अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:सोबतच समजाच्याच नव्हे; तर मुंबई शहराच्या वास्तुविकासासाठी यश मिळवणारे विशाल अहिरे यांच्या जीवनाचा मागोवा घेणार हा लेख...
मालाड -मालवणी... साल १९९२. दंगलीने परिसर होरपळलेला. झोपडीच्या फटीतून लहानग्या विशालने पोलिसांवर अॅसिड फेकणारे, निरपराध लोकांना भोसकणारे, तसेच त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई पाहिली होती. त्याकाळात जनकल्याण नगरमध्ये संघाची शाखा चालायची. विशाल खेळाच्या ओढीने त्या शाखेत जाऊ लागले. मात्र, खेळाच्या जोडीनेच समाज आणि देशाप्रति त्यांची निष्ठा प्रगल्भ होत गेली. तिथे त्यांना नानाजी, सेतूलाल अशा स्वयंसेवक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विशाल यांना संघशिक्षक नानाजी म्हणायचे, "बेटा, तू बडा लंबी रेस का घोडा हैं|” शिक्षक नानाजींचे म्हणणे खरे ठरले. गरिबी आणि सर्वच प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत विशाल आज बांधकाम क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. एका मल्टी-नॅशनल कंपनीसोबत कार्यकारी भागीदार म्हणून त्यांनी मुंबईत स्वकर्तृत्वाच्या जोरावर छाप उमटवली.
मुंबईचे भगवती हॉस्पिटल, चांदिवली-अंधेरी सायकल ट्रॅक असू दे की, विविध नामांकित शाळा-महाविद्यालय; यांच्या बांधणीमध्ये विशाल यांचे इंजिनिअर म्हणून नियोजन आणि कार्यकौशल्य आहे. बांधकाम क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे. मालाड-मालवणीचे बौद्धविहार असू दे की, कांदिवलीचे गणेश मंदिर असू दे, तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने विशाल यांनी काम केले. या धार्मिक वास्तूंच्या उभारणीसाठी वैयक्तिक कष्ट उपसले. बौद्ध समाजाचा सुपुत्र म्हणून समाजाला त्यांचा अभिमान आहेच आहे. मात्र, त्याचवेळी बौद्धेतर समाजामध्येही त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून मान-सन्मान प्राप्त आहे. कुणालाही पैसे देण्यापेक्षा त्यांना पैसे निर्माण करण्याची प्रेरणा आणि साधन उपलब्ध करून द्यायला हवे, असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे युवकांनी रोजगारक्षम बनावे, यासाठीही ते कार्यरत आहेत. शिक्षण घेऊन इतर कौशल्य प्राप्त करावेत आणि त्याद्वारे स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे, यासाठी ते समाजात जागृती करतात. त्यांनी अनेकांना नोकरी आणि स्वयंरोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला. ‘कॉर्पोरेट’ स्तरावर काम करताना त्यांनी अनुभवले की, सधन घरी मुले सायकल किंवा तत्सम वाहन वर्षभर वापरतात. त्यानंतर ती वाहने अडगळीत पडतात किंवा अक्षरशः भंगाराच्या भावाने विकली जातात. विशाल यांनी समाजाला आवाहन केले की, अशी वाहने मला द्या. ती मी दुरुस्त करून नवी करेन आणि गरजूंना त्यांचे वितरण करू. या योजनेला अनेकांनी पाठिंबा दिला. या वाहनांचे वितरण ते दुर्गम खेड्यापाड्यांतल्या विद्यार्थ्यांना करणार आहेत.
तर, विशाल आहिरे यांचा जीवनपट पाहू. नाशिकच्या चांदवडचे पंडित आणि प्रतिभा आहिरे हे अत्यंत समाजशील दाम्पत्य. उभयतांना सहा अपत्ये. त्यांपैकी एक विशाल. कामानिमित्त आहिरे कुटुंब मुंबईतील मालाड-मालवणीला राहू लागले. पंडित हे महानगरपालिकेच्या इस्पितळात तृतीय श्रेणीचे कर्मचारी म्हणून काम करत असत; तर प्रतिभा या गृहिणी. ८०च्या दशकात कर्मचार्यांना अत्यंत कमी वेतन मिळत असे. आई सव्वादोन रुपयांत दररोजचा घरखर्च भागवत असे. संसार चालवताना तिची दमछाक होई. आजूबाजूला अनेक मुले दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन करत असत. शाळा शिकणे तर दूरच. या वातावरणात पंडित हे मुलांना डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगायचे. ते संस्कार विशाल यांच्यावर झाले.
असो. पंडित यांना मुलांना खूप शिकवायचे होते; पण आर्थिक परिस्थितीपुढे ते हतबल झाले. मात्र, विशाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचले होते. त्याचबरोबर संघशाखेत जाऊन त्यांचा जीवनाचा दृष्टिकोनही विशाल झाला होता. त्यामुळे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तेसुद्धा दिवसातून काही तास ‘एसटीडी’ बूथवर काम करत; तर काही वेळ कुरिअर बॉयचे काम करत आणि एका बँजो पार्टीमध्ये बँजो वाजवायचे काम करत. या पैशातून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पुढे खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून पडेल ते काम केले. हेतू हाच की, इंजिनिअरिंग संदर्भातील छोट्यातील छोटे काम करता यावे. पुढे याच कामातूनच त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या काळात त्यांना अनेक समस्या आल्या. अनेक राजकारणी आणि स्थानिकांचा हस्तक्षेप होत होता. पण, त्यावर अत्यंत हुशारीने आणि सलोख्याने त्यांनी मार्ग काढला. ते म्हणतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार-कर्तृत्वाचा वारसा दिला, तथागत गौतम बुद्धांनी धम्म दिला, तो धम्म कुणाचाही द्वेष करत नाही. सगळ्यांवर प्रेम करून बंधुभाव-मैत्री जपतो. याच विचारांनी मी नेहमी काम करतो.” पुढेही समाजामध्ये मैत्रभाव निर्माण व्हावा, यासाठी ते सर्व समाजासाठी काम करणार आहेत. विशाल आहिरे यांच्यासारखे युवक खरे सद्धम्माचे दूत आहेत.
- योगिता साळवी
९५९४९६९६३८