ट्रम्पची ‘स्व-केंद्रित’ हुकूमशाही!

    23-Sep-2026   
 
 trump tv Trump White House Media Ban
 
‘लोकशाही’ या शब्दाची व्याख्या सत्ताधीशांच्या सोयीनुसार कशी बदलते, याचे ताजे आणि तितकेच चिंताजनक उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ताजी भूमिका. काही वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना ‘व्हाईट हाऊस’च्या वार्तांकनावर बंदी लादल्यानंतर ट्रम्प यांनी थेट ‘ट्रम्प टीव्ही : द एसेंशियल्स स्टेशन’ ही नवी २४ तास चालणारी डिजिटल व्हिडिओ स्ट्रीम सुरू केली. असे करुन ‘व्हाईट हाऊस’ने एकप्रकारे अधिकृत, थेट आणि ‘फिल्टर’ न केलेली सरकारी माहिती देण्याचा दावा केला आहे. पण, हा दावा म्हणजे लोकशाहीचा संकोच झाकण्याचा एक अपयशी प्रयत्नही ठरु शकतो.
 
ट्रम्प यांनी सातत्याने स्वतःची प्रतिमा ‘लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते’ आणि ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षक’ म्हणून जगासमोर मांडली. इतर देशांच्या प्रमुखांवर टीका करताना त्यांनी लोकशाहीच्या मूल्यांचा दाखला दिला. मात्र, जेव्हा ‘सीएनएन’, ‘एमएस नाऊ’ आणि ‘पॉलिटिको’ यांसारख्या प्रमुख माध्यम संस्थांनी त्यांच्या प्रशासनाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले किंवा काही अनधिकृत गोष्टींवरून प्रश्न उपस्थित केले, तेव्हा ट्रम्प प्रशासनाने सरळ त्यांचे ‘प्रेस क्रेडेन्शियल्स’ जप्त करून त्यांना ‘व्हाईट हाऊस’मध्ये प्रवेश नाकारला. मग प्रश्न विचारणार्‍याला थेट बाहेरचा रस्ता दाखवणे, ही कुठल्या प्रकारची लोकशाही?
 
आपल्याला प्रतिकूल असणार्‍या प्रत्येक बातमीला ‘फेक न्यूज’ किंवा ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ ठरवणे, ही ट्रम्प यांची जुनीच शैली. अमेरिकेच्या संविधानातील ‘फर्स्ट अमेंडमेंट’ पत्रकारांना प्रशासनाला जाब विचारण्याचे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार देते. मात्र, या अधिकारांवरच गदा आणून, स्वतःच्या मर्जीतील बातमीदार ठेवणे आणि वृत्तसंस्थांना न्यायालयात धाव घेण्यास भाग पाडणे, हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला थेट हल्ला आहे.
 
सामान्यतः अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांशी संबंधित वार्तांकनासाठी सर्व वृत्तसंस्था एकत्र येऊन ‘टेलिव्हिजन पूल’द्वारे फुटेज सामायिक करतात. ‘सीएनएन’ला यातून वगळल्यानंतर ‘एबीसी’, ‘सीबीएस’, ‘फॉस न्यूज’ आणि ‘एनबीसी’ यांनी दाखवलेली कल्पक एकजुटता ही कौतुकास्पद ठरली. परंतु, हा पूल विस्कळीत झाल्याचा गैरफायदा घेत ‘व्हाईट हाऊस’ने ‘ट्रम्प टीव्ही’ हा स्वतःचा ‘ऑनलाईन फीड’ सुरू केला. म्हणजेच, जनतेला काय दाखवायचे आणि काय लपवायचे, याचे नियंत्रण पूर्णपणे प्रशासनाने स्वतःकडे घेतले. हे वृत्तप्रसारण नसून निव्वळ ‘सरकारी प्रचार’ आहे. न्यायाधीश टिम केली यांनी कायदेशीर चौकटीत राहून निर्णय दिला. तरीही, "माझ्याच नियुक्तीच्या न्यायाधीशाने माझ्याविरोधात निर्णय दिला,” अशी टिप्पणी करून ट्रम्प यांनी न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही प्रवृत्ती लोकशाहीतील स्वतंत्र संस्थांचा आदर करण्याची नसून, त्यांना स्वतःच्या दावणीला बांधण्याची आहे.
 
जेव्हा एखादा नेता पत्रकारांच्या प्रश्नांवर बंदी घालतो आणि स्वतःचे स्वतंत्र ‘टीव्ही चॅनेल’ काढून फक्त स्वतःचीच बाजू मांडतो, तेव्हा ती लोकशाही राहत नाही; ती ‘स्व-केंद्रित हुकूमशाही’ बनते. ट्रम्प यांनी इतर देशांच्या लोकशाहीवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या गल्लीत लोकशाहीची मूल्ये कशी पायदळी तुडवली जात आहेत, याचे भान ठेवणे गरजेचे होते. ‘ट्रम्प टीव्ही’ची सुरुवात ही माध्यमांची गळचेपी लपवण्यासाठी रचलेला एक ‘डिजिटल’ बनाव आहे आणि ट्रम्प यांची ही भूमिका अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेला लागलेला मोठा धक्का म्हणता येईल.
 
थोडयात सांगायचे, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वतंत्र पत्रकारिता हे लोकशाहीचे प्राण असतात. परंतु, आपल्या सोयीची तीच बातमी आणि विरोधी प्रश्न म्हणजे ‘फेक न्यूज’, अशी सोयीस्कर व्याख्या करून ट्रम्प यांनी लोकशाहीच्या या मूलतत्त्वांनाच नख लावले आहे. ‘ट्रम्प टीव्ही’च्या माध्यमातून सरकारी प्रचाराचे झापड जनतेच्या डोळ्यांवर बांधून उत्तरदायित्वापासून पळ काढण्याचाच हा प्रयत्न. दुसर्‍या देशांतील लोकशाहीवर बोट दाखवणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच्या देशात लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ आणि ‘न्यायव्यवस्था’ कमकुवत करणे, हे चिंताजनकच. सत्ताधीशांच्या अशा स्व-केंद्रित हुकूमशाही प्रवृत्तींमुळे आज केवळ अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेलाच धक्का बसलेला नाही, तर जगभरातील लोकशाही मूल्यांपुढे एक मोठे संकट उभे ठाकले आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर