मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून (बीएनएचएस) मुक्त करण्यात आलेल्या लांब चोचीच्या गिधाडाने तब्बल २५३ किलोमीटर अंतर पार करत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गाव गाठले (bnhs tagged vulture). मात्र, या प्रवासादरम्यान अशक्त झालेल्या या गिधाडावर सध्या तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत (bnhs tagged vulture). त्याच्या पायावर लावण्यात आलेल्या खुणचिट्टीमुळे त्याचा मेळघाट ते बीडपर्यंतचा प्रवास स्पष्ट झाला आहे. (bnhs tagged vulture)
Z29 हे नर लांब चोचीचे गिधाड असून, त्याला 'बीएनएचएस'च्या गिधाड संवर्धन कार्यक्रमांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा परिसरातून २ जानेवारी २०२६ रोजी मुक्त करण्यात आले होते. मेळघाटमध्ये पुनर्वसनासाठी आणलेल्या गिधाडांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पूर्व मुक्तता पक्षिगृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर २ जानेवारीपासून त्यांना नैसर्गिक अधिवासात बाहेर पडण्याची संधी देण्यात आली. या गिधाडांना जीएसएम सॅटेलाइट टॅग लावण्यात आले होते. 'बीएनएचएस'च्या नोंदीनुसार Z29 ने मुक्ततेनंतर मेळघाट परिसरातून बाहेर पडून मोठ्या क्षेत्रात भ्रमंती केली होती. Z29 ने सुमारे दोन महिन्यांत ४७६ किलोमीटरचा प्रवास केला आणि सातपुडा परिसरातील बैतूल व खंडवा जिल्ह्यांमधून भ्रमंती केल्यानंतर तो पुन्हा मेळघाटच्या पक्षीगृह परिसरात परतला.
त्यानंतर हे गिधाड नाशिकमध्ये कोल्ह्याच्या कलेवरामधून दोन दिवस खाद्य खाताना दिसले. म्हणजे या गिधाडाने स्वतः खाद्यस्रोत शोधण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. मात्र, रविवारी Z29 हे गिधाड सिरसदेवी-गडी (माजलगाव) मार्गावर जखमी अवस्थेत आढळून आले. शेतकरी पवार यांनी त्याची अवस्था पाहून तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल शिल्पा ससाने आणि वनरक्षक रामराव सोनकांबळे यांनी घटनास्थळी पोहोचून गिधाडाला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. सध्या Z29 चे वजन ४ किलो ३३३ ग्रॅम असून, तो अशक्त अवस्थेत असल्याचे उपलब्ध माहितीतून समोर आले आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून तो काहीसा लंगडत असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला योग्य नैसर्गिक अधिवासात पुन्हा मुक्त करण्याचे नियोजन असल्याचे केंद्राचे सिद्धार्थ सोनावणे यांनी सांगितले.