स्थानिक वृक्ष असलेल्या काजू बागा जैवविविधतेसाठी अधिक उपयुक्त - संशोधन

    24-Sep-2026
maharashtra Western Ghats


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी जंगलांचे काजूच्या एकपीक लागवडीमध्ये (मोनोकल्चर) रूपांतर झाल्याने फुलांची विविधता आणि त्यावर अवलंबून असलेल्या मधुपान करणाऱ्या पक्ष्यांच्या समुदायात बदल होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे (maharashtra Western Ghats). मात्र, काजूच्या झाडांसोबत स्थानिक वृक्ष कायम ठेवलेल्या काजू-बागांमध्ये (अ‍ॅग्रोफॉरेस्ट) मधुपान करणाऱ्या पक्ष्यांची संख्या आणि विविधता अधिक आढळली (maharashtra Western Ghats). त्यामुळे काजू लागवडीमध्ये स्थानिक वृक्षांचे संवर्धन केल्यास पक्ष्यांसाठी अधिक अनुकूल अधिवास निर्माण होऊ शकतो, असे संशोधकांनी सुचविले आहे. (maharashtra Western Ghats)
 
 
'बायोट्रॅापिका' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये उत्तर पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्र, स्थानिक वृक्ष टिकवून ठेवलेल्या काजू अ‍ॅग्रोफॉरेस्ट आणि काजूच्या एकपीक लागवडींची तुलना करण्यात आली. नंदिता मधु, विशाल सडेकर, राजाह जयपाल आणि रोहित नानिवडेकर यांनी हा अभ्यास केला. जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात १८ फुलझाडांच्या प्रजातींच्या फुलांची उपलब्धता नोंदविण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये फुलांची संख्या सर्वाधिक होती. या काळात काजूच्या एकपीक लागवडीत फुलांची एकूण संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर अ‍ॅग्रोफॉरेस्ट आणि नैसर्गिक जंगलांचा क्रम होता. मात्र, एकपीक काजू लागवडीत फुलांची उपलब्धता कालांतराने सर्वाधिक वेगाने कमी झाली. अ‍ॅग्रोफॉरेस्टमध्येही ही घट जंगलाच्या तुलनेत अधिक होती.
 
या अभ्यासात मधुपान करणाऱ्या पक्ष्यांच्या ४१११ नोंदी करण्यात आल्या. फुलांना भेट देणाऱ्या ३१ पक्षीप्रजातींपैकी २८ प्रजाती पॉइंट-काउंट सर्वेक्षणात नोंदल्या गेल्या. मधुपान करणाऱ्या पक्ष्यांची घनता अ‍ॅग्रोफॉरेस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे १३.६ फ्लॉक्स प्रति हेक्टर होती. त्याच्या तुलनेत जंगलात ८.२४ आणि काजूच्या एकपीक लागवडीत ८.३ फ्लॉक्स प्रति हेक्टर घनता नोंदली गेली. पक्ष्यांच्या विविधतेच्या दृष्टीनेही अ‍ॅग्रोफॉरेस्टमध्ये सर्वाधिक प्रजाती आढळल्या. या भागात जंगलाशी संबंधित तसेच मानवी हस्तक्षेपाला अनुकूल अशा दोन्ही प्रकारच्या पक्ष्यांना स्थान मिळत असल्याचे संशोधकांना आढळले. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की हा अभ्यास काजूच्या फुलोऱ्याच्या काळात करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरातील फुलांची उपलब्धता, काजूचा फुलोरा संपल्यानंतर पक्ष्यांचा आहार आणि त्यांच्या हालचाली यांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक आहे. मधुपान करणारे पक्षी केवळ मधावर अवलंबून नसून कीटक आणि फळांचाही आहारात समावेश करतात.
 
स्थानिक वृक्षांचे महत्त्व अधोरेखित
अभ्यासाचे एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे काजूच्या बागांमध्ये स्थानिक वृक्ष शिल्लक राहिल्यास त्या भागात फुलांची उपलब्धता आणि पक्ष्यांसाठी खाद्यस्रोत वाढण्यास मदत होऊ शकते. अ‍ॅग्रोफॉरेस्टमध्ये जंगलाशी संबंधित पक्ष्यांबरोबरच मोकळ्या किंवा बदललेल्या अधिवासातील पक्ष्यांनाही स्थान मिळाले. संशोधकांच्या मते, काजूच्या लागवडीच्या कडेला तसेच लागवडीच्या आतील भागात पक्ष्यांकडून परागीभवन होणाऱ्या स्थानिक वृक्षांची लागवड केल्यास मधुपान करणाऱ्या पक्ष्यांसाठी अधिवास अधिक अनुकूल होऊ शकतो. अशा उपायांमुळे जैवविविधतेला फायदा होण्याबरोबरच काजूच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन सेवेलाही संभाव्य फायदा होऊ शकतो. मात्र, काजूच्या उत्पादनावर याचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो, हे निश्चित करण्यासाठी पुढील अभ्यासांची आवश्यकता संशोधकांनी नमूद केली आहे.
या निष्कर्षांमुळे उत्तर पश्चिम घाटातील काजू लागवड आणि वनसंवर्धन यांचा संबंध नव्याने अधोरेखित झाला असून, स्थानिक वृक्ष टिकवून ठेवणाऱ्या काजू अ‍ॅग्रोफॉरेस्टला जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व दिले जाण्याची गरज या अभ्यासातून पुढे येते. – रोहित नानिवडेकर, संशोधक




संबंधित मजकूर