अ‘विनाश’काले विपरीत बुद्धी

    23-Sep-2026   
 
 Avinash Jadhav Ganesh Idol Controversy
 
काही वर्षांपूर्वीचे गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या चौपाट्यांवरील दृश्य जरा आठवून बघा. समुद्रकिनारे गणरायाच्या भंगलेल्या मूर्तींनी, हार-फुले-नारळाच्या निर्माल्याने अक्षरश: ओसंडून वाहत होते. गणेश विसर्जनानंतर चौपाट्यांवर फेरफटका मारताना यंदा हे मन उद्विग्न करणारे दृश्य त्या प्रमाणात दिसून आले नाही. अगदी चौपाट्यांची स्वच्छता मोहीम राबविणार्‍या काही स्वयंसेवकांनीही त्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे कौतुकच केले. पण, ही सकारात्मक बाब लक्षात न घेता, मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये घुसून भंगलेल्या गणेशमूर्तींचे व्हिडिओ दाखवत, त्यातून राजकीय पोळ्या भाजण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न परवा केला.
 
एवढेच नाही, तर यावरून थेट ‘भाजपमुळे हिंदू खतरे में हैं’ असा सूतावरून स्वर्ग गाठण्याचा खुळचट प्रयत्नही जाधवांकडून झाला. पण, मग यापूर्वी गेली पंचवीसएक वर्षे जेव्हा उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात मुंबई पालिकेत सत्ता होती, तेव्हा अविनाश जाधव डम्पिंग ग्राऊंडकडे, समुद्रकिनार्‍यांकडे विसर्जनानंतर असेच व्हिडिओ काढत कधी का फिरकले नाहीत? उद्धव ठाकरेंचेही जाऊ द्या; पण राज ठाकरेंच्याच मनसेची नाशिक पालिकेत सत्तेत असताना गणेश विसर्जनानंतर असे चित्र गोदाकाठावरही दिसू नये, म्हणून नेमक्या कोणत्या उपाययोजना त्यावेळी राबविल्या? याचीही उत्तरे जाधवांनी द्यावी. मुळात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवरील पूर्णपणे बंदीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. पण, सहा फुटांखालील गणेशमूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांत करण्यास आता सक्त मनाई आहे. त्यामुळे गणेशभक्तांचाही गेल्या काही वर्षांपासून शाडूमातीची मूर्ती वापरण्याबरोबरच कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. असे असतानाही मुद्दाम डम्पिंग ग्राऊंडमध्ये जाऊन, भंगलेल्या मूर्तींचे चित्रीकरण करून हिंदूंच्या भावना भडकवण्याचा हा सगळा खटाटोप कशासाठी? अशा कृत्यांतून ‘हिंदू खतरे में हैं’ हा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न म्हणा, कधीही यशस्वी होणार नाही. कारण, मुळात हिंदू समाज हा इतका संकुचित विचार करणारा नक्कीच नाही. त्यामुळे आधी मनसेच्या संदीप देशपांडेंनी गणेशोत्सव मंडळांना मिळणार्‍या उद्योजकांच्या देणग्यांवरून आणि आता जाधवांनी भंगलेल्या गणेशमूर्तींवरून साधलेला हा राजकीय डाव म्हणजे ‘अ‘विनाश’काले विपरीत बुद्धी’!

आपलीच प्रतिमा होते...
 
‘भूमिकाबदल’ हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत न दुर्लक्षण्यासारखा घटक. कधी ते मोदीसमर्थक असतात, तर कधी त्यांना भाऊबंदकीच्या आणाभाका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याशिवाय गत्यंतर नसते. महाराष्ट्रातील जनतेलाही राज ठाकरेंच्या या राजकीय पॅटर्नची आता चांगलीच सवय झालेली. २०२० सालीही त्यांची ‘हिंदूजननायक’ अशी प्रतिमा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टरवरून रंगवली. एवढेच नव्हे, तर झेंड्यावर ‘शिवमुद्रा’ आणून मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्ववादी राजकारणाचे राज ठाकरेंनी संकेतही दिले. बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जसे ‘हिंदूहृदयसम्राट’ शोभून दिसायचे, तसेच राज ठाकरेंच्या नावापुढे ‘हिंदूजननायक’ मिरवले गेले. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका वगैरे घेऊन राज ठाकरेंनी त्या प्रतिमेला जागण्याचाही प्रयत्न केला खरा; पण तोही अपेक्षेप्रमाणे फारकाळ टिकला नाहीच.
 
आज जे अविनाश जाधव ‘भाजपमुळे हिंदू खतरे में हैं’ म्हणून फुकाचा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांना त्यांच्याच ‘हिंदूजननायक’ नेत्याच्या पुढील काही विधानांचा कदाचित सपशेल विसर पडलेला दिसतो. "त्या गंगेचे पाणी कोण पिणार, श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही?” असा प्रश्न उपस्थित करणारे राज ठाकरे असोत अथवा कार्यकर्ते दहीहंडीचे आमंत्रण द्यायला आल्यावर, "मी फक्त मटणहंडींचं आमंत्रण स्वीकारतो,” अशी टिप्पणी करणारे राज ठाकरे असोत, या विधानांनाही मग ‘हिंदूंच्या भावना दुखावणारी विधाने’ असे का म्हणू नये? हेही आता जाधवांनी सांगावे. मुळात ‘हिंदूजननायक’ म्हणविणार्‍यांनी किमान हिंदू धर्म, परंपरा याविषयी बोलताना संवेदनशीलता बाळगायला हवी. हिंदू समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्याची, त्यावर कायमस्वरूपी उत्तरे शोधण्याचीही तत्परता दाखवतो, तो खरा ‘हिंदूजननायक’. मग गणेशमूर्तींच्या उंचीचा प्रश्न असो अथवा ‘प्लास्टर ऑॅफ पॅरिस’चा, त्यासाठी मूर्तिकारांच्या, मंडळांच्या प्रबोधनासाठी पक्षनेतृत्वानेच पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक बाबतीत केवळ सरकारकडे अंगुलीनिर्देश करून कर्तव्यापासून पळ काढता येत नाही. म्हणूनच, ‘आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी’ हे ‘हिंदूजननायक’ आणि त्यांच्या समर्थकांनी ध्यानात घेतलेले बरे!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर