संघर्षातून फुलली हिरवी वाट...

    24-Sep-2026   
 
Nitin Kolte Tree Conservation
 
झाडे लावून ती जगवण्याची जिद्द, तोडलेल्या झाडांच्या वेदनेतून नव्याने उभे राहण्याची चिकाटी आणि पुढील पिढीला सावली देण्याच्या तळमळीतून वृक्ष लागवड आणि संवर्धन करणार्‍या नितीन कोलते यांच्याविषयी...
 
पुरंदर तालुक्यातील पिसावरे हे नितीन कोलते यांचे मूळ गाव. साधारण १९७२च्या सुमारास, पुरंदर परिसरात दुष्काळ पडला. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वडिलांनी, कुटुंबासह लोणी काळभोर गाठले. फळे विकून त्यांनी संसाराचा गाडा सांभाळला. नितीन यांचे बालपण याच संघर्षात गेले. वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी, लोणावळ्याच्या वसतिगृहात ठेवले. तेथे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर, ते लोणी काळभोर येथे आले. ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’त शिक्षण पूर्ण केले. बारावी झाल्यावर त्यांनी, नोकरीच्या शोधात पाऊल टाकले. संघर्ष नवीन नसल्याने, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती त्यांच्या अंगी बाणलीच होती.
 
२००६ मध्ये नितीन यांना ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्याचा आनंद असला; तरी मिळणार्‍या उत्पन्नात कुटुंबाच्या गरजा कशा भागतील हा प्रश्नही होता. त्यामुळे त्यांनी नोकरीसोबतच, फिल्टर पाण्याचा व्यवसाय सुरू केला. दुहेरी जबाबदारीमुळे, त्यांचा दिवस पहाटेपासूनच सुरू होई. सतत काम करण्याच्या सवयीमुळे, नितीन नेहमीच उत्साही राहिले. मात्र, त्यांच्या आयुष्यातील वेगळा प्रवास सुरु व्हायचा होता.
 
नोकरीनिमित्त रोज लोणी काळभोर ते हडपसर असा प्रवास करताना नितीन यांना, पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते रवी दर्शन, हडपसर भागातील रस्त्याच्या दुभाजकावर कचरा आणि अनधिकृत जाहिराती दिसत. शहराच्या प्रवेशद्वारावरील बकालपणा पाहून, त्यांना खंत वाटे. शहरासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांनी केला. यातूनच एका संकल्पाचा जन्म झाला! या दुभाजकावर झाडे लावून जगवण्याचे त्यांनी ठरवले!
 
दि. ११ डिसेंबर २०१७ रोजी नितीन यांनी, पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात रीतसर अर्ज केला. रस्त्याच्या दुभाजकावर झाडे लावून, निगा राखण्याची परवानगी त्यांनी मागितली. यामागे असलेली सामाजिक बांधिलकीही त्यांनी स्पष्ट केली. अखेर चौकशी झाल्यावर, दि. २७ डिसेंबर २०१७ रोजी त्यांना पाच किमीच्या पट्ट्यात झाडे लावण्याची परवानगी मिळाली. दि. १४ जानेवारी २०१८ रोजी, पहिले झाड दुभाजकावर लावले गेले. ते पहिले झाड म्हणजे, नितीन यांच्या समाजऋण फेडण्याच्या प्रवासाची सुरुवात होती!
 
झाडे लावणे सोपे होते; मात्र त्यांना जगवण्याचे आव्हान मोठे होते. त्यातही अवैध होर्डिंगधारक आणि जाहिरातदारांकडून, त्यांना वारंवार त्रास सहन करावा लागलाच. पण, नितीन डगमगले नाहीत. एक दिवस शेवाळवाडी जवळची त्यांनी लावलेली जवळपास ५० झाडे, भल्या पहाटे तोडली गेली. याने नितीन व्यथित झाले. पण, त्यांनी माघार घेतली नाही. उलट, तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात आणखी झाडे लावण्याचा निर्धारच त्यांनी केला. टप्प्याटप्प्याने दि. २० डिसेंबर २०२० पर्यंत त्यांनी पुन्हा लागवड केली. तोडलेल्या ५० झाडांच्या बदल्यात, त्यांनी मित्रांच्या मदतीने ५०० झाडे लावली.
 
आज पुण्यातून सोलापूर रोडने प्रवेश करताना, रस्त्यालगत हिरवीगार झाडे दिसतात. एखाद्याच्या चेहर्‍यावर या हिरवाईकडे पाहून उमटणारे स्मित, नितीन यांच्या कामाचे खरे समाधान आहे. या झाडांमुळे परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली असून, तसेच वाहनांच्या हेडलाईटचा त्रासही कमी झाला आहे. नितीन यांचे झाडांबरोबरचे हे नाते, केवळ महामार्गापुरतेच मर्यादित नाही. २०२१ मध्ये नितीन यांनी, ‘कदंब फाऊंडेशन’ची स्थापना केली. कदंबाचे झाड हे त्यांच्या या कार्याचे प्रतीक. या माध्यमातून, पोलिसांना कदंबाची रोपे देण्यास सुरुवात झाली. भेटवस्तू म्हणून कदंब रोप देण्याची पद्धतही त्यांनी सुरू केली. प्रत्येकाच्या दारात किमान एक तरी कदंब असावा, अशी त्यांची इच्छा आहे.
 
नितीन यांच्या कार्याला कुटुंबाचा मोठा पाठिंबा आहे. नोकरी, व्यवसाय आणि घरच्या जबाबदार्‍या सांभाळून, झाडांची निगा राखणे सहजशय नव्हते. मात्र, त्यांच्या वृक्षप्रेमाची जाणीव कुटुंबाला असल्याने, या कार्याला घरातूनही साथ मिळाली. दुष्काळामुळे गाव सोडावे लागलेला मुलगा, परिस्थितीशी दोन हात करत शिक्षण घेणारा विद्यार्थी, नोकरीसोबत व्यवसाय करणारा कुटुंबवत्सल माणूस आणि शहराच्या रस्त्यावर स्वतःच्या खर्चाने झाडे लावणारा वृक्षप्रेमी, नितीन कोलते यांच्या जीवनप्रवासात संघर्ष आणि संवेदनशीलतेचा सुरेख संगम दिसतो. त्यांना २०२४ मध्ये ‘रमा-माधव रानडे स्मृती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
 
आज त्या असंख्य झाडांच्या सावलीतून त्यांचा संदेश मात्र स्पष्ट ऐकू येतो. आपल्याला समाजासाठी खूप मोठे काहीतरी करावेच लागते असे नाही; आपल्या वाट्याला आलेल्या जागेला थोडे अधिक सुंदर केले, तरी तेही समाजकार्यच! नितीन कोलते यांची ही ‘हिरवी वाट’ ही प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या, एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची आणि ‘मी’ पलीकडे जाऊन ‘आपण’साठी जीवन जगण्याची कथा आहे. नितीन कोलते यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५०५३४५००)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर