‘सुपर एल निनो'चा भारताच्या जैवविविधतेला धोका

    23-Sep-2026

Super El Niño


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२६-२७ मध्ये निर्माण होत असलेल्या अत्यंत तीव्र ‘सुपर’ एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे भारतातील सागरी, गोड्या पाण्यातील आणि भू-परिसंस्थांवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे (Super El Niño). या पार्श्वभूमीवर देशातील १८८ पर्यावरणशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी एकत्र येत जैवविविधतेवरील परिणामांचे तातडीने निरीक्षण, संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन केले आहे (Super El Niño). हे आवाहन १६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Super El Niño)

 

आगामी एल निनोमुळे भारतात अभूतपूर्व हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ हवामानशास्त्रीय निरीक्षण न करता त्याचा वन्यजीव, वनस्पती, अधिवास आणि मानव-परिसंस्था संबंधांवर होणारा परिणाम प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर नोंदविणे आवश्यक असल्याचे पर्यावरणशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. एल निनोच्या तीव्रतेमुळे भारतातील विविध परिसंस्थांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. समुद्रातील वाढते तापमान आणि सागरी उष्णतेच्या लाटा यामुळे प्रवाळभित्ती, मासे आणि इतर सागरी जीवांवर ताण येऊ शकतो. मत्स्यसंपत्तीचे वितरण आणि समुद्री अन्नसाखळीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

 

भूभागावर वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे वनस्पतींची वाढ, प्राण्यांचे वर्तन, प्रजनन आणि जगण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. विशेषतः आधीच उष्ण आणि कोरड्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या प्रदेशांतील प्रजातींवर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो. कोरड्या जंगलांमध्ये दुष्काळ आणि उष्णतेमुळे वनव्यांची वारंवारता आणि तीव्रता वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

 

भारतासाठी ‘नैसर्गिक प्रयोगशाळा’ ठरण्याची संधी
२०२६-२७ मधील संभाव्य तीव्र एल निनो हा भारतातील विविध परिसंस्थांवर हवामानाच्या टोकाच्या घटनांचा परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचा कालखंड ठरू शकतो. त्यामुळे वन, गवताळ प्रदेश, आर्द्रभूमी, नद्या, किनारी भाग, प्रवाळभित्ती आणि शहरी परिसंस्था यांचे एकाच कालावधीत सातत्यपूर्ण निरीक्षण करण्याची गरज या पर्यावरणशास्त्रज्ञांनी अधोरेखित केली आहे. या आवाहनावर इंडियन इकोलाॅजी कलेक्टिव्हच्या वतीने १८८ जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

 





संबंधित मजकूर