आयुर्वेदाची अमृतपरंपरा

    23-Sep-2026
National Ayurveda Day 2026

भारतीय वैद्यक परंपरेत आयुर्वेदाची परंपरा मोठी आहे. कित्येक शतकांपासून सुरु असलेल्या या परंपरेने आजही तिची उपयोगिता टिकवून ठेवली आहे. त्यामुळेच आज आधुनिक काळातही अनेक रुग्ण आयुर्वेदाकडे वळताना दिसतात. आज असलेल्या ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिना’निमित्ताने आयुर्वेदाचे स्वरुप जाणून घेणारा हा लेख...
 
जागतिक योग दिना’सारखाच २०१५ सालापासून, ‘जागतिक आयुर्वेद दिन’ही साजरा केला जातो. आयुष मंत्रालय, ‘एनसीआयएसएम’ इ. संस्थांमार्फत विविध देशांमध्ये, राज्यांमध्ये हा दिवस साजरा होतो. दि. २३ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिनाची यावर्षीची संकल्पना ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ (Ayurved for a healthier tomorrow) अशी निश्चित करण्यात आली आहे. या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धा, जनजागृतीपर कार्यक्रम व आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठीच्या विविध मोहिमांचे आयोजन करण्यात येते.
 
आयुर्वेद म्हणजे ‘आयुष्याचा वेद’ (Science of life). यामध्ये केवळ रोग बरे करणे इतकेच अपेक्षित नाही. मनुष्य कायम आजारी नसतो. पण, तो सतत सुखी व समाधानीदेखील नसतो. संपूर्ण जगाची निर्मिती ही पंच महाभूतांपासून झाली आहे. चराचरांतील प्रत्येक जीव हा पाञ्चभौतिक असून, मानवी शरीरही पाञ्चभौतिकच आहे. आयुर्वेदाची मुख्यत्वे दोन ध्येये आहेत. सर्वप्रथम स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य राखणे (मेन्टेंनन्स ऑफ हेल्थ) आणि दुसरे म्हणजे रोग्याचा रोग दूर करणे. यात समूळ नष्ट करणे (हिलींग) म्हणजेच, प्रतिबंध (प्रीव्हेंटिव्ह मेडिसिन) हा खूप महत्त्वाचा भाग आयुर्वेदात येतो. मनुष्य जन्माला येताच, त्याची प्रकृती ठरते (‘कन्सेप्शन’च्या वेळेसच प्रकृती निश्चिती होते.). विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये विशिष्ट देहबोली, झोपेच्या पद्धती, पचनशक्ती, शारीरिक बांधा, स्वभाव आढळतात. विशिष्ट आजार होण्याची शयताही, विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्तींमध्येच अधिक बघायला मिळते. प्रकृती समजून घेऊन त्यानुसार आरोग्यदायी जीवनशैली जर अंगीकारल्यास; निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आयुष्य प्राप्त करणे आपणांस शय होते. व्याधीपूर्व लक्षणे जर समजलले, तर व्याधीही रोखणे शय होते. जसे लाल सिग्नल लांबून दिसल्यावर गाडी थांबविली जाते. तसेच आपल्या प्रकृतीनुरूप दिनचर्या, रात्रीचर्या व ॠतुचर्येचे पालन केल्यास, व्याधीची उत्पत्ती थोपवणेही शय आहे. आणि यानंतरही जर आजारी पडलोच तर त्याची तीव्रता, तीक्ष्णता आणि पुनरावृत्ती कमी करता येते. यालाच ‘प्रीव्हेंटिव्ह मेडिसिन’ म्हटले जाते. आजारी पडल्यावर औषध घेणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे. वारंवार आजारी न पडण्याचे उपाय म्हणजे, दिनचर्या, रात्रीचर्या आणि ॠतुचर्या यांचे पालन होय. जसे पावसाळ्यात छत्री, रेनकोट इ. वापरले जातात; उन्हाळ्यात सुती, हलया रंगांचे कपडे वापरले जातात; तसेच आहारातील आणि व्यायामातील बदलही अपेक्षित आहेत.
 
त्रिदोष-सप्तधातू-त्रिमल यानेच मानवी शरीर बनले आहे. त्यांच्यातील गुणवत्ता आणि प्रमाण यांची सुस्थिती तसेच परस्परांतील संतुलन यावरच आपले आरोग्य अवलंबून आहे. हेच आरोग्याचे मूळ कारक आहेत. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आरोग्याचे आधारस्तंभ. यांतील समतोल बिघडल्यास, मनुष्याचे आरोग्य बिघडते. स्वास्थ्याचे आणि रोगाचे परीक्षण विविध पद्धतीने केले जाते. यात त्रिविध परीक्षण, अष्टविध परीक्षण, दशविध परीक्षण इत्यादींचा समावेश होतो. त्रिविध परीक्षणामध्ये दर्शन परीक्षण (एझामिनेशन), स्पर्शन (व्हेरिअस टेस्ट), प्रश्न (कन्सल्टेशन) यांचा समावेश होतो.
 
अष्टविध परीक्षणामध्ये नाडी (पल्स एझामिनेशन हा त्यातील एक भाग झाला), मूत्र परीक्षण, मल परीक्षण, जिव्हा परीक्षण (Physical appearance), शब्द (रुग्णांचे बोलणे किंवा अवयवांतील आवाज तपासणे), नेत्र (डोळ्यांचे परीक्षण) आणि स्पर्श (शरीराचे तापमान, त्वचेतील बदल इ.) अशा विविध परीक्षणांनी ती व्यक्ती स्वस्थ आहे की नाही याची चिकित्सा केली जाते.
 
चिकित्सेचेही मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, ‘शमन चिकित्सा’ आणि ‘शोधन चिकित्सा’. शमन चिकित्सेत मुख्यत्वेकरून, औषधी चिकित्सेचा अंतर्भाव होतो. (‘आयुर्वेदातील विविध चिकित्सापद्धती’ यावर पुढील लेखात वाचूयात.) शोधन चिकित्सेमध्ये मुख्यत्वेकरून पंचकर्माचा समावेश होतो. आयुर्वेदशास्त्रात चिकित्सा केवळ रुग्णाचीच करावी, असे सांगितलेले नाही. स्वास्थ्य टिकविण्यासाठीदेखील, शोधन चिकित्सेतील काही विशिष्ट चिकित्सांचा अवलंब करण्यास सांगितला आहे.
 
वमन, विरेचन आणि बस्ती हे तीन शोधन कर्म, मुख्यत्वेकरून कफ, पित्त आणि वाताच्या गतीला, कार्याला नियमित, नियंत्रित राखण्यासाठी करण्याचा उपदेश आहे. विशिष्ट ॠतूमध्ये (म्हणजे वसंत ॠतूत ‘वमन’, वर्षा ॠतूमध्ये ‘बस्ती’ आणि शरद ॠतूमध्ये ‘विरेचन’) ही कर्मे जर स्वस्थ व्यक्तीने करवून घेतली, तर वर्षभराचे स्वास्थ्यरक्षण उत्पन्न पद्धतीने होते. आयुर्वेदातील पंचकर्म आणि योगाभ्यासातील षट्क्रिया या थोड्या अंशी जरी समान वाटल्या, तरी त्यांची करण्याची पद्धत आणि त्यातून मिळणारे फायदे संपूर्णतः भिन्नभिन्न आहेत. तेव्हा आयुर्वेदोक्त पंचकर्म हे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच व्हावीत. ‘डीआयवाय’ (डू इट युवरसेल्फ) पद्धतीने करू नये. शोधन कर्म ‘प्रीव्हेंटिव्ह ट्रीटमेंट’ (प्रतिबंधात्मक चिकित्सा) या अंतर्गत तर येतातच, त्याचबरोबर ‘क्युरेटिव्ह ट्रीटमेंट’ (व्याधी निर्मूलन चिकित्सा) आणि नॉन रिलॅप्स (अपुनर्भव चिकित्सा)मध्येदेखील केली जाते. तेव्हा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना, स्वतः सेल्फ डायग्नोसिस, सेल्फ ट्रीटमेंट करू नये.
 
शमन चिकित्सेमध्ये पंचगव्य चिकित्सा, पाञ्चभौतिक चिकित्सा, भस्म चिकित्सा, वनौषधी चिकित्सा इ. विविध चिकित्सा प्रणालींचा समावेश होतो. रुग्णाचे शारीरिक बल आणि मानसिक सहनशीलता, व्याधीची तीव्रता इ. पैलूंवर केवळ शमन चिकित्सा करावी का शोधन चिकित्साही करावी, हे अवलंबून आहे. बर्‍याचशा व्याधी आनुवंशिक स्वरूपाच्या असतात. आयुर्वेदशास्त्रात गर्भधारणेपूर्वी माता-पित्याची शोधन चिकित्सा जर केली, तर आनुवंशिक दुष्ट गुण पुढे पसरण्यापासून थांबविणे, रोखणे शय असल्याचे सांगितले आहे. स्वास्थ्य जपणे हे केवळ व्यक्तिशः गरजेचे नाही; तर कुटुंबाचे स्वास्थ्य, प्रत्येक नागरिकाचे स्वास्थ्य जपणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्वास्थ्य म्हटल्यावर त्यात केवळ शारीरिक स्वास्थ्य अपेक्षित नाही, त्याचबरोबर मानसिक सकारात्मकता, स्थैर्य आणि उदात्त भावनादेखील गरजेची आहे. संपूर्ण स्वास्थ्यासाठी आयुर्वेदाची मदत अवश्य होते.
 
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९




संबंधित मजकूर