मुंबई (Oshiwara Crematorium Illegal Parking) : अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या अंत्ययात्रेला अवैध पार्किंगचा फटका बसल्याची गंभीर घटना नुकतीच ओशिवरा परिसरात घडली होती. मात्र, तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे ओशिवरा हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अखेर अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुक्त करण्यात आला आहे. या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले असून, या ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर पार्किंग होऊ नये यासाठी कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी कै. नेहा राजेंद्र लाड यांच्या अंत्ययात्रेदरम्यान ओशिवरा हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभे केलेले ट्रक, टेम्पो आणि हातगाड्यांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती इतकी बिकट होती की, मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकून पडली. दुःखाच्या प्रसंगात कुटुंबाला नाहक मनस्ताप आणि त्रासाला सामोरे जावे लागले. (Oshiwara Crematorium Illegal Parking)
या गंभीर प्रकाराची दखल घेत मुंबई रहिवाशी सेवा संघचे सचिव दिनेश हेगडे यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्याकडे तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली. या तक्रारीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत पोलीस व पालिकेच्या वाहतूक विभागाने त्वरित पावले उचलली आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण रस्त्यावरील अवैधरित्या पार्क केलेले ट्रक, टेम्पो व अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला. प्रशासनाने दाखवलेल्या या त्वरित आणि संवेदनशील भूमिकेबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. (Oshiwara Crematorium Illegal Parking)
स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि संपूर्ण परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित गस्त असावी. स्मशानभूमीच्या मार्गावर गाड्या उभ्या करणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. ओशिवरा परिसरात बेकायदेशीरपणे पार्क होणाऱ्या ट्रक आणि टेम्पोंवर सातत्याने कारवाई करून हा मार्ग कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवावा. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता या मार्गावर कायमस्वरूपी शिस्त राखली जाईल अशी अपेक्षा आहे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबाला आपल्या प्रियजनांच्या अंतिम प्रवासात अशा त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या मुख्य द्वाराजवळ धर्मांध मुस्लिमांकडून पत्रे लावले जातात, जेणेकरून प्रवेशद्वार उघडले जाणार नाही. अशी आडकाठी करणाऱ्यांवरही वेळीच कारवाई करण्यात यावी. - दिनेश हेगडे, सचिव, मुंबई रहिवाशी सेवा संघ (Oshiwara Crematorium Illegal Parking)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक