शिल्पकलेचा ‘युवराज’

    23-Sep-2026
 
 Yuvraj Mestri Stone Sculptor
 
भारतीय शिल्पकलेची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या, कोकणच्या लाल मातीतील तरुण शिल्पकार युवराज मेस्त्रीविषयी...
 
कोकणात दगड सर्वत्र दिसतो; डोंगरात, ओढ्यांच्या काठावर, शेताच्या बांधावर, घरांच्या अंगणात! पावसाळ्यात त्यावर शेवाळ चढते आणि उन्हाळ्यात तो पुन्हा कोरडा पडतो. दगडाकडे बहुतेक जण दगड म्हणूनच पाहतात. पण, शिल्पकाराची नजर तिथेच थांबत नाही. त्याला त्या निश्चल दगडात एखादे रूप दिसते, एखादी मुद्रा जाणवते, एखाद्या देवतेचा चेहरा जणू आधीच लपलेला दिसतो. मग छिन्नी हातात येते आणि आत दडलेले रूप उलगडत जाते. भारतीय शिल्पपरंपरेचा इतिहास फार जुना आहे. अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून गावच्या देवळापर्यंत, ही कला भारतीयांनी जपली. आज हीच परंपरा कोकणच्या मातीतला एक तरुण पुढे नेत आहे. कुडाळचा युवराज भालचंद्र मेस्त्री म्हणजे, भारताच्या याच प्राचीन शिल्पकलेच्या परंपरेचा ध्वजवाहकच!
 
युवराजचा जन्म २००३ मध्ये महाबळेश्वरला झाला. जन्म तिथला असला, तरी बालपण मात्र कुडाळच्या लाल मातीतच गेले. घरात वडिलांचा परंपरागत फर्निचरचा व्यवसाय आणि आई कर्तव्यदक्ष गृहिणी. घरात लाकूड होते, त्यावर काम करणारे हात होते आणि कलेचा वारसाही होता. त्यामुळे कोरीवकाम, लाकडाला आकार देणे, मूर्ती घडवणे याकडे युवराजचे लक्ष लहानपणापासूनच वळले. शाळेच्या सुटीत जेव्हा तो आतेच्या घरी जाई, तेव्हा तिच्या पतींबरोबरही कोरीवकामाचे धडे गिरवी. शिकवले तेवढ्यावरच न थांबता, हाताला ते जमते का, हेदेखील तो करून पाहात असे. हळूहळू हाताला सराव मिळाला आणि डोळ्याला आकाराची ओळख होत गेली.
 
कुडाळमध्येच बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्या आवडीलाच करिअरचे रूप द्यायचा निर्णय त्याने घेतला. ‘फाईन आर्ट्स’मध्ये पदवी घेण्याची तयारीही केली आणि प्रवेश परीक्षेचा अर्जही भरला. मात्र, काही कारणामुळे युवराजला त्या परीक्षेलाच वेळेत पोहोचता आले नाही. परीक्षा हातची गेली आणि पुढची संधी मिळण्यासाठी सहा महिने थांबावे लागणार होते.
 
याच काळात विश्वकर्मा ज्ञातीच्या एका मेळाव्यात भावकीतील एका व्यक्तीने कर्नाटकातील उडपी येथील ‘सी. ई. कामथ इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिसन्स’ संस्थेची माहिती त्याला दिली. शिल्पकलेचे शिक्षण देणारी संस्था, हाताशी असलेला वेळ आणि कलेची आधीपासून असलेली आवड या तिन्ही गोष्टी जुळून आल्या. युवराजने संस्थेशी संपर्क साधला, मुलाखत झाली आणि शिल्पकलेच्या अभ्यासक्रमासाठी त्याची निवडही झाली.
 
१८ महिन्यांचा हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी केवळ कोर्स नव्हता, आतापर्यंत आवडीपोटी केलेल्या कामाला तिथे शिस्त मिळाली. दगड कसा धरायचा, कुठे घाव द्यायचा, किती द्यायचा आणि कुठे थांबायचे, यालाही एक व्याकरण असते, हे त्याला शिकायला मिळाले. मूर्तीमागचे प्रमाण, भाव, मुद्रा आणि रचना समजू लागली. घरातून कलेचा वारसा मिळाला होता; संस्थेने त्याला कसबेची जोड दिली.
 
अभ्यासक्रम पूर्ण करून युवराज कुडाळला परतला आणि आपल्या गावातच काम उभे करण्याचे ठरवले. त्याने स्वतःचा पाषाणी मूर्तींचा कारखाना सुरू केला. गेली साडेचार वर्षे हा कारखाना सुरू असून, आज वर्षाला जवळपास २५ पेक्षा अधिक पाषाणी मूर्ती तो तयार करतो. मूर्तींसाठी मुख्यत्वे कर्नाटकातील कृष्णशिळेचा वापर केला जातो. कृष्ण, देवी, विष्णू, गणपती अशा देवतांचे विग्रह त्याने आजवर घडवले आहेत. सध्या अंबाबाईची प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू असून, टेंबेस्वामींची हुबेहूब प्रतिकृतीही त्याने घडवली.
 
मूर्ती घडवताना आधी तिचे चित्र काढले जाते, त्यानंतरच प्रत्यक्ष दगडावर काम सुरू होते. एवढ्या सगळ्या सोपस्कारातून मूर्ती पूर्ण होईपर्यंत साधारण एक ते दीड महिना लागतो. ‘महाराष्ट्रातील मूर्तींवर दागिने तुलनेने कमी असल्याने, कर्नाटकातील मूर्तींच्या तुलनेत वेळ कमी लागतो,’ असे युवराज सांगतो. मात्र त्याच्या मते, वेळेपेक्षा महत्त्वाचा असतो, तो मूर्तिकाराचा विश्वास. दगडातून काय बाहेर काढायचे, हे मनात स्पष्ट असेल आणि हाताला त्याची खात्री असेल, तर दगडाला आकार देण्यास फार वेळ लागत नाही.
 
युवराजच्या या प्रवासाला घरच्यांचा भक्कम पाठिंबा आहे. वडील, मोठा भाऊ वेळोवेळी त्याला मार्गदर्शनही करतात. पाषाणी मूर्तींबरोबरच युवराज लाकडी मूर्तीही घडवतो. त्यांचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे भविष्यात या कामाचा विस्तार करण्याचा त्याचा मानस आहे. प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज हे त्याचे आदर्श असून, देशाच्या उज्ज्वल परंपरेसाठी स्वतःला वाहून घेण्याची त्याची इच्छा आहे.
 
कला ही कुणाच्या घरात ठेवलेली वस्तू नाही. ती वापरली तरच टिकते, पुढे जाते. एक पिढी दुसर्‍या पिढीला काहीतरी देऊन जाते; पुढची पिढी त्यात आपले नावीन्य मिसळते. युवराजच्या हातातील छिन्नीही अशीच आहे. तिच्यावर घराचा प्रभाव आहे, गुरूने दिलेले ज्ञान आहे आणि स्वतःचे कष्ट आहेत. या प्राचीन परंपरेचा पाईक असलेल्या कोकणातील या हिर्‍याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०८२२२६६)
 
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर