पंडितांसाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिराचे नवे रूप पाहून आनंद होत असून, काश्मीरमधील जुने दिवस पुन्हा परतल्याची अनुभूती होत असल्याचे भाविकांनी सांगितले. (Shitalnath Temple Srinagar Reopens)
कश्यप ऋषींच्या काळाशी जोडला जातो मंदिराचा इतिहास
शीतलनाथ मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून, तो कश्यप ऋषींच्या काळाशी जोडला जातो. पूर्वी हे मंदिर पाण्याने वेढलेले होते, असे सांगितले जाते. नंतर येथील पाणी हटवण्यात आले आणि मंदिराजवळ एक शाळा सुरू करण्यात आली. ही शाळा ‘हिंदू स्कूल’ म्हणून ओळखली जात होती. १९९०च्या दशकापर्यंत या शाळेत हिंदू आणि मुस्लिम समाजातील मुले एकत्र शिक्षण घेत होती. या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी पुढे जगभरातील विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचले. मात्र, १९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादाचा काळ सुरू झाल्यानंतर ही शाळा बंद करावी लागली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केल्याचेही सांगितले जाते. मंदिर परिसरात पूर्वी दोन शाळा होत्या—एक प्राथमिक आणि दुसरी उच्च माध्यमिक. या दोन्ही शाळांच्या इमारती आजही परिसरात पाहायला मिळतात. (Shitalnath Temple Srinagar Reopens)
२०२१ मध्येही झाला होता जीर्णोद्धार
शीतलनाथ मंदिराचा यापूर्वी २०२१ मध्येही जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने काश्मीरी पंडित येथे हवन आणि पूजा करण्यासाठी आले होते. मात्र, मंदिराची इमारत अद्याप जर्जर अवस्थेत असल्याने काही काळानंतर ते पुन्हा बंद करण्यात आले. आता तब्बल ३६ वर्षांनंतर मोठ्या संख्येने काश्मीरी पंडित पुन्हा येथे एकत्र आले असून, ऐतिहासिक मंदिरात पूजा-अर्चना आणि धार्मिक विधींना पुन्हा सुरुवात झाली आहे. काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दहशतवादाच्या काळात नुकसान झालेल्या किंवा उद्ध्वस्त झालेल्या काश्मीरमधील ऐतिहासिक मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. (Shitalnath Temple Srinagar Reopens)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक