
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगर येथील खोल विहिरीत तीन दिवसांहून अधिक काळ अडकल्याने अशक्त अवस्थेत सापडलेल्या भारतीय राखी लांडग्याला वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून जीवदान मिळाले आहे (indian wolf). महत्त्वाचे म्हणजे उपचार आणि पुनर्वसनानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सॅटेलाइट कॉलर लावून सोडल्यानंतर त्याने आतापर्यंत २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. (indian wolf)
१२ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर परिसरात एक भारतीय राखी लांडगा खोल विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाने तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाठवले. लांडगा बराच काळ विहिरीत अडकून असल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांहून अधिक काळ तो विहिरीत राहिल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्या शरीरावर अनेक जखमाही आढळून आल्या. वन विभागाच्या पथकाने लांडग्याची यशस्वी सुटका करून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट वन्यजीव उपचार केंद्रात हलवले. तेथे पशुवैद्यकीय उपचार, वैद्यकीय देखरेख, पोषण आणि आवश्यक पुनर्वसन करण्यात आले. महिन्याभरानंतर लांडगा पूर्णपणे निरोगी असून नैसर्गिक अधिवासात परतण्यासाठी सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी त्याला छत्रपती संभाजीनगरच्या त्याच भूप्रदेशात पुन्हा मुक्त करण्यात आले, ज्या परिसरातून त्याची सुटका करण्यात आली होती. यावेळी रेस्क्यू आणि दी हॅबिटॅट्स ट्रस्टच्या सहकार्याने वन विभागाच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्याच्या गळ्यात सॅटेलाईट कॉलर लावण्यात आली.
मुक्ततेनंतर या लांडग्याने आतापर्यंत २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास केला आहे. त्याने जालना जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पुन्हा संभाजीनगरमध्ये सोडलेल्या परिसरापर्यंत परतीचा प्रवास केला आहे. सॅटेलाइट कॉलरमुळे लांडगा वापरत असलेले संभाव्य भ्रमणमार्ग आणि अधिवास जोडणारे मार्ग ओळखण्यास मदत होईल. त्याचबरोबर तो कोणत्या प्रकारच्या अधिवासाचा वापर करतो, किती अंतरापर्यंत हालचाल करतो, त्याच्या हालचालींचे स्वरूप कसे आहे, तसेच त्याच्या विखुरण्याच्या प्रक्रियेबाबतही माहिती मिळू शकते.