पहलगाममधील हल्ला करुन भ्याडपणाची साक्ष देणार्या पाकिस्तानला, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून अद्दल घडवली. भारताचा रुद्रावतार पाहून पाकिस्तानने दया याचना केल्याचेही समोर आले होते. या उत्तरात भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. पाकिस्तान आजही या धक्क्यातून सावरत असल्याचे चित्र उपग्रहीय छायाचित्रांमधून समोर आले आहे...
गेल्या वर्षी दि. २२ एप्रिल रोजी पहलगाम परिसरात निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून पाकिस्तानसमर्थित अतिरेयांनी जे नृशंस हत्याकांड केले, त्या हत्याकांडाचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या द्वारे घेतला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे महत्त्वाचे तळ, प्रशिक्षण केंद्रे भारताने जमीनदोस्त केली. यातून पाकिस्तान अद्यापही सावरलेला नाही, असेच दिसून येत आहे. पहलगाम घटनेनंतर भारतीय लष्कराने व्यवस्थित पूर्वनियोजन करून, पाकिस्तानस्थित नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रहल्ले केले.
बहवालपूर आणि मुरिदके येथील कुप्रसिद्ध तळांचा त्यामध्ये समावेश होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांवरही भारताने क्षेपणास्त्रे डागली होती. पाकिस्तानने गेल्या वर्षी दि. ७, ८ आणि ९ मे रोजी, भारतातील विविध शहरे आणि लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते. भारताने ‘कामिकाझे’ ड्रोनचा वापर करून, पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा निष्प्रभ केली होती. भारताने अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानच्या ११ लष्करी तळांवर अचूक आणि भेदक हल्ले केले होते. त्यामध्ये नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कुर, सियालकोट, पसरूर, सारगोधा, भोलारी, जेकबाबाद आदी तळांचा यामध्ये अंतर्भाव होता. यामध्ये सारगोधा येथील मुशाफ हवाई तळाचाही समावेश होता.
भारताच्या हल्ल्यांमध्ये मुशाफ हवाई तळाच्या धावपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. भारताचा हा हल्ला एवढा जबरदस्त होता की, त्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नसल्याचे दिसून येते. मुशाफ हवाई तळाची धावपट्टी पूर्ववत करण्यामध्ये पाकिस्तानला अजून यश आले नसल्याचे, उपग्रहीय छायाचित्रांवरून दिसून येत आहे. भारताने या हवाई तळावर दि. १० मे २०२५ रोजी हल्ला केला होता. त्या हल्ल्यांमध्ये सदर धावपट्टीवर दोन मोठे खड्डे पडले होते. ती धावपट्टी व्यवस्थित करणे पाकिस्तानला अजून जमलेले नाही.
त्या धावपट्टीवर जे दोन प्रचंड खड्डे पडले होते, त्यातील एक खड्डा आठ-नऊ मीटर रुंद आणि चार-पाच मीटर खोल असा होता. दुसरा खड्डाही त्याच धावपट्टीवर ६६० मीटर अंतरावर पडला होता. अलीकडे जी उपग्रह छायाचित्रे एका वृत्तवाहिनीने प्रसृत केली, ती पाहता पाकिस्तानला अजून ती धावपट्टी पूर्णपणे दुरुस्त करता आलेली नाही. १६ महिने उलटून गेले असले, तरी या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरूच असल्याचे आढळते. दि. १२ सप्टेंबर २०२६ या दिवशी या हवाई तळाची जी उपग्रहीय छायाचित्रे घेण्यात आली, त्यावरून तेथील धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. २०२५च्या हल्ल्यानंतर या धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली होती. पण, ती नीट न झाल्याने पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट प्रतीची झाल्यानेच, पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असावे.
मात्र, केवळ उपग्रहीय छायाचित्रांच्या द्वारे नेमके तेथे काय काम केले जात आहे, ते समजू शकलेले नाही. दि. २८ ऑगस्ट २०२६ या दिवशीच्या उपग्रह छायाचित्रावरुन, सदर धावपट्टी दुरुस्त झाल्याचे लक्षात येत होते. पण, त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा हे काम का हाती घेतले? याचा अर्थ, धावपट्टी योग्य प्रकारे दुरुस्त झाली नाही असा काढला, तर ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जो जबरदस्त तडाखा पाकिस्तानला दिला आहे, त्याच धक्क्यातून अजून तो देश सावरलेला नाही, हेच यावरून दिसून येते.
‘काँग्रेस हा विदूषकांचा पक्ष’
काँग्रेसचे एकेकाळचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या पक्षाचे नेते राहुल गांधी हे केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून कसे हटविता येईल, यासाठी जंग जंग पछाडत आहेत. आपल्यामागे देशातील ‘जेन-झी’ उभी असल्याचा त्यांचा पक्का समज झाला आहे. त्यातूनच ते देशाच्या विविध भागांमध्ये ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांचे आयोजन करून, या नव्या पिढीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, त्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊन पंतप्रधान मोदी किंवा भाजप सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांनी अलीकडेच इंदूर येथे विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काही मुद्देसूद भाषण करून सरकारवर टीका केली असती, तर ते समजू शकले असते. पण, राहुल गांधी यांनी तसे काही केले नाही.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची नक्कल करून, उपस्थित विद्यार्थीवर्गाचे मनोरंजन करण्याचा विदूषकी प्रयत्न काँग्रेसने केला. आपण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहोत, याचे तारतम्यही त्यांना आता राहिलेले नाही. पंतप्रधान मोदी यांची नक्कल करणार्या नकलाकाराचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांची नक्कल करण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. भाजपच्या विविध नेत्यांनी याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांच्यावर सडकून टीका केली.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींचा अवमान करणारी जी नक्कल केली गेली, त्याबद्दल काँग्रेसवर जोरदार टीका केली. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, "काँग्रेस पक्ष हा आता नकलाकार आणि विदूषकांचा पक्ष बनला आहे.” तर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, "राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, ती पाहता त्यातूनच त्यांची नैतिक दिवाळखोरी दिसते.
असे कार्यक्रम योजून काँग्रेसने आपल्याकडे मूलभूत मानवी संवेदनशीलताच नसल्याचे आणि आवश्यक राजकीय संस्कृती नसल्याचे दाखवल्याचे,” ते म्हणाले. इंदूरमध्ये जो कार्यक्रम योजण्यात आला होता, त्यामध्ये शिक्षण, परीक्षा, भरती आणि रोजगार अशा मुद्द्यांवर विद्यार्थ्यांसमवेत चर्चा होणे अपेक्षित होते; पण झाले भलतेच! या कार्यक्रमाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात आले. विरोधी पक्षनेता किती अल्पमती आणि कोत्या मनोवृत्तीचा आहे, हेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले.