मुंबई (Dr. Mohan Bhagwat Kanchi Acharya Visit) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी तमिळनाडूतील ओरिक्कई येथे पूज्य कांची आचार्यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा वैदिक विद्वानांच्या मंत्रोच्चारात पारंपरिक शिरोभूषण परिधान करून सन्मान करण्यात आला. तसेच श्री कामाक्षी अंबाल देवस्थानमचा प्रसादही त्यांना प्रदान करण्यात आला. सरसंघचालकांनी यांनी श्री कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामीगल यांनी श्री चंद्रमौलीश्वर स्वामींसाठी केलेल्या अभिषेकाचे दर्शन घेतले. त्यानंतर समाज, राष्ट्र आणि विश्वकल्याणासाठी वैदिक विद्वानांनी केलेल्या वेदपठण, जप आणि विशेष प्रार्थनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. यावेळी जगद्गुरू आदि शंकराचार्यांच्या दिव्य पादुकांची विशेष पूजा करण्यात आली. तसेच ‘तोटकाष्टकम्’च्या पठणाने धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले.
याप्रसंगी कुटुंबव्यवस्था आणि धर्ममूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत पारंपरिक ‘दाम्पत्य पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वैवाहिक जीवनाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याच्या हस्ते ६० वृद्ध दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. सरसंघचालकांनी ‘संग्रहणीयेष्टी’ या श्रौत विधीच्या पूर्णाहुतीचेही साक्षीदार होत जगभरातील लोकांच्या शांतता, समृद्धी आणि सुखासाठी करण्यात आलेल्या प्रार्थनांमध्ये सहभाग घेतला. (Dr. Mohan Bhagwat Kanchi Acharya Visit)
तसेच त्यांनी श्री कांची मठाच्या विद्या, वेद आणि वैद्य या क्षेत्रांतील विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये शाळा, वेदपाठशाळा, पारंपरिक हस्तकला व शिल्पकला प्रशिक्षण केंद्रे, मुलींसाठी सांस्कृतिक शिक्षण देणाऱ्या संस्था आदींचा समावेश होता. पूज्य शंकराचार्य स्वामीजींच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आलेल्या ‘चॅरिटी मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरण समारंभालाही त्यांनी उपस्थिती लावली.
यानंतर सरसंघचालकांनी ओरिक्कई येथील शंभर वर्षांहून अधिक जुने ते ऐतिहासिक घरही भेट दिली, जिथे १९५५ मध्ये संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. श्रीगुरुजी यांनी पूज्य कांची महास्वामींचे दर्शन घेतले होते. या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ संबंधित कुटुंबीयांनी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. याच घरात १९८८ मध्ये कांची आचार्य त्रिवेणी यांनी चातुर्मास्यही केले होते. (Dr. Mohan Bhagwat Kanchi Acharya Visit)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक