मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील मेट्रो क्रॅश कॉम्प्लेक्समध्ये वीजवाहिन्यांच्या सुमारे आठ फूट खोल डक्टमध्ये शिरलेल्या तीन फूट लांबीच्या मगरीची बुधवारी पहाटे सुखरूप सुटका करण्यात आली (Aarey Metro crashed). यानिमित्ताने आरे कॉलनीतील मानवी वर्दळ असलेल्या भागात पुन्हा मगर आढळल्याने या परिसरातील नैसर्गिक जलस्रोत, नाले आणि वनक्षेत्र यांच्यातील अधिवास जोडणीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. (Aarey Metro crashed)
गेल्या महिन्यात आरेतील तापेश्वर परिसर आणि मेट्रो क्रॅश क्षेत्राजवळ रस्ता ओलांडणाऱ्या निमवयस्क मगरीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर संबंधित परिसरात मगरीचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून बचाव पथकांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी मगर आढळून आली नव्हती. बुधवार, २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजून ५ मिनिटांनी आरे मेट्रो कॉम्प्लेक्समध्ये मगर दिसल्याची माहिती डब्लूडब्लूए या वन्यजीव बचाव संस्थेच्या हेल्पलाइनवर प्राप्त झाली. माहिती मिळताच संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला मगर परिसरात दिसून आली होती. त्यानंतर ती वीजवाहिन्यांसाठी असलेल्या डक्टमध्ये शिरली. बचाव पथकाने शोध घेतल्यानंतर सुमारे आठ फूट खोल डक्टमध्ये मगरीचे अस्तित्व दिसले. त्यानंतर आवश्यक काळजी घेत मगरीला डक्टमधून बाहेर काढण्यात आले.
या बचावकारवाईची माहिती मुंबई वन विभागाच्या रेंज कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर मगरीला निरीक्षण आणि पशुवैद्यकीय तपासणीसाठी डब्लूडब्लूएच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये हलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चारियर यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत मगर नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी योग्य आणि तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. वन विभागाशी आवश्यक समन्वय आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.