मुंबई (Chocolate Ganesha Idol) : मुंबईतील प्रसिद्ध पेस्ट्री शेफ आणि चॉकलेटिअर संकेश बांगेरा यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून पूर्णपणे चॉकलेटपासून बनवलेली आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. तब्बल चार फूट उंच आणि ७५ किलो वजनाची ही बाप्पाची मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कलाकृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्याही तयार साच्याचा वापर करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर, मूर्तीला आतून आधार देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आधार वापरलेला नाही. संपूर्ण मूर्ती पूर्णपणे हाताने घडवण्यात आली आहे. (Chocolate Ganesha Idol)
अशी माहिती आहे की, ही भव्य मूर्ती साकारण्यासाठी शेफ संकेश बांगेरा यांना तीन दिवसांत एकूण ३६ तासांहून अधिक वेळ लागला. केवळ चॉकलेटच्या साहाय्याने एवढ्या मोठ्या आकाराची मूर्ती उभी करणे आणि बाप्पाचे भाव व सौंदर्य टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मोठ्या चॉकलेट शिल्पांसाठी साधारणपणे तयार साच्यांचा वापर केला जातो. मात्र, बांगेरा यांनी जाणूनबुजून संपूर्ण मूर्ती हाताने घडवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मूर्तीचे चेहरेपट्टी, प्रमाण, आसन आणि सूक्ष्म तपशील यांवर त्यांना पूर्ण नियंत्रण ठेवता आले. (Chocolate Ganesha Idol)
आतमध्ये कोणताही आधार नसल्याने संपूर्ण ७५ किलोचा भार मूर्तीला स्वतःच पेलावा लागत होता. बाप्पाचे हात, मुकुट, दागिने आणि बाहेरील भाग जोडताना वजनाचे अचूक वितरण करावे लागले. कोनात झालेला छोटासा बदलही मूर्तीचा समतोल बिघडवू शकत होता. मानवी शरीराची उष्णता आणि वातावरणातील तापमानामुळे चॉकलेट लगेच मऊ होते. त्यामुळे मूर्तीचा आकार आणि त्यावरील सूक्ष्म कोरीवकाम टिकवण्यासाठी तापमानावर बारीक लक्ष त्यांना ठेवावे लागले. (Chocolate Ganesha Idol)
साचा न वापरल्यामुळे मूर्ती साकारताना अधिक सर्जनशील स्वातंत्र्य मिळाल्याचे बांगेरा यांनी सांगितले. बाप्पाची चेहरेपट्टी, सोंड, मुकुट, अंगावरील दागिने, वस्त्रांच्या घड्या आणि पाठीशी असलेला मूषक यांसारखे सूक्ष्म तपशील अत्यंत बारकाईने हाताने कोरण्यात आले आहेत. आकार वाढताना प्रमाण राखण्यासाठी अनेक भागांना पुन्हा-पुन्हा आकार देऊन ही देखणी मूर्ती परिपूर्ण करण्यात आली. शेफ संकेश बांगेरा यांच्या या अद्भुत कल्पकतेमुळे आणि कौशल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव एका गोड आणि कलात्मक अनुभूतीने अधिकच खास बनला आहे. (Chocolate Ganesha Idol)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक